शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Annapurna Idol Canada: अन्नपूर्णा देवीची १०० वर्षांनी घरवापसी; १८ व्या शतकात झाली होती स्थापना, पाहा, इतिहास आणि कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 2:50 PM

1 / 9
भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये अन्नपूर्णा देवीचे विशेष स्थान आहे. अन्नपूर्णा देवीचे स्वरुप हे अन्नाचे महत्त्व सांगणारे आहे. अन्नपूर्णा देवीची कृपा झालेल्यांकडे कधीही अन्न-धान्य, धन-वैभव, संपत्ती यांची कमतरता भासत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. (history of annapurna idol canada)
2 / 9
अलीकडेच भारतातून चोरीला गेलेली एक अन्नपूर्णा देवीची मूर्ती कॅनडामधून पुन्हा मायदेशात परतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १०० वर्षांपूर्वी अन्नपूर्णा देवीची ही मूर्ती भारतातून चोरीला गेली होती. मात्र, भारताचा अमूल्य ठेवा पुन्हा परत मिळत आहे. (stolen annapurna idol before 100 years)
3 / 9
कॅनडातून अन्नपूर्णा देवीची मूर्ती भारतात परत आणण्यात यश आले असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काशी विश्वनाथ मंदिरात अन्नपूर्णा देवीची विधिवत पुन्हा एकदा प्रतिष्ठापना केली. यानंतर आता या देवीचे दर्शन भाविकांना घेता येणे शक्य होणार आहे.
4 / 9
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वंशाच्या दिव्या मेहरा यांना कॅनडा येथील मॅकेंझी आर्ट गॅलरी येथे एका प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. सन २०१९ मध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात मेहरा यांना अन्नपूर्णा देवीची मूर्ती दिसली. ही मूर्ती भारतीय म्हणजेच भारतात घडवण्यात आली असावी, असे मेहरा यांना वाटले.
5 / 9
मूर्ती पाहताक्षणी ती भारतातील असावी, असा अंदाज आल्यानंतर दिव्या मेहरा यांनी यासंदर्भात शोध घेतला. या मूर्तीबाबत अभ्यास केल्यानंतर ही तिच मूर्ती आहे, जी भारतातून सन १९१३ रोजी चोरीला गेली होती, हे समजले.
6 / 9
यानंतर दिव्हा मेहरा यांनी अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची माहिती भारतीय दूतावासाला दिली. यानंतर भारत सरकारकडून अन्नपूर्णा देवीची ही अद्भूत मूर्ती देशात परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली. अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर अखेर अन्नपूर्णा देवीची ही मूर्ती भारतात परत आणण्यास यश आले आहे. (india got back maa annapurna idol after 100 years from canada)
7 / 9
मिळालेल्या माहितीनुसार, अन्नपूर्णा देवीची ही मूर्ती १८ व्या शतकातील असून, चुनार येथील बलुआ दगडापासून घडवण्यात आली आहे. या देवीच्या एका हातात भांडे असून दुसऱ्या हातात चमचा आहे. वाराणसी येथून ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती १०० वर्षांपूर्वी चोरीला गेली होती आणि ती कॅनडा येथे आढळून आली.
8 / 9
पौराणिक एका कथेनुसार, पृथ्वीवर खूप मोठा दुष्काळ पडला होता. ऋषींनी ब्रह्मलोक आणि विष्णूलोक येथे जाऊन ब्रह्मदेव आणि श्रीविष्णूंना या समस्येचे निराकरण करायला सांगितले. मात्र, ब्रह्मदेव आणि श्रीविष्णूंनी ऋषींना महादेवांकडे जाऊन साकडे घालायला सांगितले.
9 / 9
भोलेनाथ असलेल्या महादेवांनी आणि पार्वती देवींनी यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. यानंतर पार्वती देवीने अन्नपूर्णा स्वरुप धारण करून तर महादेव एका भिक्षुकच्या रुपात पृथ्वीवर आले. महादेवांनी अन्नपूर्णा देवीकडून भिक्षा मागून ती पृथ्वीवर असलेल्यांमध्ये वितरीत केली. यानंतर पाणी आणि धन-धान्याची कधीही कमतरता पृथ्वीवर जाणवली नाही, अशी एक आख्यायिका सांगितली जाते.
टॅग्स :Annapurna Deviअन्नपूर्णा देवीCanadaकॅनडाIndiaभारतyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश