शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमच्यासाठी कोणत्या राशीचा जोडीदार अगदी परफेक्ट ठरू शकतो? मॅजिकसह लॉजिकही हवं; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 1:28 PM

1 / 15
माणसाच्या आयुष्यात विवाह किंवा लग्न हा विशेष महत्त्वाचा भाग असतो. काही जण अरेंज मॅरेज करतात, तर काही लव्ह मॅरेज करतात. आधुनिक युगात लिव्ह इन रिलेशनशिपचे फॅडही वाढताना दिसत आहे. प्रेम हा तसा सगळ्या पलीकडे जाऊन अनुभवण्याचा विषय आहे. प्रेमात जितके मॅजिक महत्त्वाचे असते, तितकेच लॉजिक असणेही आवश्यक आहे. (love horoscope)
2 / 15
प्रेम करणे व संसार करणे या दोन फार वेगळ्या गोष्टी आहेत. अरेंज मॅरेज करताना पत्रिका, कुंडली या गोष्टी पाहिल्या जातात. मात्र, लव्ह मॅरेजमध्ये त्या पाहिल्या जातातच असे नाही. प्रेमात पत्रिका, कुंडली या गोष्टी पाहणे गरजेचे वाटत नसले तरी संसाराआधी निदान आपण त्या व्यक्तीच्या स्वभावाशी जुळवून घेऊ शकतो का, हे पाहणे आवश्यक ठरू शकते. (which zodiac sign partner can be perfect for you)
3 / 15
तुमचा जोडीदार तुमच्या राशीला व त्यानुसार ठरणाऱ्या तुमच्या स्वभावाला साजेसा आहे का याबद्दल तुम्हालाही कुतुहूल असेलच ना? चला तर मग आज आपण ज्योतिषशास्त्राच्या अनुसार कोणत्या राशी परफेक्ट जोडीदार ठरू शकतात हे जाणून घेऊया... (which zodiac signs make perfect couple)
4 / 15
मेष राशीच्या व्यक्ती प्रचंड उत्साही असतात. त्यामुळे त्यांना स्पष्टवक्त्या व संयमी मिथुन राशीच्या व्यक्ती योग्य जोडीदार ठरू शकतात. कुंभ, सिंह व धनु या राशी सुद्धा मेषसाठी साजेश्या असू शकतात. मात्र, या मंडळींना किंचित समजूतदारपणा दाखवावा लागतो, असे म्हटले जाते.
5 / 15
वृषभ राशीची मंडळी अत्यंत स्पष्टवक्त्या व लॉजिकल असतात. त्यांना स्वप्नात जगणे आवडत नाही. कामाच्या बाबतही या व्यक्ती गंभीर असतात. वृषभसाठी मीन व कर्क या राशी साजेश्या आहेत, या व्यक्ती बोलक्या असतात त्यामुळे संसारात समतोल राखणे शक्य होते, असे सांगितले जाते.
6 / 15
मिथुन ही अत्यंत रोमँटिक रास म्हणून ओळखली जाते. त्यामुळे यांच्या जोडीदाराकडून खूप अपेक्षा असतात. त्यांना तुळ व कुंभ राशीच्या व्यक्ती साजेश्या जोडीदार ठरू शकतात. या दोन्ही राशी लवचिक असतात समोरच्याच्या स्वभावानुसार त्या वागणूक बदलतात त्यामुळे यांची जोडी उत्तम ठरू शकते, असे म्हटले जाते.
7 / 15
कर्क राशीचा स्वामी चंद्र असतो. चंद्राप्रमाणेच नाजूक व संवेदनशील असा यांचा स्वभाव असतो. अशा व्यक्तींना समजून घेणारे जोडीदार हवे असतात. वृश्चिक व मीन रास त्यांना साजेशी ठरू शकते. जोडीदारांमध्ये चांगली मैत्री असते पण सुरुवातीच्या काळात समजून घेण्यात थोडी गल्लत होऊ शकते, असा दावा केला जातो.
8 / 15
सिंह रास नावाप्रमाणेच धडाकेबाज असते. यांचा स्वभाव नेतृत्व करणारा असतो. त्यांना समान स्वभावाच्या व्यक्ती जोडीदार म्हणून लाभल्यास भांडणे होऊ शकतात. अग्नी तत्त्वाच्या सिंह राशीच्या व्यक्तीच्या तापट स्वभावाच्या अगदी विरुद्ध स्वभाव वायुतत्त्वाच्या कुंभ राशीच्या व्यक्तीचा असतो. त्यामुळे सिंह व कुंभ यांची जोडी चांगली जमू शकते, असे म्हटले जाते.
9 / 15
कन्या राशीची लोकं बुद्धिमान असतात व त्यांना विश्लेषक व तर्कसंगत विचारांच्या व्यक्तींबद्दल आकर्षण असते. कन्या रास जलतत्वाच्या कोणत्याही राशींसोबत सुखाचा संसार करू शकते, असे सांगितले जाते.
10 / 15
तूळ रास ही वागणुकीने शांत, आनंदी व संयमी असते मात्र यांच्या नेतृत्व करण्याचा सुप्त गुण असतो. तूळ राशीचे चिन्ह म्हणजेच संतुलन साधणारी न्याय करणारी तुला. यामुळे यांना निर्णय घेण्याची मुभा देणारी मंडळी आवडतात. तूळ राशी मुख्यतः धनु व मिथुन यांच्यासह आनंदी राहू शकतात, असे म्हटले जाते.
11 / 15
वृश्चिक हट्टी स्वभाव असणारी ही मंडळी आहेत. मात्र यांच्या या स्वभावाचा निर्णय न घेऊ शकणाऱ्या जोडीदाराला फायदा होऊ शकतो. मिथुन रास वृश्चिकसाठी थोडी सोयीची ठरू शकते. कारण या व्यक्तींचा स्वभाव लवचिक असतो. मात्र या जोडीत अनेकदा खटके उडू शकतात, असे सांगितले जाते.
12 / 15
धनु राशीच्या व्यक्ती हसऱ्या व विनोदी स्वभावाच्या असतात. त्यांच्यात मोकळेपणा असतो पण ठाम निर्णय घेताना यांना संभ्रम अधिक असतो. धनुसह नेतृत्व करणाऱ्या राशी म्हणजेच सिंह, तूळ यांचे चांगले जमू शकते, असे म्हणतात.
13 / 15
मकर रास भविष्याविषयी चिंतीत असते. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी त्या सतत अति कष्ट घेतात मात्र त्यांना जोडीदारावर अविश्वास ठेवण्याची सवय असते. अशावेळी रोमँटिक अशा मिथुन राशीची सोबत त्यांना नात्यात सुरक्षित वाटेल याची काळजी घेते. कर्क व मकर ही जोडीही समान स्वभाव असल्याने उत्तम व यशस्वी संसार करू शकते, असे सांगितले जाते.
14 / 15
कुंभ रास ही सर्वांत लवचिक व मदत करण्यासाठी तत्पर अशी रास आहे. जवळपास अर्ध्याहून अधिक राशींसह कुंभची जोडी उत्तम जमू शकते. कारण याचे श्रेय कुंभच्या लवचिकतेला जाते. पण या व्यक्ती जितक्या प्रेमळ तितक्या जिद्दी असतात, मनाविरुद्ध झाल्यास त्यांची मनधरणी करणे खूप कठीण असते, असे म्हटले जाते.
15 / 15
मीन ही जलतत्त्वाची राशी आहे. कलेची ओढ व प्रेमळ स्वभाव असणारी ही मंडळी जितकी भावविश्वात जगणारी असतात तेवढेच सतर्क असतात. मीन व कन्या या राशी उत्तम संसार करू शकतात. मात्र मीनला शिस्त लावणारी रास हवी असते. अन्यथा संसारात स्थैर्य राहात नाही, असे सांगितले जाते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य