शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Bhagavad Gita: श्रीकृष्णाशिवाय ‘या’ ५ जणांना माहीत होते गीतारहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 3:05 PM

1 / 12
भारतात अनेक धर्म, जाती, पंथाचे नागरिक अगदी गुण्यागोविंदाने नांदतात. प्रत्येक धर्मात सांगितलेले तत्त्वज्ञान अतिशय मोलाचे असल्याचे पाहायला मिळते. मात्र, सर्वांत वरचा क्रमांक लागतो तो भगवद्गीतेचा.
2 / 12
गीतेमधील ज्ञान, शिकवण ही कालातीत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक अभ्यासक, तज्ज्ञ मंडळी गीतेचा अभ्यास करण्यासाठी, संशोधनासाठी भारतात येत असतात.
3 / 12
आजच्या काळातही गीताज्ञान किती अमोघ, अनमोल आणि अमूल्य वाटते, याची प्रचिती अनेकांना येत असते. हजारो वर्षे लोटली तरी, गीताज्ञानाची महती, उत्सुकता, महत्त्व कमी होताना दिसत नाही.
4 / 12
गीतेवर देशभरात अनेक अन्य ग्रंथ, टीका ग्रंथ रचण्यात आले. यावरूनही गीतेची थोरवी अधोरेखित होते, असे म्हटले जाते. आपल्याला केवळ श्रीकृष्णाने महाभारताच्या रणभूमीत अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, अशीच माहिती आहे. मात्र, श्रीकृष्णाशिवाय ५ जणांनाही गीतेचे ज्ञान होते. जाणून घेऊया...
5 / 12
श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश करताना म्हटले की, यापूर्वी गीतारहस्य सूर्याला सांगितले आहे. मात्र, अर्जुनाने यावर शंका उपस्थित केली. सूर्य देव तर प्राचीन देवता आहेत, आपण त्यांना कशी गीता सांगितली. यावर श्रीकृष्ण म्हणाले की, तुझे आणि माझे यापूर्वी अनेक जन्म झाले आहेत. परंतु, तू त्याबाबत अनभिज्ञ आहेस. मात्र, मला त्याची पूर्ण माहिती आहे. भगवंतांनी सर्वप्रथम गीतेचे ज्ञान सूर्याला दिले होते, असे ते म्हणाले.
6 / 12
धृतराष्ट्र प्रत्यक्ष महाभारताच्या रणांगणावर जाऊ शकत नव्हते. महर्षी व्यासांनी संजयाला दिव्यदृष्टी दिली होती. त्यामुळे रणभूमीवर काय घडतंय, याची माहिती संजय धृतराष्ट्रांना देत होते. श्रीकृष्णांनी भगवद्गीतेचे अर्जुनाला दिलेले ज्ञान संजयने धृतराष्ट्रालाही सांगितले.
7 / 12
आपल्या शिष्यांपर्यंत महाभारत कसे पोहोचवायचे, असा प्रश्न महर्षी व्यासांना पडला. तेव्हा ते ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांनी महर्षींना श्रीगणेशाचे आवाहन करण्यास सांगितले. ब्रह्मदेवांच्या सूचनेनुसार महर्षी व्यासांनी गणेशाला महाभारत लिहिण्याची विनंती केली. तेव्हा महर्षी व्यासांनी भगवद्गीतेचे ज्ञान गणपतीला दिले.
8 / 12
गणेशासह महर्षी व्यासांनी आपले शिष्य वैशंपायन, जेमिनी, पैल यांसह अन्य शिष्यांना महाभारताच्या गूढ रहस्यांसह गीतेचा उपदेश केला होता, असे सांगितले जाते. यानंतर गीतेचे ज्ञान पुढे अनेकांना मिळत गेले, असे म्हटले जाते.
9 / 12
महर्षी व्यासांचे शिष्य वैशंपायन यांनी पांडवांचे वंशज राजा जनमेजय यांना गीतेचे ज्ञान दिले होते. पिता परीक्षित यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी राजा जनमेजय यांनी सर्प यज्ञ केला होता. तेव्हा महर्षी व्यास आपल्या शिष्यांसह तेथे गेले होते. गुरुंच्या आदेशानंतर वैशंपायन यांनी राजाला गीतारहस्य सांगितले, अशी मान्यता आहे.
10 / 12
ऋषि उग्रश्रवा यांनी नैमिषारण्यात शौनकासह अन्य तपस्वींना महाभारत कथा सांगितली होती. यावेळेस ऋषींनी उपस्थितांना भगवद्गीतेचे ज्ञान दिले, असे सांगितले होते.
11 / 12
याशिवाय सप्तचिरंजीवांपैकी एक असलेल्या हनुमंतांनाही भगवद्गीतेचे ज्ञान मिळाले होते, असे सांगितले जाते. कारण महाभारत युद्धावेळी श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून हनुमान अर्जुनाच्या रथावर सूक्ष्म रुप धारण करून बसले होते.
12 / 12
महाभारत युद्धाच्या सुरुवातीला श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता ज्ञान दिले, तेव्हा सूक्ष्मरुपात हनुमान रथारुढ असल्यामुळे त्यांनाही गीतेचे ज्ञान मिळाले होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर हनुमान रथावरून खाली उतरून मूळ रुपात प्रकट होताच अर्जुनाचा रथ भस्म झाला, अशी कथा सांगितली जाते.
टॅग्स :Mahabharatमहाभारत