शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Success Mantra: आळस तुमच्या प्रगतीच्या आड येत असेल तर 'हे' दहा उपाय करा आणि यशस्वी व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 5:30 PM

1 / 10
आळशी माणसाला कधीही झोपायला सांगा, त्याची तयारी असते. हा आळस झटकण्यासाठी रात्रीची झोप पूर्ण होणे गरजेचे असते. झोप पूर्ण तेव्हाच होते जेव्हा तुम्ही थकलेले असता. हा थकवा येण्यासाठी सकाळी एक अर्धा तास व्यायाम आणि संध्याकाळी एक तास चालायला जा. रात्री पाठ टेकवतात पाच मिनिटात गाढ झोप लागेल आणि सकाळी आपोआप जाग येऊन नव्या दिवसाचे स्वागत करायला तुम्ही सज्ज व्हाल. आळस झटकायचा असेल तर नियमित व्यायामाची सवय लावून घ्या म्हणजे झोपेचे चक्र आपोआप सुधारेल. मेंदू आणि शरीराला आराम मिळाला की नवा दिवस उत्साहाने सुरू होईल.
2 / 10
सकाळी उठल्यावर चहा घेता घेता ऍक्युप्रेशर किटमधील काही यंत्रांचा वापर करा. त्यात बोटांमध्ये फिरवता येणारी अंगठी असते. काटेरी बोर्ड असतो, त्यावर उभे राहिल्याने मेंदूपर्यंत त्याच्या संवेदना पोहोचतात. झोप उडते, आळस जातो. ऍक्युप्रेशर किट मधील आणखीही उपकरणांचा वापर करून शरीराच्या सर्व नसा मोकळ्या होतात. त्यामुळे आपली ऊर्जा दहा पटींनी वाढते.
3 / 10
सकाळी झोपून उठल्यावर नुसते तोंड धुवू नका, तर पाण्याचा हबका मारा. त्यामुळे झोप उडतेच शिवाय आळसही निघून जातो. गार पाण्याचा हबका मारल्याने चेहऱ्याला तजेला येतो आणि मेंदूपर्यंत संवेदना पोहोचून आळस शरीरात शिरकाव करत नाही.
4 / 10
सकाळी उठल्यावर २० मिनिटांच्या आत कोणतेही फळ खा. चहा /कॉफीपेक्षा दिवसाची सुरुवात फळ खाऊन करणे केव्हाही चांगले. चहा कॉफीमध्ये साखरेचा वापर असल्याने तात्पुरती ऊर्जा मिळू शकते, पण पुन्हा काही वेळाने आळस चढू शकतो. याउलट फळातून येणारी ऊर्जा दीर्घ काळ टिकते. सकाळच्या वेळी आपली चयापचय शक्ती कमकुवत असल्याने फळांनी दिवसाची सुरुवात केल्यास या क्रियेला योग्य चालना मिळते.
5 / 10
घरात जसे वातावरण असेल त्याचे पडसाद मनावर उमटतात. घरात अस्वच्छता असेल, अंधार असेल, पसारा असेल तर अशा वातावरणात केवळ आळसच येईल. तिथे काम करण्याचा उत्साह वाटणार नाही. यासाठी घरात किंवा कामाच्या ठिकाणी तुमची बैठक व्यवस्था जिथे असेल तिथले वातावरण प्रसन्न ठेवा. आपोआप काम करण्यासाठी लागणारा उत्साह वाढेल. घराप्रमाणेच देहाची स्वच्छताही महत्त्वाची आहे. देहाची, कपड्यांची स्वच्छता आळस दूर करते.
6 / 10
दर वेळी खूप मोठे ध्येय असायला हवे असे नाही. छोटे छोटे ध्येय आखून त्याची पूर्तता केल्यानेसुद्धा ऊर्जा मिळते. याउलट मोठे आणि अवास्तव ध्येय पूर्ण न झाल्याने निराशा पदरात पडून आळस येऊ शकतो. म्हणून गोगलगायीच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा. ध्येय नसेल तर शरीरातील ऊर्जा वाया जाईल, नको त्या ठिकाणी कामी येईल. त्याऐवजी ती ध्येयाप्रती केंद्रित करा.
7 / 10
अशक्य काहीच नसते. मात्र आपली गुणवत्ता, परिस्थिती पाहून संकल्प आखायचे असतात. एकदा का संकल्प निश्चित झाला आणि तो किती काळात पूर्ण करायचा याचा कालावधी ठरवला की मेंदूला स्पष्ट चित्र दिसते आणि त्यादृष्टीने शरीर थकू न देता मेंदू ध्येयपूर्तीच्या सूचना सतत देत राहतो.
8 / 10
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिवसभरात आपल्याला कोणकोणती कामं करायची आहेत याचा आराखडा आपल्या डोळ्यासमोर तयार असला पाहिजे. त्याची आखणी आदल्या रात्री करून ठेवली पाहिजे. तसे नसेल तर दिवस वाया जाईल.काहीच न सुचल्याने आळस येईल आणि आपण एकाच जागी पडून राहू. मात्र कामाची आखणी केलेली असेल तर आळस यायला वेळच मिळणार नाही.
9 / 10
आळस तेव्हा येतो, जेव्हा आपल्या डोक्यात एकाच वेळी शंभर विचार गर्दी करतात. तेव्हा कोणत्या विषयाला न्याय द्यायचा हा गोंधळ निर्माण होऊन आपण कोणत्याच कामाला पूर्ण न्याय देऊ शकत नाही. परिणामी आळस चढतो आणि आपण कार्यशून्य अवस्थेत जातो. यासाठी एकावेळी एक काम, एकावेळी एक विचार असे करण्याला प्राधान्य द्या. मेंदूमध्ये विचारांची स्पष्टता जितकी अधिक असेल तेवढी कार्यक्षमता वाढेल.
10 / 10
अनेकदा आपण उत्साहाने एखादी गोष्ट करतो आणि ती यशस्वी न झाल्यास हात पाय गाळून ढेपाळतो. अशा वेळी थोडा संयम बाळगा, मनाला उभारी द्या. अपयश आले म्हणून हार न मानता प्रयत्न करत राहा. तुमचे जे ध्येय असेल त्यादृष्टीने प्रगती करण्यासाठी दिवसाच्या सुरुवातीचा एक तास मोबाईल मध्ये वाया न घालवता तुमच्या ध्येयाला समर्पित करा. मन मनोरंजनाच्या मागे धावेल त्याला नियंत्रित करा. संयम बाळगा. आळसावर नियंत्रण राहील!