शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महाभारतात कर्णाला मिळालेले ३ शाप ठरले प्राणघातक; नेमकं काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 12:47 PM

1 / 10
हिंदू धर्म, संस्कृती यामध्ये महाभारताला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. महाभारत हे महाकाव्य असून, हिंदू धर्मातील तो एक प्रमुख ग्रंथ मानला जातो. १८ दिवस महाभारताचे सुद्ध सुरू होते. धर्म आणि अधर्म या तत्त्वांवर हे युद्ध लढले गेले.
2 / 10
यात अनेक महायोद्ध्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे कर्ण. दानशूर कर्ण, लढवय्या कर्ण आणि महाभारताच्या रणभूमीत असहाय्यतेने मृत्यू आलेला कर्ण अशी अनेक कंगोरे कर्णाचे महाभारतात पाहायला मिळतात.
3 / 10
कर्ण जन्माने क्षत्रिय होता. मात्र, त्यानंतर पुढील जीवन सूतपुत्र म्हणून संघर्षात त्याला काढावे लागले. दुर्योधनाने कर्णाची शौर्य पाहून त्याला अंगद देशाचा राजा बनवले होते. मात्र, पुढील आयुष्यात कर्णाला मिळालेले तीन शाप महाभारत रणभूमीत त्याच्या मृत्यूचे कारण ठरले, असे सांगितले जाते.
4 / 10
कर्णाला पहिला शाप चिरंजीव आणि श्रीविष्णूंचा एक अवतार मानल्या गेलेल्या परशुरामांकडून मिळाला. सूतपुत्र म्हणून त्याला शिक्षण देण्यास कुणीही तयार नव्हते. शेवटी कर्णाने परशुरामांची भेट घेतली. कर्णातील चाणाक्षपणा, तळमळ पाहून परशुरामांनी त्याला आपला शिष्य बनवले. एकदा परशुराम आराम करत होते. कर्णही तेथेच बसला होता.
5 / 10
तेवढ्यात त्या ठिकाणी एक विंचू आला. आपण हललो, तर गुरू परशुरामांना जाग येईल. या विचाराने कर्ण जागेवरून हलला नाही. शेवटी विंचवाने डंख मारला. रक्ताचा ओघळ परशुरामांपर्यंत पोहोचला. परशुरामांना जाग आली.
6 / 10
या गोष्टीचे परशुरामांना खूप आश्चर्य वाटले. ते क्षणार्धात काय ते समजले. ते म्हणाले की, एवढी सहनशक्ती, संयम केवळ क्षत्रियामध्येच असू शकतो. कर्णावर चिडलेल्या परशुरामांनी शाप दिला की, जेव्हा सर्वांत जास्त गरज असेल, तेव्हा मी दिलेली विद्या तू विसरून जाशील. महाभारत युद्धभूमीत शेवटी कर्णाला आपली विद्या, ज्ञान यांचे विस्मरण होते.
7 / 10
क्षत्रियाला शिकवणार नाही, असा पण परशुरामांनी केला होता. म्हणून त्यांनी कर्णाला शाप दिला. कर्णाला दुसरा शाप एका ब्राह्मणाने दिला होता. शब्दभेदी बाणाचा अभ्यास करताना कर्णाचा बाण एका वासराला लागला. ते वासरू एका ब्राह्मणाचे होते. दुःखी झालेल्या ब्राह्मणाने कर्णाला शाप दिला की, या वासराचा जसा असहाय्य स्थितीत मृत्यू झाला, तसाच तुझाही होईल.
8 / 10
कर्णाने झुडुपामागे कोण आहे, ते खरंच हिंसक जनावर आहे का, याचा विचार न करता शब्दभेदी बाण चालवला आणि वासराचा मृत्यू झाला. यावर कर्णाने माफीही मागितली. मात्र, त्याला माफ केले नाही. महाभारत युद्धात सर्वांत निर्णायक क्षणी कर्ण असहाय्य झाला आणि त्यातच अर्जुनाने कर्णाचा वध केला.
9 / 10
तिसराही शाप त्याच ब्राह्मणाने दिला होता. तू ज्या रथावर स्वार होऊन सर्वश्रेष्ठ बनतोस, कोणाचीही चूक नसताना विनाविचार बाण चालवतोस, युद्धात तुझ्या रथाचे चाक जमिनीत रुतेल आणि सन्मान, श्रेष्ठत्व यासह तू जमिनीवर येशील.
10 / 10
महाभारतातही अर्जुन आणि कर्णात युद्ध सुरू होते, तेव्हा या शापानुसारच आधी कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतते, त्यानंतर असहाय्यपणे तो ते काढण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वांत शेवटी आपली विद्या, ज्ञानही विसरतो. अर्जुन दिव्यास्त्र चालवतो आणि कर्णाचा वध होतो.
टॅग्स :Mahabharatमहाभारत