Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 13:04 IST
1 / 14देवपूजा ही देवाची पूजा असली तरी त्यात मन एकाग्र व्हावे यासाठी तो उपचार असतो. धूप, दीप, अगरबत्ती, गंध, अक्षता, पंचामृत स्नान अर्पण करून देवाला फुलं वाहेपर्यंत मनाला देवपूजेत गुंतवून ठेवणे हा त्यामागचा हेतू असतो. मनात विचारांचे थैमान शांत व्हावे म्हणून स्तोत्रपठणाची किंवा श्रवणाची जोड दिली जाते. अशा तऱ्हेने देवपूजा केली तरच देवपूजेचे फळ मिळते. घरात सुख समृद्धी नांदते. त्यासाठी १० महत्त्वाचे नियम जाणून घेऊ. 2 / 14देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते. ही ऊर्जा अधिक कार्यान्वित व्हावी म्हणून देव्हारा ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावा. जर शक्य नसेल तर उत्तर दिशेला असावा. याव्यतिरिक्त देव्हाऱ्याची दिशा नाही ना ते तपासून घ्या आणि आवश्यक बदल करा. 3 / 14देवपूजा करताना नेहमी आसन घ्यावे. देवघर शक्यतो जमिनीवर असावे. जागेअभावी भिंतीवर लावले असेल तर उभ्याने पूजा करतानाही पायाखाली आसन घ्यावे. अन्यथा तुमचे कमावलेले पुण्य वाया जाते. 4 / 14देवाला वाहत असलेले हळद कुंकू आणि अक्षता वेगळ्या ठेवाव्यात आणि आपण स्वतःला लावून घेतो किंवा औक्षणासाठी वापरतो ते हळद कुंकू वेगळे ठेवावे. अक्षता अखंड असाव्यात अर्थात, तांदुळाच्या कण्या अक्षता म्हणून वापरू नये. तसेच कोरड्या कपाळाने देवपूजा न करता कपाळावर गंध, कुंकू लावून मगच पूजेस बसावे. 5 / 14देवाला स्नान घालताना कलशातून पंचपात्रात पाणी घ्यावे आणि दोन्हीमध्ये तुळशीचे पान घालावे. पळीने पाणी घालत देवतांना स्नान घालावे. पंचामृताने किंवा दुधाने थेंब थेंब वाहत पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून, देव पुसून मग देव्हाऱ्यात ठेवावेत. 6 / 14पूजेची भांडी तांबे, पितळ, चांदी किंवा पंचधातूची असावीत पण काचेची, स्टीलची, अल्युमिनियमची वापरू नयेत. शोभिवंत उपकरणी वापरण्यापेक्षा टिकाऊ उपकरणी वापरणे योग्य ठरते. तसेच धातूंची भांडी वेळोवेळी स्वच्छ करून ठेवणे सोपे जाते. 7 / 14देवासमोर लावला जाणारा दिवा किंवा समई स्वच्छ ठेवत जा. त्यात काजळी धरणार नाही याची काळजी घ्या. वेळोवेळी वात बदलून घ्या. तेल, तूप शुद्ध प्रतीचे वापरा. एकाच काडीने तेल आणि तुपाचा दिवा लावू नका. देव्हाऱ्यात मेणबत्तीचा वापर करू नका. 8 / 14सकाळी तुपाचे निरांजन आणि संध्याकाळी तेलाची समई लावा. दोन्ही दिवे एकाच वेळी लावायचे असले तरी दिव्याने दिवा लावू नका. स्वतंत्र काडीचा वापर करा. रोज दिवे उजळणे शक्य नसले तर आठवड्यातून एकदा किंवा अमावस्या, पौर्णिमेला अर्थात दर पंधरा दिवसांनी दिवे उजळून घ्या. म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत आणि दिवे स्वच्छ राहतील. 9 / 14देवघरात एकाचे देवाच्या एकाहून अधिक प्रतिमा, मूर्ती ठेवू नका. ज्या मूर्ती पूजेत वापरल्या जात नाहीत त्यांचे वेळीच विसर्जन करा. देवघरात मोजके पाच देवमूर्ती ठेवा. बाळकृष्ण, अन्नपूर्णा, शिवलिंग, गणपती, दत्तगुरु. याव्यतिरिक्त अन्य देवतांच्या मूर्ती, तसबिरी असतील तर मूर्तीचा प्राधान्यक्रम ठरवा आणि मोजक्याच पण महत्त्वाच्या मूर्ती ठेवून त्यांचे पूजन करा. 10 / 14देवघरातील मूर्ती किंवा तसबीर अभंग अर्थात भंग न पावलेली असावी. ज्या मूर्ती भग्न अवस्थेत असतील, त्या वेळीच विसर्जित करणे किंवा त्यांची डागडुजी करून घेणे महत्त्वाचे आहे. 11 / 14देवाला जी फुलं वाहतो, ती अंगठा, मध्यमा, अनामिका या तीन बोटांचा वापर करूनच वाहावीत. निर्माल्य झालेली फुलं काढून टाकावीत. ताजी फुलं वाहावीत. ताज्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. बाकी काही शक्य नसेल तर गूळ खोबरं, गूळ दाणे किंवा फक्त दूध देवाला दिले तरी तो संतुष्ट होतो. 12 / 14देव्हाऱ्यातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदुळाची आरास करून त्यात ठेवावी. धान्य हे सुबत्तेचे लक्षण आहे. देवीला आपण जे अर्पण करतो ते ती चौपटीने परत करते. म्हणून देवीचे आसन धन, धान्याने परिपूर्ण असावे. 13 / 14देवघरात देवाच्या मूर्तीबरोबरच शंखाचीही पूजा करावी आणि शंखात पाणी भरून ते तीर्थ घरभर शिंपडावे व शक्य तेवढ्या मोठ्याने शंखनाद करावा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. सकारात्मकता निर्माण होते. 14 / 14देवपूजा करताना शक्यतो स्तोत्र म्हणावे, मंत्रोच्चार करावा, १०८ मण्यांची जपमाळ ओढावी आणि किमान एक आरती म्हणत पूजेची सांगता करावी. या सगळ्या गोष्टींना तास दोन तास लागतात असे नाही, थोडीशी पूर्वतयारी, साहित्याचे नियोजन आणि शुद्ध-सात्विक भाव असेल तर देवपूजा यथोचित पूर्ण होऊ शकते.