शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ganapati Temple: गणपती बाप्पा मोरया! एकदा तरी दर्शन घ्यावेच अशी ‘टॉप ५’ गणेशस्थाने

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 9:12 PM

1 / 15
गणपती बाप्पा ही वैश्विक देवता असली, तरी महाराष्ट्रात गणपती बाप्पाला विशेष स्थान आहे. गणपती बाप्पा हा अबालवृद्धांपासून भिन्न धर्मियांपर्यंत सर्वांना आपलासा आणि हवाहवासा वाटतो. (Ganapati Temple)
2 / 15
बाल गणेशाच्या कथा जशा सुरस आहेत, तशाच प्रेरणादायी आणि संस्कार करणाऱ्या आहेत. महाराष्ट्रात शेकडोंच्या घरात गणपती बाप्पाची मंदिरे आहेत. हजारो वर्षांपूर्वीचीही अनेक मंदिरे महाराष्ट्रात आहेत.
3 / 15
महाराष्ट्रातील बहुतांश गणेशस्थाने ही स्वयंभू, जागृत असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्रातील अष्टविनायक हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहेत. तसेच विदर्भातील अष्टविनायक म्हणून ओळख असणारी गणपती मंदिरेही खूप प्रसिद्ध आहेत.
4 / 15
पुणे, कोकण आदी भागातही गणपतीची अनेक मंदिरे आपल्याला आढळून येतात. सर्व मंदिराच्या कथा-कहाण्या, सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व अगदी वेगवेगळे आहे. एकदा तरी दर्शन घ्यावेच, अशी महाराष्ट्रातील पाच स्वयंभू गणेशस्थाने पाहूया... (5 most famous and amazing ganpati mandir)
5 / 15
कसबा गणपती - पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपती ओळखला जातो. राजमाता जिजाबाई आणि गणेशभक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसार जमीन खणल्यावर ही मूर्ती सापडली अशी आख्यायिका आहे. यानंतर या ठिकाणी राजमाता जिजाबाईंनी मंदिर बांधले.
6 / 15
हा गणपती एका दगडी गाभार्‍यात असून तांदळा स्वरूपात आहे. या गणपती मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत. शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा मान आहे.
7 / 15
कड्यावरचा गणपती - दापोलीहून केळशीकडे जाताना साधारण १८ किमी अंतरावर असलेल्या आंजर्ले गावात प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे टेकडीवर असलेले हे श्रीगणेशाचे जागृत देवस्थान `कड्यावरचा गणपती' म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिराची स्थापना सहाशे वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. १४३० च्या सुमारास केली, असावी असे मानले जाते.
8 / 15
मंदिरातील श्री गणेशाची सुबक मूर्ती साडेतीन ते चार फुटांची असून मूर्तीच्या बाजूला कोरलेल्या प्रतिमा या ॠद्धि-सिद्धीच्या आहेत. इ.स. १७८० मध्ये जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर सध्याचे मंदिर उभे राहिले आहे. हे मंदिर पेशवेकालीन वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे.
9 / 15
​दशभुज गणपती - रत्नागिरी जिल्ह्यातील हेदवी गावातील दशभुज गणपती हे जागृत देवस्थान आहे. या मंदिरातील गणेशाची मूर्ती विलोभनीय अशीच आहे. चिपळूण गावापासून १० कि.मी. अंतरावर हेदवी या गावी हे मंदिर आहे. पेशवेकालीन केळकरस्वामी नामक व्यक्तीला पेशव्यांकडून ही मूर्ती मिळाल्याचे सांगितले जाते.
10 / 15
हेदवी येथे या मूर्तीची स्थापना केली. इ.स. १९५६ रोजी या मंदिराचा जीर्णाद्धार करण्यात आला. या मंदिराचा परिसर हा अगदी नयनरम्य आहे. गणेशमूर्ती दशभुज असून, हातात त्रिशूळ, गदा, धनुष्य, चक्र, पदम व मोदक आदी वस्तू कोरलेल्या दिसतात. अशा प्रकारची दशभुज मूर्ती केवळ नेपाळमध्ये पाहायला मिळते, असे सांगितले जाते.
11 / 15
द्विभुज गणपती - तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी गावात हा गणपती आहे. सदानंद नागेश कांबळी हा ट्रक ड्रायव्हर म्हणून एका मायनिंगच्या कंपनीमध्ये कामाला होता. ८ एप्रिल १९७६ रोजी एका विशिष्ठ ठिकाणी झोपले असताना पहाटेच्या सुमारास त्यांना स्वप्न पडले. सध्या मंदिर असलेल्या ठिकाणी आपली मूर्ती असल्याचा गणपतीने दृष्टांत दिला.
12 / 15
त्यानुसार, कांबळी यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने तेथे खोदकाम सुरू केले आणि खोदताना गणपतीच्या मूर्तीच्या तोंडाचा भाग व कानाचा भाग आढळून आला. एका महिन्यानंतर, १ मे १९७६ रोजी गणपतीची पूर्ण मूर्ती दिसू लागली. अखंड जांभ्या दगडात कोरलेली ही मूर्ती सहा फूट उंच व तीन फूट रुंद आहे.
13 / 15
सिद्धिविनायक महागणपती - महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच हे श्रीगणपती क्षेत्रही प्रसिद्ध आहे. टिटवाळा या गावी हे गणपती मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गाभार्‍यात प्रवेश केल्यापासून ते सभामंडपातून बाहेर पडेपर्यंत मूर्तीचे दर्शन होत राहते. मंदिराच्या आवारात एक छोटी दीपमाळ आहे. या मंदिरापासून काही अंतरावर एक तलाव आहे.
14 / 15
दुर्वास ऋषींचे यथायोग्य स्वागत न केल्यामुळे शकुंतलेला शाप मिळाला आणि राजा दुष्यंताला शकुंतलेचा विसर पडला. उत्साहाने पतीगृही गेलेली शकुंतला आल्या पावली परत फिरली. कण्व ऋषींकडे परत आलेल्या या शकुंतलेने गणपतीची आराधना केली आणि दुष्यंताला सारे काही आठवले. शकुंतलेला तिचे प्रेम परत मिळवून देणारा गणपती म्हणजेच टिटवाळ्याचा महागणपती, अशी याची आख्यायिका आहे.
15 / 15
या मंदिरांमध्ये हजारो भाविक नियमित दर्शनाला येत असतात. संकष्टी, गणेशोत्सवावेळी भक्तांची मोठी गर्दी या मंदिरांमध्ये होत असते, असे सांगितले जाते.
टॅग्स :TempleमंदिरMaharashtraमहाराष्ट्रRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्गPuneपुणेthaneठाणे