शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सतत सकारात्मक राहण्यासाठी 'पाच' उपाय करून बघा, बदल नक्कीच घडेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 9:00 AM

1 / 5
रोज सकाळी उठल्यावर स्वसंवाद साधण्याची सवय लावून घ्या. दिवसभर आपण अनेक लोकांशी बोलतो, पण स्वत:शी आपले बोलणे होतच नाही. मनात विचार सतत सुरू असतात, परंतु तो काही संवाद नाही. त्या विचारांच्या लाटा असतात. त्या येत जात राहतात. त्या विचारांना सकारात्मकतेची जोड द्यायची असेल, सकाळी उठल्यावर स्वत:शी छान बोला. जसे की, माझा आजचा दिवस मस्त जाणार आहे. मी माझ्या ध्येयाच्या दिशेने योग्य वाटचाल करत आहे. मी सर्वांशी आनंदाने वागण्याचा चांगला प्रयत्न करत आहे. अशा सूचना थेट मेंदूपर्यंत पोहोचतात आणि त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या विचारांवर, व्यक्तीमत्त्वावर आणि सबंध दिवसावर होतो. म्हणून उठल्या उठल्या लोकांना प्रबोधनाचे संदेश पाठवण्याआधी स्वत:च्या मनाला छान संदेश द्या.
2 / 5
आपण सतत वाईट गोष्टी उगाळत बसतो. परंतु प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या गोष्टीही घडलेल्या असतात. दु:खं कुरवाळण्याच्या नादात चांगल्या गोष्टींचा आपल्याला विसर पडतो. म्हणून एका वहीत किंवा एका कागदावर तुमच्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या १०० गोष्टी लिहून काढा. जेव्हा कधी तुम्हाला निराशा जाणवेल, तेव्हा त्या यादीची उजळणी करा. तुम्हाला नक्कीच हुरूप येईल. निराश नसतानाही चांगल्या गोष्टी सातत्याने आठवत राहा, लिहित राहा. त्यामुळे तुमच्या मनाला चांगल्या गोष्टी आठवण्याचा सराव होईल आणि आपोआप तुमच्या वागणुकीतूनही सकारात्मकता जाणवू लागेल.
3 / 5
जे घडून गेले, ते आपण बदलू शकणार नाही. मग ते आठवून पश्चात्ताप का करत बसायचा? त्यापेक्षा भूतकाळातील चुकांवर हसायला शिका. आपण केलेल्या बालिश चुका आणि वयपरत्वे आपल्यात आलेले शहाणपण यांची तुलना करून भूतकाळातील चूका आठवून मोठ्या मनाने स्वत:ला माफ करा. यशस्वी लोकांचे चरित्र ऐकले, वाचले तर तुमच्या लक्षात येईल, की त्यांनी आपल्या चुकांचा बाऊ न करता तो विनोदी किस्सा म्हणून न घाबरता लोकांना सांगितला. ज्या दिवशी दुसऱ्यांवर हसण्याऐवजी आपण स्वत:च्या चूकांवर हसायला शिकू, त्यादिवसापासून आयुष्याकडे सकारात्मकतेने बघण्याचा दृष्टीकोन आपल्याला आपोआप मिळेल.
4 / 5
संकट कधीच एकटे येत नाही, तर सोबत संधी घेऊन येते, असे म्हणतात. परंतु आपण संकट निवारण्यात एवढे अडकून जातो, की आपल्याला संकटात लपलेली संधी दिसत नाही. मनुष्य ध्येयप्राप्तीच्या ध्यासामुळे यशस्वी होतो, नाहीतर एखाद्या मानहानीच्या प्रसंगातून स्वत:ला सिद्ध करण्याच्या प्रयत्नांमुळे यशस्वी होतो. याचाच अर्थ, प्राप्त परिस्थितीत संधी शोधण्याचा तो प्रयत्न करतो आणि संधी नसेल, तर ती निर्माण करतो आणि यशस्वी होतो. यातून आपल्याला प्रत्येक अडचणीतून, संकटांमधून संधी शोधण्याचा सराव होतो.
5 / 5
तुम्ही ज्यांना आदर्श मानता त्यांच्यासारखा विचार करण्याचा प्रयत्न करा. जसे की एखाद्या अडचणीत सापडल्यावर तुम्ही ज्या पद्धतीने विचार करत आहात, तसा विचार न करता, तुमची आदर्श व्यक्ती त्याक्षणी कशी वागली असती? त्यांनी प्रसंग कसा हाताळला असता? त्यांनी मार्ग कसा काढला असता? एका प्रश्नाला अनेक बाजू असतात. आपण फक्त एका बाजूने विचार करतो. मात्र, एखाद्या गोष्टीचा आपण सर्वांगीण विचार करायला शिकतो, तेव्हा प्रश्नाची उकल आपोआप होत जाते. हे साधे सोपे उपाय जरूर करून बघा, विचार बदला, आयुष्य बदलेल.