शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Nag Panchami 2022: नागपंचमीला सिद्धी योग: ‘शिव’योगात महादेवांवर रुद्राभिषेक करा; कालसर्प अन् राहु दोष मुक्त व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 5:05 AM

1 / 12
आताच्या घडीला मराठी वर्षातील सर्वांत महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मास सुरू आहे. चातुर्मासातील विशेष महत्त्व असणारा महिना श्रावण नुकताच सुरू झाला आहे. व्रत-वैकल्यांचा राजा मानला गेलेल्या श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागपूजा करून हा सण साजरा केला जातो. नाग हा बळीराजाचा मित्र असल्यामुळे नागपंचमी हा सण व्रत आणि उत्सव अशा दोन्ही स्वरूपात साजरा केला जातो. (Nag Panchami 2022)
2 / 12
सन २०२२ मध्ये ०२ ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जात आहे. नागांबाबतचे समाजातील भय नाहीसे व्हावे, जगजागरूकता व्हावी तसेच नागांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी नागपूजन केले जाते. श्रावणाचा काळ शिवपूजनासाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो. नाग हा शिवांच्या प्रतीकांपैकी एक आहे. त्यामुळे श्रावणात शिवपूजन आणि नागपूजन करणे शुभ मानले जाते.
3 / 12
श्रावणात केल्या जाणाऱ्या नागपूजनाला केवळ धार्मिक महत्त्व आहे, असे नाही. तर नैसर्गिक, व्यवहारिकदृष्ट्याही महत्त्व आहे. नागपूजनामुळे कालसर्पाचा दोष दूर होण्यास मदत होते, असे ज्योतिष सांगते. श्रावणात साजरी केली जाणारी नागपंचमी विविध कारणांमुळे महत्त्वाची मानली जाते.
4 / 12
नागाचे महत्त्व पुरातन काळापासून असल्याचे दिसून येते. ज्योतिष हे एक शास्त्र आहे. भविष्य कथनातील एक प्रमुख भाग म्हणजे जन्मकुंडली. यावरून व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व यांसह भविष्यातील घटनांचा अंदाज बांधला जाऊ शकतो. जन्मकुंडलीतील ग्रहांची स्थाने आणि त्याचे चलन यांनुसार दोष, महादशा, साडेसाती, भाग्योदय ठरवले जातात. त्यातील एक म्हणजे कालसर्प.
5 / 12
कालसर्प दोष हा खूप काही भयंकर आहे, असे मानले जाते. मात्र, तसे नाही. कालसर्प हा दोष नसून, तो एक योग आहे. नागपंचमीला केलेल्या नागपूजनामुळे कालसर्प दोष दूर होऊ शकतो, असे सांगितले जाते. कुंडलीत सर्व ग्रह राहू व केतू यांच्या मध्ये येतात, तेव्हा कालसर्प योग येतो. हा योग ज्यांच्या कुंडलीत येतो, ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम प्रकारे यश प्राप्त करू शकतात. अशा मंडळींना अचानक धनलाभ होतो; उच्चाधिकाराच्या जागा मिळतात.
6 / 12
ज्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत कालसर्प दोष आहे. त्या व्यक्तीला क्वचित प्रसंगी नशिबाची साथ मिळत नाही. यासोबतच त्याला वैवाहिक जीवन आणि करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शास्त्रात नागपंचमीचा दिवस कालसर्प दोषाच्या शांतीसाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. यंदा नागपंचमी दिवशी शिवयोग नावाचा शुभ तयार होत आहे. ज्यामध्ये कालसर्प दोष पूजा शांती सर्वोत्तम मानली जाते.
7 / 12
यंदाच्या वर्षी मंगळवार, ०२ ऑगस्ट २०२२ रोजी पहाटे सकाळी ०५ वाजून १४ मिनिटांपासून श्रावण शुद्ध पंचमी तिथी सुरू होत असून, बुधवार, ०३ ऑगस्ट २०२२ रोजी पहाचे ०५ वाजून ४२ मिनिटांपर्यंत ही तिथी असेल. भारतीय पंचांगानुसार, प्राचीन काळापासून सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा असल्यामुळे ०२ ऑगस्ट २०२२ रोजी नागपूजन करावे, असे सांगितले जाते. नागपंचमी पूजन सकाळी ०६ वाजून ०६ मिनिटे ते ०८ वाजून ४२ मिनिटांपर्यंत करात येऊ शकेल.
8 / 12
नागपंचमीला दोन शुभ योगही तयार होत आहेत. २ ऑगस्ट रोजी शिवयोग आणि सिद्धी योगात नागपंचमी साजरी होणार आहे. या दिवशी सायंकाळी ६ वाजून ३९ मिनिटांपर्यंत शिवयोग राहील. यानंतर सिद्धी योग सुरू होईल. या योगांमध्ये भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. या योगामध्ये रुद्राभिषेक करणे शुभ मानले जाते.
9 / 12
कालसर्प योगामुळे येणारे दोष दूर करण्यासाठी कालसर्प शांत करण्यासह काही सोपे, तर काही घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत. चांदीत तयार केलेले नाग-नागिणीचे जोडपे बनवून त्याची पूजा करावी आणि नंतर ते पाण्यात सोडावे. नारळावर असेच जोडपे बनवून कापडात गुंडाळून पाण्यात सोडावे.
10 / 12
महादेव शंकरावर नाग नसलेल्या मंदिरात जाऊन तेथे नाग प्रतिष्ठा करून नाग अर्पण करावेत. महादेवांना चंदन किंवा चंदनाचे अत्तर लावावे आणि स्वतःलाही नेहमी लावावे. नागपंचमीच्या दिवशी मंदिराची स्वच्छता, डागडुजी आणि दुरुस्ती करून घ्यावी. गोमेद रत्न धारण करावे. नागकृती असलेली अंगठी चांदीत करून धारण करावी. नागपंचमीचे व्रत करावे. राहू-केतूचे जप करणारी अनुष्ठाने करावीत. असे काही उपाय केल्यास कालसर्प दोष दूर होण्यास मदत होऊ शकते, असे सांगितले जाते.
11 / 12
कालसर्प योगामुळे निर्माण होणारा दोष दूर करण्यासाठी 'नागेन्द्र हाराय ॐ नम: शिवाय', या मंत्राचा जपजाप करावा किंवा होमहवन करून घ्यावे. याशिवाय नागपंचमीला नागपूजन झाल्यानंतर 'ॐ नागदेवतायै नम:' आणि नाग देवतेचा गायत्री मंत्र 'ॐ नागकुलाय विद्महे विषदन्ताय धीमहि तन्नौ सर्प प्रचोद्यात्।', याचा जपजाप, पठण करावे.
12 / 12
शंकराला विजया अर्क फुल, धोत्राचे फुल ,फळ अर्पण करावे आणि दुधाचा रुद्राभिषेक करावा. याशिवाय, श्रीविष्णूंची उपासना केल्यास कालसर्प दोष दूर होऊ शकतो. अलाहाबाद किंवा त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे जाऊन पूजा-अनुष्ठान करावे. ज्या व्यक्तींना आपल्या कुंडलीत कालसर्प योग आहे, अशी शंका असल्यास ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊनच उपाय करणे हिताचे ठरू शकते, असे सांगितले जाते.
टॅग्स :Nag Panchamiनागपंचमी