शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

श्रीगणेश जयंती, रथसप्तमी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती; 'हे' आहेत फेब्रुवारीतील मुख्य सण-उत्सव

By देवेश फडके | Published: February 01, 2021 2:16 PM

1 / 7
सन २०२१ वर्षाची सुरुवात आश्वासक पद्धतीने झालेली पाहायला मिळत आहे. इंग्रजी नववर्षाच्या पहिल्या म्हणजेच जानेवारी महिन्यात आलेले सण-उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरे करण्यात आले. कोरोनाचे संकट असले, तरी देशवासीयांनी मर्यादा पाळून आपापल्या पद्धतीने सण-उत्सव साजरे केले.
2 / 7
जानेवारीप्रमाणे फेब्रुवारी महिनाही अनेक कारणांनी महत्त्वाचा आणि उत्साहाचा असेल. फेब्रुवारी महिन्यात मराठी वर्षातील माघ महिना सुरू होत आहे. माघ हा महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात श्रीगणेश जयंती, वसंत पंचमी, रथसप्तमी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांसारखे सण-उत्सव आहेत. फेब्रुवारी महिन्यातील मुख्य सण-उत्सवांविषयी जाणून घेऊया...
3 / 7
पौष महिन्यातील वद्य एकादशी षट्तिला एकादशी या नावाने ओळखली जाते. यावर्षी ०८ फेब्रुवारी २०२१ रोजी षट्तिला एकादशी आहे. षट्तिला एकादशीला तिळाचे दान करणे चांगले मानले जाते.
4 / 7
माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला श्रीगणेश जयंती साजरी केली जाते. यंदा १५ फेब्रुवारी २०२१ रोजी श्रीगणेश जयंती आहे. पौराणिक मान्यतानुसार माघ मासच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे. गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते.
5 / 7
माघ महिन्याची शुद्ध पंचमी वसंती पंचमी म्हणून साजरी केली जाते. यावर्षी १६ फेब्रुवारी २०२१ रोजी वसंत पंचमी आहे. माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरली. यामुळे माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते. वसंत ऋतूही याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी म्हटले जाते. विद्येची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते. वसंत पंचमी साजरी करण्याला हिंदू धर्मात अनेक मान्यता आहेत. वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्त्वही वेगळे आहे.
6 / 7
सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्य पूजन करण्याची प्रथा आहे. यंदा १९ फेब्रुवारी २०२१ रोजी रथसप्तमी साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी-कुंकू समारंभ रथसप्तमीदिनी समाप्त होतात. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तारखेप्रमाणे) साजरी केली जाणार आहे.
7 / 7
माघ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी जया एकादशी म्हणून ओळखली जाते. यावर्षी २३ फेब्रुवारी २०२१ रोजी जया एकादशी आहे. नावाप्रमाणे ही कल्याणकारी आणि विजय देणारी एकादशी आहे. श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठीराला या एकादशीच्या व्रताचे महत्त्व सांगितले होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.