शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२३ ऑक्टोबरला शनी मार्गी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘या’ गोष्टी जाणून घ्या अन् भयमुक्त व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 10:33 AM

1 / 15
ऑक्टोबर महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. केवळ धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या नाही, तर ज्योतिषीय दृष्टिनेही विशेष आहे. या महिन्यात अनेक प्रमुख ग्रह राशीपरिवर्तन किंवा चलनबदल करणार आहेत. यापैकी नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी आपलेच स्वामित्व असलेल्या मकर राशीत मार्गी होणर आहे. (saturn direct in capricorn 23 october 2022)
2 / 15
जुलै महिन्यात शनी वक्री झाला होता. यानंतर आता शनी मकर राशीत मार्गी होत आहे. शनीचे मार्गी होणे शुभ आणि महत्त्वाचे मानले गेले आहे. याचा केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवरही प्रभाव दिसू शकेल, असे सांगितले जात आहे. ऐन दिवाळी म्हणजेच २३ ऑक्टोबर रोजी शनी मार्गी होत असल्याने याचा विशेष प्रभाव काही राशींवर दिसून येईल, असे म्हटले जात आहे. (shani margi in makar rashi 2022)
3 / 15
२३ ऑक्टोबर रोजी शनी मकर राशीत मार्गी होणार असून, यानंतर जानेवारी २०२३ रोजी शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. शनीने वक्री मार्गाने मकर राशीत प्रवेश केल्यावर धनु राशीच्या व्यक्तींवर पुन्हा एकदा साडेसातीचा प्रभाव सुरू झाला. आणि मीन राशीवरील साडेसातीचा प्रभाव अत्यल्प झाला.
4 / 15
शनी हा क्रूर ग्रह असला तरी कर्मकारक आहे. जसे ज्याचे कर्म, तशी फळे त्या त्या व्यक्तीला मिळतात, अशी मान्यता आहे. २३ ऑक्टोबर २०२२ रोजी शनी मकर राशीत मार्गी होईल, तेव्हा साडेसाती चक्रात कोणताही बदल होणार नाही.
5 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की, शनीची दृष्टी शुभ असेल तर व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात प्रगती आणि यश मिळते. शनी ग्रहाला कर्माचे फळ देणारा आणि न्यायाधीश मानला जातो. शनी न्यायाधीश असल्यामुळे त्यांच्याबद्दल असा समज निर्माण झाला आहे की, शनी हा दु:ख, कष्ट देणारा ग्रह आहे. सत्य हे आहे की, शनी देव वय, तांत्रिक क्षमता, समजून घेण्याची क्षमता देणारा ग्रह आहे. घरातील लोकांमध्ये आनंद आणण्याचे कामही शनी करतात.
6 / 15
ज्योतिषशास्त्रात शनी ग्रह मकर आणि कुंभ राशीचा स्वामी मानला गेला आहे. शुक्राच्या तूळ राशीमध्ये शनी उच्च आहे आणि जेव्हा तो मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा तो दुर्बल म्हणजेच नीच होतो. याशिवाय २७ नक्षत्रांपैकी पुष्य, अनुराधा आणि उत्तराभाद्रपद या तीन नक्षत्रांचा स्वामी शनी आहे.
7 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जर शनी लग्न स्थानी असेल तर योग्य मानला जात नाही. लग्न स्थानी शनी असेल तर व्यक्ती पुण्यवान असेल पण कामात खूप धीमी असेल. असे लोक स्वतःमध्येच अडकून राहतात आणि त्यांच्यात मोठ्या स्तरावर विचार करण्याची क्षमता कमी असते.
8 / 15
ज्या व्यक्तीवर शनीचा शुभ प्रभाव असतो, ती व्यक्ती मेहनती, कर्मठ आणि न्यायी असते. शनीच्या कृपेने व्यक्तीला त्याच्या कार्यक्षेत्रात यश मिळते आणि त्याच्या यशाचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाचे वर्णन निळा आणि श्यामला असे केले आहे.
9 / 15
भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत. शनिदेवाचे गुण पाहून महादेवांनी त्यांना नवग्रहांमध्ये न्यायाधीशाचे स्थान दिले. शनीच्या कुटुंबाबद्दल सांगायचे तर, त्याचे वडील सूर्य आणि आई छाया, भाऊ यमराज असून, शनीला सुवर्चला, यमुना आणि भद्रा या तीन बहिणीही आहेत, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
10 / 15
पौराणिक कथेनुसार शनिदेव हे सूर्याचे विरोधी आहेत. ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनीचा संयोग शुभ मानला जात नाही. दोघांमध्ये वैराची भावना असल्याचे सांगितले जाते.
11 / 15
आताच्या घडीला धनु, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींवर साडेसातीचा प्रभाव दिसून येऊ शकेल. धनु राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा, मकर राशीचा मधला टप्पा आणि कुंभ राशीचा पहिला टप्पा सुरू आहे. मात्र, जेव्हा जानेवारी २०२३ रोजी शनी कुंभ राशीत जाईल, तेव्हा साडेसातीत पुन्हा एकदा बदल होईल.
12 / 15
शनीने आपलेच स्वामीत्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर धनु राशीची साडेसाती संपेल. मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. कुंभ राशीचा मधला टप्पा सुरू होईल, तर मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल. धनु राशीनंतर मकर राशीची साडेसाती संपुष्टात येण्यासाठी २०२५ वर्ष उजाडेल.
13 / 15
साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते. स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत. तसेच शनीची उपासना, स्तोत्र पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात.
14 / 15
दुसरीकडे, शनीच्या मार्गी चलनामुळे साडेसातीप्रमाणे जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ पर्यंत पुन्हा मिथुन आणि तूळ राशीवर ढिय्या प्रभाव राहील. तो जानेवारी २०२३ नंतर पूर्णपणे संपुष्टात येईल. यानंतर कर्क आणि वृश्चिक राशीवर ढिय्या प्रभाव असेल. जानेवारी २०२३ मध्ये तो पूर्णपणे लागू होईल.
15 / 15
२९ मार्च २०२५ रोजी शनी कुंभ राशीतून गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. गुरु आणि शनी मित्र ग्रह मानले जातात. शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जातो. करावे तसे भरावे या उक्तीनुसार शनी आपल्या कर्माचे फळ देत असतो, असे सांगितले जाते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य