शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Panchak December 2022: २०२२ चे शेवटचे पंचक कधी लागेल? चुकूनही करु नका ‘ही’ कामे; जाणून घ्या, पंचककाल अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 2:08 PM

1 / 12
भारतीय संस्कृतीत अगदी वैदिक काळापासून ज्योतिषाला विशेष महत्त्व असल्याचे पाहायला मिळते. वैदिक ज्योतिषात ग्रह-नक्षत्रांचा अधिक विचार केला जातो. पंचांगाचे तिथी, वार, योग, ग्रह-नक्षत्र, मुहूर्त, करण मुख्य भाग असून, यामधील पंचक काल सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. (Panchak in December 2022)
2 / 12
पंचक म्हणजे काय? ज्योतिषशास्त्रानसार, पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते. चंद्राचे धनिष्ठा नक्षत्राचे तृतीय चरण आणि शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती या नक्षत्रांमधील भ्रमण कालावधीला पंचक मानले जाते. काही मान्यतांनुसार, या काळात केलेल्या अशुभ कार्यांचा पाचपट प्रभाव पडत असतो. (What is Panchak)
3 / 12
सन २०२२ मधील शेवटचे पंचक डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागणार आहे. पंचक ०५ दिवसांचे असते. या महिन्यात लागणारे पंचक हे अग्नी पंचक असणार आहे. जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा पंचक लागते, अशी मान्यता आहे. यावेळी कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते.
4 / 12
मंगळवार, २७ डिसेंबर २०२२ पहाटे ०३ वाजून ३१ मिनिटांनी पंचक सुरू होईल. ते शनिवार, ३१ डिसेंबर २०२२ सकाळी ११ वाजून ४७ मिनिटांनी संपेल. काही मान्यतांनुसार, दक्षिण दिशेला प्रवास करणे निषिद्ध मानले जाते. पंचकच्या वेळी घराच्या बांधकामात छप्पर घालू नये किंवा छप्पर दुरुस्तीचे, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.
5 / 12
पुराणातील काही उल्लेखांनुसार, रामायण काळात श्रीरामांनी रावणाचा वध केला, तेव्हा पंचक लागले होते. ज्योतिषशास्त्रानुसार, पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ते अशुभ मानले जाते. पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्यासह लगतच्या कालावधीत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असते, असा दावा शास्त्रात केल्याचे पाहायला मिळते.
6 / 12
पंचकाचा खगोल विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास ३६० अंशाच्या चक्रात पृथ्वीच्या ३०० डिग्री ते ३६० डिग्री मध्य भ्रमणाच्या कालावधीला पंचक मानले जाते. पंचक कालावधीत चंद्राचा पृथ्वीवर सर्वाधिक प्रभाव असल्याचे मानले जाते.
7 / 12
पंचक सर्व कार्यांसाठी अशुभ नसते, तर काही कार्यांसाठी पंचक अत्यंत शुभ मानले जाते. या कालावधीत यात्रा करणे, मुंडन कार्य, व्यापार आदी कार्यांसाठी पंचक शुभ मानले गेले आहे. तसेच साखरपुडा समारोह, विवाह आदी शुभ कार्ये पंचक कालावधीत केली जाऊ शकतात.
8 / 12
पंचक कालावधीत जुळून येणाऱ्या शुभ योगांवर केलेल्या काही कार्यांचा सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतो. काहीवेळा धनलाभाचे योगही प्रबळ होऊ शकतात. याशिवाय वाहन खरेदी, गृह प्रवेश, शांती पूजन, मालमत्तेशी संबंधित स्थिर कार्ये करणे पंच कालावधीत शुभ मानली गेली आहेत.
9 / 12
ज्योतिषानुसार, सप्ताहातील प्रत्येक दिवशी लागणाऱ्या पंचकाचा प्रभाव हा भिन्न असतो. पंचक कोणत्या दिवशी लागते, यावर त्याचा प्रभाव कसा आणि किती असेल हे अवलंबून असल्याचे सांगितले जाते. पंचकचा प्रारंभ रविवारी होतो, तेव्हा त्याला रोग पंचक म्हणतात.
10 / 12
पंचक सोमवारी सुरू होते, तेव्हा त्याला राज पंचक म्हणतात. मंगळवारी लागणारे पंचक अग्नी पंचक नावाने संबोधले जाते. बुधवारी आणि गुरुवारी लागणाऱ्या पंचकाला दोषमुक्त पंचक म्हटले जाते. शुक्रवारी सुरू होणाऱ्या पंचकला चोर पंचक म्हटले जाते.
11 / 12
शनिवारपासून लागणाऱ्या पंचकाला मृत्यू पंचक म्हटले जाते. पंचक काळात मृत्यू होणे शुभ मानले जात नाही. पंचक कालावधीत मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या जीवितहानीची शक्यता असते. पंचक दोष लागू नये, यासाठी काही उपाय शास्त्रात सांगितले गेले आहेत.
12 / 12
पंचक कालावधीत कोणाचा मृत्यू झाला, तर ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्याचे अंतिम संस्कार करताना दर्भाचे एक प्रतीक तयार करून त्याचा दाहसंस्कार मृतकासोबत करण्याचे विधान आहे, असे सांगितले जाते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष