शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shravan 2021: महाभारतातील एक योद्धा ५ हजार वर्षानंतर आजही ‘या’ शिवमंदिरात दर्शनाला येतो? पाहा, मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 1:41 PM

1 / 12
रामायण आणि महाभारत यांना भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण असे महत्त्व आहे. युग लोटले, तरी त्याविषयीची जिज्ञासा, लालसा आणि गोडी कमी होत नाही. महाभारतातील अनेक गोष्टी आजच्या काळातही आपल्याला अचंबित करत असतात. (ashwathama shiva temple story)
2 / 12
व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांनी भारलेला श्रावण महिना सुरू आहे. भारतातील सर्वश्रेष्ठ मानली जाणारी शिवस्थाने म्हणजे १२ ज्योतिर्लिंग. या १२ ज्योतिर्लिंग मंदिरांप्रमाणे देशभरातील छोट्या-बड्या सर्व शिवमंदिरांमध्ये श्रावण महिन्यातील सोमवार उत्साहात साजरे केले जातात.
3 / 12
श्रावणी सोमवारी शिवाला वाहिलेले बेल, अभिषेक यांमुळे महादेवाची विशेष कृपाशिर्वाद मिळतात, अशी मान्यता आहे. आपल्या देशात अनेक अद्भूत आणी अलौकिक मंदिरे आहेत. यामध्ये एक मंदिर असे आहे, ज्याचा थेट संबंध महाभारताशी आहे. या मंदिराचे एक खास वैशिष्ट म्हणजे येथे गेल्या ५ हजार वर्षांपासून दररोज न चुकता महाभारतातील एक योद्धा पूजा करण्यासाठी आणि आपल्या मुक्तीची प्रार्थना करण्यासाठी येतो, अशी मान्यता आहे. (mahabharat ashwathama)
4 / 12
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या सीमेवर वसलेल्या बुऱ्हानपूर जिल्ह्यातील असिरगडावर हे शिवमंदिर आहे. या मंदिराचे नाव असिरेश्वर किंवा गुप्तेश्वर महादेव मंदिर असे आहे. असिरगड किल्ला बुऱ्हानपूरच्या उत्तरेस सुमारे २० कि.मी. सातपुडा डोंगरांच्या शिखरावर आहे.
5 / 12
रामायण आणी महाभारत यांचा थेट संबंध असल्याचे अनेक अवशेष पुरातत्व विभागाला या मंदिर परिसरात मिळाले आहेत. शिवशंकराच्या याच गुप्तेश्वर किंवा असिरेश्वर महादेव मंदिरात महाभारतातील एक महान योद्धा, द्रोणाचार्य यांचा पुत्र 'अश्वत्थामा' दररोज न चुकता दर्शनसाठी येतो, अशी मान्यता आहे. (shiva temple at asirgarh fort)
6 / 12
आजच्या विज्ञान युगात काही जणांना ही गोष्ट हास्यास्पद वाटू शकेल; परंतु, येथे गेल्यावरच आपल्याला कळते की, विज्ञानाच्या पलीकडेही अनेक गोष्टी असतात. महाभारतात अनेक शूरवीर, पराक्रमी योद्धे झाले. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे अश्वत्थामा. गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र असलेला अश्वत्थामा युद्धशास्त्र, शस्त्रास्त्रकलेत अगदी निपुण होता. याशिवाय तो महादेव शिवशंकराचा परमभक्तही होता.
7 / 12
महाभारत युद्धात गुरु द्रोणाचार्य आणि अश्वत्थामा कौरवांच्या बाजूने लढले. पांडवांचे मनोबल एकट्या अश्वत्थामाने खच्ची करण्यास सुरुवात केली, तेंव्हा श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठीरला कुटनीती करण्यास सांगितले. या योजनेनुसार, श्रीकृष्णांनी रणांगणात अश्वत्थामा मारल्या गेल्याची बातमी पसरवली. द्रोणाचार्यांनी जेंव्हा युधिष्ठीराला याबाबत विचारले, तेव्हा युधिष्ठीर म्हणाला की, होय अश्वत्थामा मारल्या गेला.
8 / 12
परंतु, तो मानव होता की हत्ती हे मला माहित नाही. कारण महाभारतात अश्वत्थामा नावाचा एक हत्ती होता. अश्वत्थामा मारला गेल्याचे ऐकताच द्रोणाचार्यांना तीव्र धक्का बसला. पुत्रवियोगाने भावूक झालेल्या द्रोणाचार्यांना काहीच सुचत नव्हते. याचाच फायदा घेत पांचाल पुत्र धृष्टद्युम्न याने आचार्य द्रोण यांचा वध केला. आपल्या पित्याच्या वधाची वार्ता समजताच अश्वत्थामा अतिशय विचलित झाला.
9 / 12
आपल्या पित्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याने सर्व पांडव पुत्रांचा वध करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे, तर अश्वत्थामाने पांडवांचा संपूर्ण वंश नष्ट करण्यासाठी उत्तरेच्या गर्भात वाढत असलेल्या अभिमन्यू पुत्र परीक्षिताला मारण्यासाठी गर्भावर ब्रह्मास्त्र सोडले. श्रीकृष्णाने तात्काळ आपल्या शक्तीचा वापर करत उत्तरा आणि तिच्या गर्भात वाढत असणाऱ्या परीक्षिताचे रक्षण केले.
10 / 12
मात्र, दुसरीकडे अश्वत्थामाच्या या कृतीचा श्रीकृष्णाला अतिशय राग आला. प्रचंड क्रोधात आणि अश्वत्थामाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी श्रीकृष्णाने शाप दिला. या शापानुसार, अश्वत्थामाच्या डोक्यावर भळभळती जखम कायम राहील. ही जखम बरी करण्यासाठी हळद आणि तेल मागत तो युगानयुगे फिरेल. आजच्या काळातही मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात असलेल्या नर्मदा नदीवरील गौरीघाटावर अश्वत्थामा भटकत असतो, अशी मान्यता आहे.
11 / 12
असिरगड येथील मंदिरामध्ये दररोज सकाळी पूजा केली जाते. परंतु, कोणालाही पूजा कोणी केली हे दिसत नाही. येथील स्थानिकांच्या मते, श्रीकृष्णांनी दिलेल्या शापामुळे अश्वत्थामा येथे भटकत असतो. असिरगड किल्ल्यातील तलावात स्नानादी कार्ये उरकून अश्वत्थामा नियमितपणे सकाळी महादेवाच्या पिंडीवर ताजी फुल वाहतात आणि निघून जातात.
12 / 12
तर या गावातील स्थानिक माणसांच्या मते, अनेकांनी अश्वत्थामाला पाहिलेही आहे. मात्र, जी व्यक्ती अश्वत्थामाला पाहते, त्याचे मानसिक संतुलन बिघडते, असा दावाही स्थानिकांकडून केला जातो. त्यामुळे कोणीही सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर या किल्ल्यावर जात नाही, असे स्थानिक सांगतात.
टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलMahabharatमहाभारत