sawan somvar 2021 significance of auspicious belpatra while worshiping lord shiva in shravan
Sawan Somvar 2021: श्रावणी सोमवार: शिवपूजनात बेलाचे पान इतके महत्त्वाचे का असते? जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 7:59 AM1 / 11सण-उत्सव, व्रत-वैकल्यांचा, निसर्ग व सात्विकतेशी जोडलेला मराठी महिन्यातील महत्त्वाचा काळ म्हणजे चातुर्मास. चातुर्मासातील प्रत्येक महिन्याचे महत्त्व आणि वैशिष्ट्य वेगवेगळे आहे. श्रावण शिवपूजेला विशेष महत्त्व असते. श्रावणातील प्रत्येक सोमवारचे वेगळे वैशिष्ट्य आहे. 2 / 11देशभरातील कोट्यवधी भाविक या दिवशी विविध शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतात, नामस्मरण करतात, उपासना, आराधना करतात. मात्र, सध्याच्या करोनामुळे धार्मिक स्थळे बंद आहेत. अशावेळी आपण घरीच राहून शिवपूजन करू शकतो. शिवपूजनात बेलाच्या पानाला सर्वाधिक महत्त्व आहे. 3 / 11महाराष्ट्रात सोमवार, ०९ ऑगस्ट २०२१ ते सोमवार, ०६ ऑगस्ट २०२१ या कालावधीत श्रावण मास आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. सप्ताहातील सातही दिवस वेगवेगळी व्रते आचरली जातात. शिवपूजनावेळी बाकी काही नसले आणि केवळ एक बेलाचे पान शंकराला वाहिले, तरी संपूर्ण पूजेचे पुण्य लाभते, अशी मान्यता आहे. (significance of auspicious belpatra)4 / 11श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. यंदाच्या वर्षी ९ ऑगस्ट, १६ ऑगस्ट, २३ ऑगस्ट, ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी श्रावणी सोमवार आहे. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्वही वेगळे आहे.5 / 11देव आणि दानवांनी केलेल्या समुद्र मंथनावेळी विषाचा कलश बाहेर आला. जगत्कल्याणासाठी महादेवांनी ते विष प्राशन केले. त्या विषाचा दाह शंकरांना सहन होईना. तेव्हा बेलाच्या पानाचा वापर करण्यात आला. बेलाच्या पानामुळे विषाचा दाह कमी झाला. बेलाचे पानात विष निवारण करणारे गुण असतात. तेव्हापासून शिवपूजनात बेलाचे पान वाहण्याची परंपरा सुरू झाली, असे सांगितले जाते. 6 / 11एका अन्य पौराणिक कथेनुसार बेलाची तीन पाने ही महादेव शिवशंकराच्या तीन नेत्रांचे प्रतीक आहे. बेलाचे केवळ एक पान अर्पण केले, तरी शिवशंकरांचे कृपाशिर्वाद प्राप्त होतात. म्हणून त्यांना आशुतोष म्हटले जाते, अशी मान्यता आहे. अन्य एका पौराणिक मान्यतेनुसार, बेलाच्या पानाला बह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते. 7 / 11शिवपुराणात बेलाचे पान शिवाचे प्रतीक असल्याचा उल्लेख आढळून येतो. बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करून नियमितपणे त्याचे पूजन केल्यास महादेवाचे विशेष शुभाशिर्वाद प्राप्त होतात, असे सांगितले जाते. बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते.8 / 11एका पौराणिक कथेनुसार, एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली. बेलवृक्षाच्या मूळाशी गिरिजा देवी, खोडात महेश्वर देवी, फांद्यांमध्ये दक्षयायनी देवी, पानांमध्ये पार्वती देवी, फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायणी देवीचा वास असतो, अशी मान्यता आहे. तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो, असेही सांगितले जाते.9 / 11महादेव शिवशंकराचे पूजन करतेवेळी बेलाचे पान वाहताना, ‘त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रिधायुतम्। त्रिजन्म पापसंहारं बिल्वपत्रं शिवार्पणम्॥’, असा मंत्रोच्चार करावा, असे सांगितले जाते. याचा अर्थ असा की, तीन गुण, तीन नेत्र, त्रिशुळ धारण करून तीन जन्मांचे पाप हरणाऱ्या शिवाला हे त्रिदल बेल्वपत्र अर्पण करतो. रुद्राष्टाध्यायी मंत्राचे उच्चारण करून बेलाचे पान अर्पण करण्याला विशेष महत्त्व प्राप्त होते. तसेच ॐ नमः शिवाय मंत्राचा जप करत बेलपत्र वाहणे शुभलाभदायक मानले जाते.10 / 11शिवपुराणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे. तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत, त्या सर्वांचे मूळ बिल्व पत्रात असल्याची मान्यता आहे. बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. 11 / 11काही जाणकारांच्या मतानुसार, बेलाची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे. याशिवाय, चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, संक्रांत आणि अमावास्या या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत, असे सांगितले जाते. तीन पान असलेलेच बेलपत्र शंकराला अर्पण करावे. तीन पाने नसलेले बेलाचे पान शंकराला वाहू नये, असे सांगितले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications