महाकुंभमेळ्यात जाऊन गंगास्नान केल्याने पापे धुतली जात नाहीत! शास्त्र नेमके काय सांगते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 12:59 IST
1 / 12Maha Kumbh Mela 2025: तब्बल १४४ वर्षांनी जुळून आलेल्या महाकुंभमेळ्याचे पावन पर्व सुरू आहे. मकर संक्रांती ते महाशिवरात्री महाकुंभमेळा असणार आहे. पुन्हा आता १४४ वर्षांनी असा योग जुळून येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक, पर्यटकांनी महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी एकच गर्दी केली आहे. असा योग पुन्हा आयुष्यात येणार नसल्याने याचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी भाविक आग्रही आहेत. आतापर्यंत ५० कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभमेळ्यात सहभागी होत त्रिवेणी संगमावर गंगास्नान केले.2 / 12त्रिवेणी संगमावर किंवा गंगास्नान केल्याने पापे धुतली जातात, अशी सर्वमान्य मान्यता आहे. देशातील सर्वांत मोठी आणि सर्वांत पवित्र नदी म्हणून गंगा नदीची ओळख आहे. गंगा नदीपासून अनेक नद्या, प्रवाह निर्माण झाले असून, बंगालच्या उपसागराला मिळेपर्यंत गंगा नदीला अनेक नद्या येऊन मिळतात. गंगा नदीइतके धार्मिक महत्त्व जगातील दुसऱ्या कोणत्याही नदीला नसेल. जन्मात एकदा तरी गंगास्नान घडावे, अशी कोट्यावधी भारतीयांची इच्छा असते. 3 / 12गंगेला विष्णुपदी, त्रिपथगा, भागीरथी, जान्हवी, अशी अनेक नावे आहेत. पुराणे, आरण्यके यांसारख्या अनेक धार्मिक ग्रंथांत गंगेचे स्तवन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. गंगा स्नान आणि गंगापूजन यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. यातच महाकुंभमेळ्याला गंगास्नान करणे म्हणजे परमभाग्य आणि पुण्यदायी मानले जाते. 4 / 12केवळ महाकुंभमेळ्यात सहभागी होऊन त्रिवेणी संगमावर गंगास्नान केल्याने आपली सर्व पापे धुतली जातील, असा समज कुणी करून घेतला असेल, तर महाकुंभमेळ्यात जाऊन त्रिवेणी संगमावर गंगा स्नान केल्याने पापे धुतली जात नाहीत. गंगास्नान केल्याने चुकून आणि अजाणतेपणे झालेली पापेच धुतली जातात.5 / 12विचारपूर्वक आणि योजना करून केलेल्या एखाद्या कृतीने आपण पापाचे भागीदार होणार असू, तर अशी पापे धुतली जात नाहीत. जाणूनबुजून कोणाला तरी दुःख देत दिले, तरी गंगा ही आईसमान असली तरी ती तुमच्या कृत्यांना किंवा पापकर्मांना माफ करत नाही. पापे धुऊन टाकणार नाही. त्या कृत्याबद्दल नक्कीच शिक्षा होईल किंवा त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. 6 / 12महाकुंभमेळ्यात कोण सहभागी होत आहे. त्रिवेणी संगमावर जाऊन कोण गंगास्नान करत आहे, त्याने आपल्या जीवनात काय केले आहे, हा प्रश्न किंवा हा मुद्दा निराळा आहे. कारण प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ प्राप्त होत असते. त्याचे चांगले-वाईट, सकारात्मक-प्रतिकूल परिणाम वाट्याला येत राहतात. प्रारब्ध टाळून कोणालाही पुढे जाता आलेले नाही.7 / 12हातून घडून गेलेल्या कर्माची फळे जरी भोगावीच लागणार असली तरी पश्चाताप होऊन मन स्वच्छ झालेले असल्यामुळे त्याला ही फळे बरीचशी सुसह्य वाटू शकतात. आपल्या हातून झालेल्या चुकीची जाणीव असणे आणि त्याबाबत पश्चातापाची भावना मनात असणे हे महत्त्वाचे मानले गेले आहे. 8 / 12मनात कोणतेही किल्मिष उरलेले नसल्यामुळे त्याची वागणूक अधिक स्नेहपूर्वक होऊन त्याने ज्यांना त्रास दिला आहे, ते लोकही प्रभावित होतात. पुढील अधिक चांगल्या कृती करण्यासाठी ती व्यक्ती तयार होतो, त्याचे आणि इतरांचे जीवन सुसह्य होते, असे घडणे म्हणजेच पापमुक्ती होय, असे मानले जाते. 9 / 12आपल्या चुकीची जाणीव ठेवून मनापासून क्षमा मिळावी, असे वाटत असेल आणि पुढील जवळपास सर्वच कर्मे चांगली ठेवली, तर अत्यंत दयाळू परमेश्वर प्रसन्न होतो आणि तुम्हाला पुढील कार्यात मदत करतो. समस्या, अडचणीतून मार्ग दाखवतो. तुमच्यावर कृपा करतो. प्रयत्नांना भाग्याची जोड देतो. मेहनतीला सकारात्मकता देतो आणि कल्याणच करतो, असे म्हटले जाते. 10 / 12गंगा आणि यमुना ही आपल्याकडे अत्यंत प्राचीन तीर्थे आहेत. या तीर्थांचा प्रभाव असा आहे की रोज जरी संध्येच्या पळीभर त्याचे पाणी प्यायलात तरी तुमच्या मनाच्या ठिकाणी असलेले दोष आपोआप नाहीसे होतात. हे सगळे करत असताना याला मोठ्या भक्तीभावाची जरूरी असते. मात्र गंगाकाठी, गंगातीरी राहणारे लोक पाणी म्हणून तर पीत असतील तर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही. पण पाणी पिताना मी गंगातीर्थ पितो असा भाव मनात असेल तर मनाचे दोष नक्की जातील. आपल्याला रोज गंगास्नान घडणे शक्य नाही. गंगातीर्थ मिळणे नाही. अशा वेळी भक्तीभावाने केलेले स्मरण गंगेचे पावनत्व साध्या पाण्यातही उतरवते.11 / 12गंगेपुढे मन शांत होते. गंगा हे परमेश्वराचे चिन्ह आहे. गंगास्नानाने पापक्षालन होते. परंतु त्यासाठी आपला भाव चांगला असावा लागतो. या गंगास्नानाचे दुसरे महत्त्व असे की, आपल्या पाठीमागे कायम ग्रहपीडा असते. कोणाला शनीपीडा, कोणाला मंगळ पीडा असते, या सर्व पीडा गंगेच्या पाण्याने कमी होत जातात. हिमालयात गंगेचा उगम होतो, त्या ठिकाणाला गंगोत्री म्हणतात. तेथूनच ती हृषिकेश व हरिद्वारला येते. जेव्हा संधी मिळेल तेव्हा तिथे अवश्य जाऊन या.12 / 12- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.