शनि गोचर: ३ राशींना लाभ, ५ राशींना ताप; किमान २.५ वर्षे ‘हे’ कराच, आयुष्यभर पुण्य-फल कमवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 13:52 IST
1 / 15Saturn Transit In Pisces March 2025: नवग्रहांमध्ये शनि ग्रहाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. शनि हा नवग्रहांचा न्यायाधीश मानला जातो. शनि मंद गतीने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीत शनि तब्बल २.५ वर्षे असतो. त्यामुळे शनिचा प्रभावही अतिशय विशेष मानला जातो. शनि जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा प्रभाव केवळ राशी-नक्षत्रांवर नाही, तर देश-दुनियेवर पडत असतो. अनेक उलथापालथी घडू शकतात. तसेच अनेक सकारात्मक गोष्टीही घडू शकतात, असे मानले जाते. 2 / 15Shani Gochar In Meen Rashi March 2025: २९ मार्च २०२५ रोजी शनि स्वराशीतून म्हणजेच कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर ०२ जून २०२७ रोजी शनि मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. २९ मार्च २०२५ ते ०२ जून २०२७ हा संपूर्ण कालावधी शनि मीन राशीत विराजमान असणार आहे. शनि मीन राशीत विराजमान होताच साडेसाती आणि ढिय्या प्रभाव यांचे चक्रही बदलणार आहे. ३ राशींना मोठा दिलासा मिळणार असून, ५ राशींवर शनिची दृष्टी कायम असणार आहे. 3 / 15शनि साडेसाती आणि ढिय्या प्रभाव अतिशय महत्त्वाचा मानला जातो. साडेसाती म्हणजे अशुभ, प्रतिकूल, वाईट हीच संकल्पना रुजलेली दिसते. साडेसाती शनी ग्रहामुळे येत असल्याने शनी ग्रहाकडेही काहीशा 'वक्र'दृष्टीनेच पाहिले जाते. मात्र, तसे अजिबात नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, साडेसाती हा अनन्यसाधारण महत्त्व असणारा योग आहे. 4 / 15विद्यमान स्थितीत शनी कुंभ राशीत विराजमान आहे. यामुळे मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे. कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. तर, मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. २९ मार्च २०२५ रोजी शनि मीन राशीत प्रवेश केल्यानंतर मकर राशीची साडेसाती संपणार आहे. मीन राशीचा साडेसातीचा मधला म्हणजेच दुसरा टप्पा सुरू होणार आहे. तर मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे. 5 / 15आताच्या घडीला कर्क आणि वृश्चिक राशीवर शनिचा ढिय्या प्रभाव असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, २९ मार्च २०२५ रोजी शनिने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर याचे कोष्टकही बदलणार आहे. कर्क आणि वृश्चिक राशीचा ढिय्या प्रभाव समाप्त होणार आहे. शनि ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर सिंह आणि धनु राशीवर शनिचा ढिय्या प्रभाव सुरू होणार आहे.6 / 15मकर, कर्क आणि वृश्चिक या राशींसाठी दिलासादायक काळ असला, तरी कुंभ, मीन, मेष, सिंह आणि धनु या राशींसाठी मात्र आगामी काळ संमिश्र ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. ज्यांची साडेसाती सुरू आहे, ज्यांच्यावर शनिचा ढिय्या प्रभाव आहे, त्यांनी आवर्जून न चुकता शनि उपासना, शनि संबंधातील उपाय, शनिचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी काही गोष्टींचे नक्कीच पालन करावे, असे सांगितले जाते. नेमके काय करावे? ते जाणून घ्या आणि किमान पुढील २.५ वर्ष संकल्प करून ते पाळण्याचा प्रयत्न करावा, असे केल्यास शनि कृपा सदैव राहू शकेल, असे सांगितले जात आहे.7 / 15साडेसाती आणि ढिय्या प्रभाव सुरू असलेल्यांसाठी काही उपाय अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी ठरू शकतात, असे म्हटले जात आहे. साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते. स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. शनिवारी काहीतरी दान करावे. 8 / 15शनि हा महादेवांना आपले गुरु मानतो, अशी मान्यता आहे. तसेच महादेवांनीच शनिला नवग्रहांचे न्यायाधीश पद दिले आहे, असेही म्हटले जाते. त्यामुळे शनि साडेसाती, ढिय्या प्रभाव, महादशा काळात शक्य तेवढी महादेवांची उपासना, नामस्मरण, मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ मानले जाते. शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते. 9 / 15नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। छायामार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनैश्चरम्॥ हा नवग्रह स्तोत्रातील शनीचा मंत्र आहे. ॥ ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः॥, हा शनीचा बीज मंत्र आहे. ॥ ॐ शं शनैश्चराय नमः॥ हा शनीचा मूलमंत्र आहे. या मंत्रांचा यथाशक्ती जप करावा. यापैकी एका मंत्राचा दररोज १०८ वेळा जप केल्यास उत्तमच. विशेषत: शनिवारी अवश्य करावा. 10 / 15कुंडलीत शनीची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर शनिवारी विशेष व्रत करावे. शनीशी संबंधित वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. तज्ज्ञांचा योग्य सल्ला आणि मार्गदर्शनानंतर शनीचे रत्न नीलम शास्त्रशुद्ध पद्धतीने धारण करावे. 11 / 15शनिवारी शनीदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे. तेलाचा दिवा लावावा. शनीची उपासना, शनी स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनी चालीसा पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात. ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनि धाम यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे. 12 / 15हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत.13 / 15पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे. पिंपळ पूजन, तेथे नियमितपणे दिवा लावणे, शनीच्या आवडत्या वस्तूंचे अर्पण, दान असेही काही उपाय सांगितले जातात.14 / 15शनि हा माणसाचे मन स्वच्छ व शुद्ध करणारा, मनातील कुविचार टाकून उच्चप्रतिला नेणारा हा एकच ग्रह आहे. शनी हा शिस्तीचा पाईक आहे. जे शिस्तबद्ध, विनयशील, नम्र आहेत, त्यांना तो उच्च शिखरावर नेऊन बसवतो. शनी हा कर्मकारक आहे. जीवनाचे मर्म जाणणारा आणि कटू सत्य उघड करून सांगणारा आहे. जे याची अवज्ञा करतील, त्यांना तो खाली ओढतो व माणसाच्या अहंकाराचा नाश करतो. 15 / 15शनि मीन राशीत गोचर करत असताना अनेक अद्भूत योग जुळून येत आहेत. या दिवशी फाल्गुन अमावास्या आहे. शनिवारी ही अमावास्या येत असल्याने याला शनि अमावास्या म्हटले जाते. तसेच शनि प्रवेश करताना मीन राशीत सूर्य, चंद्र, बुध, शुक्र, राहु आणि नेपच्युन ग्रह असणार आहेत. शनीचा प्रवेश झाल्यावर या सर्वांशी शनिचा युती योग जुळून येत आहे. तर कन्या राशीतील केतुशी समसप्तक योग जुळून येईल. या दिवशी सूर्यग्रहणही आहे. त्यामुळे एकूणच २९ मार्च २०२५ या दिवसाचे महत्त्व कैक पटींनी वाढले आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.