शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pitru Paksha 2022: पितृपक्ष काळात केवळ ५₹ला मिळणाऱ्या ‘या’ ५ वस्तूंनी पूर्वजांना करा प्रसन्न; वाचा, महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 3:26 PM

1 / 9
आताच्या घडीला आपल्याकडे पितृ पंधरवडा सुरू आहे. पितृपक्षात आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांच्याकडून शुभाशिर्वाद घेण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. यंदाच्या वर्षी १० सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला असून, २५ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावास्या आहे. (pitru paksha 2022)
2 / 9
भाद्रपद महिन्यातील वद्य पक्ष पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी विशेषत्वाने राखून ठेवण्यात आला आहे. देवतांप्रमाणे पूर्वजांमध्येही शाप आणि वरदान देण्याची शक्ती असते, अशी मान्यता आहे. त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी पितृपक्षात त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करून अन्न आणि पाणी देण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. अगदी रामायण आणि महाभारतातही याचे उल्लेख आढळतात.
3 / 9
वारसांनी अर्पण केलेल्या गोष्टी ग्रहण करून पूर्वज तृप्त होतात आणि प्रसन्न चित्ताने शुभाशिर्वाद देतात, अशीही मान्यता आहे. मात्र, श्राद्ध तर्पण विधी करताना काही गोष्टी या अत्यंत आवश्यक मानल्या गेलेल्या आहेत. या काही गोष्टी पूर्वजांना अर्पण केल्यास त्यांच्या आशीर्वादामुळे जीवनातील समस्या आणि अडचणी दूर होऊ शकतात, असे सांगितले जाते.
4 / 9
धन, धान्य, समृद्धी, ऐश्वर्य घरात येऊन कोणत्याही गोष्टींची कमतरता राहू शकत नाही. पितृदोषाचा प्रभाव ओसरण्यासाही या उपयोगी ठरू शकतात, असे सांगितले जाते. नेमक्या कोणत्या आहे त्या पाच गोष्टी? जाणून घेऊया...
5 / 9
पितृपक्षात तीळ अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहेत. श्रीविष्णूंपासून तीळाची निर्मिती झाली, अशी लोकमान्यता आहे. तीळाला पितृपक्षात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे, असे सांगितले जाते. श्राद्ध विधींमध्ये याचा समावेश केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला समाधान मिळते. कुटुंबातील निधन पावलेल्या व्यक्तीच्या नावाने तीळाचे दान दिले, तर त्या दानातून दानव, असुर, दैत्य यांचा भाग संपुष्टात येतो, ते दान पवित्र होते आणि त्याचे अधिक पुण्य आपल्याला प्राप्त होते, असे सांगितले जाते.
6 / 9
तांदुळाच्या पिंडाला पायस अन्न मानले आहे. तांदूळ अक्षत असावा. म्हणजे तो भंगलेला नसावा. तांदूळ कधीही खराब होत नाही. त्यामधील असलेले गुणधर्म संपत नाहीत. तांदूळ हे थंड प्रकृतीचे असतात. आपल्या पूर्वजांना शांतता लाभावी आणि दीर्घकाळापर्यंत त्यांना समाधान मिळावे, म्हणून पिंड तांदळाच्या पिठाचे केले जाते. म्हणून तीळासह तांदळाचाही समावेश श्राद्ध विधी करताना केला जातो. जवस, काळे तीळ याचेही पिंड बनवू शकतो, असे सांगितले जाते.
7 / 9
दर्भ हे विशिष्ट प्रकारचे गवत असते. दर्भ हे अत्यंत पवित्र मानले जाते. याला पवित्रक असेही म्हणतात. दर्भाचे पवित्रक करून त्याचा वापर केवळ पितृपक्षातील श्राद्ध कार्यात नाही, तर शुभ पूजनावेळीही केला जातो. काही संदर्भांनुसार, दर्भाच्या माध्यमातून देण्यात आलेले जल थेट पितरांपर्यंत पोहोचते, अशी लोकमान्यता आहे. दर्भाच्या समावेशाशिवाय श्राद्ध विधीचे पुण्य प्राप्त होत नाही, असे म्हटले जाते.
8 / 9
वारसांनी अर्पण केलेल्या जलामुळे पूर्वज प्रसन्न होतात, त्यांना समाधान प्राप्त होते. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जल कायम माणसाला उपयोगी पडत असते. पाणी हेच जीवन, असे म्हटलेच आहे. मात्र, मृत्यूनंतरही पाणी महत्त्वाची भूमिका पार पाडत असते, असे सांगितले जाते. तर्पण विधी केल्याने पूर्वज तृप्त होतात. वारसांना आशीर्वाद देतात. यामुळे कुटुंबात धन, धान्याची कमतरता राहात नाही. दर्भात पाणी आणि पाण्यात काही तीळ घालून तर्पण विधी केला जातो, असे सांगितले जाते.
9 / 9
श्राद्ध तर्पण विधी करताना सर्वांत महत्त्वाचे म्हणजे श्रद्धा. श्रद्धापूर्वक केलेल्या श्राद्ध विधीनेच पुण्यप्राप्त होते, असे सांगितले जाते. श्राद्ध विधीमध्ये अन्य सर्व गोष्टी भौतिक आहेत, मात्र, एकच अभौतिक गोष्ट आहे ती म्हणजे श्रद्धा. ज्याच्याशिवाय श्राद्धाला काही महत्त्व राहत नाही. श्रद्धापूर्वक केलेले पूर्वजांचे स्मरण म्हणजेच श्राद्ध होय. पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वज, संस्कृती आणि देवतांविषयी श्रद्धा ठेवावी. पितृपक्षातील श्राद्ध विधी, तर्पण किंवा अगदी दान-धर्म करताना मनात कायम श्रद्धा ठेवावी, असे सांगितले जाते.
टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष