शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कधी सुरु झाले, किती वर्ष झाली? कलियुग संपण्याबाबत समोर आली ५ मोठी भाकिते; वाचा तज्ज्ञांचे मत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 10:13 AM

1 / 15
भारतात युग ही संज्ञा घटनांच्या काळाचा बोध करून देण्यासाठी वापरली जाते. पुराणकथात्मक आणि ऐतिहासिक अशा दोन्ही प्रकारच्या घटनांचे वर्णन करताना युग ही एकच संज्ञा वापरण्यात आली आहे. भारतीय पुराणांमध्ये कालक्रम दर्शविण्यासाठी कृत किंवा सत्, त्रेता, द्वापर व कली अशी चार युगे मानली आहेत. कलियुगातनंतर पुन्हा नव्याने कृतादी युगांचा क्रम सुरू होतो. ही चक्राकार कालगती अनादिकाळापासून चालत आली असून अनंतकाळपर्यंत चालणार आहे, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
2 / 15
द्वापर, त्रेता व कृत यांचा कालखंड कलियुगाच्या अनुक्रमे दुप्पट, तिप्पट व चौपट असतो, असे सांगितले जाते. युगाच्या कालावधीप्रमाणे मानवाचे आयुर्मान, धर्म, तेज, सामर्थ्य, सद्‌गुण इ. विविध बाबतीत आधीच्या युगांपेक्षा नंतरच्या युगांमध्ये क्रमशः ऱ्हास झाल्याचे आढळते. पुराणांनी युगांच्या विविध वैशिष्ट्यांची भरपूर वर्णने केली आहेत.
3 / 15
आताच्या घडीला कलियुग सुरू आहे. बौद्ध धर्मानुसार युगांचा क्रम कलियुग ते कृतयुग व पुन्हा कृतयुग ते कलियुग असा असल्यामुळे महायुगात आठ युगे असतात. जैन धर्मानुसार काल हे बारा आऱ्याचे म्हणजे युगांचे एक चक्र असून त्या चक्राच्या उतरत्या भागाला अवसर्पिणी व चढत्या भागाला उत्सर्पिणी म्हणतात.
4 / 15
अमरत्व वा दीर्घायुष्य, ईश्वरसान्निध्य, सुखातिशय, अधर्माचा व दुर्गुणांचा अभाव इत्यादींनी युक्त असलेले पूर्वीचे सुवर्णयुग आता उरले नाही, अशा अर्थाच्या पुराणकथा जगातील इतर अनेक समाजांमध्येही आढळतात. कलियुगात नीतीमत्ता, मानवता, मानवी मूल्ये, निसर्ग यांचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होताना पाहायला मिळत आहे. आधीच्या युगांप्रमाणे या युगातही भगवान अवतार घेऊन दुःख नाहीशी करतील, असा समज आहे.
5 / 15
देशातील अनेक ठिकाणे अशी दाखवली जातात, ज्यांचा संबंध कलियुग आणि कलियुगाच्या अंताशी जोडलेला पाहायला मिळतो. परंतु, हे कलियुग कधी संपुष्टात येणार, असा प्रश्न अनेकांना पडतो. कलियुग कधी सुरू झाले, कलियुगाचा अंत कधी होणार, एकूण किती वर्षांचे कलियुग असणार आहे. भविष्यातील कलियुगात माणसांना आणखी काय काय पाहायला लागणार, याविषयी पुराणात काही गोष्टी काढळून येतात.
6 / 15
वेद, पुराणे, उपनिषदे, रामायण, महाभारत, भागवत यांमध्ये भविष्यातील घटनांचा उल्लेख किंवा केलेले भाकित आढळून येते. पुराणांपैकी एक असलेल्या विष्णू पुराणातही कलियुगाबाबत काही भविष्यवाणी करण्यात आल्याचे सांगितले जाते. हे उल्लेख अद्भूत, आश्चर्यकारक आणि चकीत करणारे असल्याची मान्यता आहे. तीन युगांमध्ये सर्वांत कमी वर्षे असलेले युग हे कलियुग मानले जाते.
7 / 15
कलियुगाचा अर्थ विचारात घेतला तर, कलियुग म्हणजे अंधकारमय युग म्हणजे सावली किंवा आभासी युग. कलियुग म्हणजे कलह आणि संकटाचे युग. प्रत्येक जीवाचे मन असंतोषाने भरलेले असते. प्रत्येकाच्या मनात विनाकारण एकमेकांबद्दल द्वेष असेल, असे हे युग मानले गेले आहे. या सर्वांची प्रचिती आपल्याला दररोज येत असते.
8 / 15
महाभारतानंतर अशा अनेक अप्रिय घटना घडल्या, त्यानंतर कलियुगाच्या आरंभाचा वेग वाढला. पांडवांचे स्वर्गारोहण झाले. श्रीकृष्णाने अवताराची सांगता केली. यदुवंशी कुळाचा नाश झाला, अशा घटना कलियुगाच्या आगमनाच्या खुणा ठरल्याचे म्हटले जाते. कलियुगाची सुरुवात इ.स.पूर्व ३१०२ मध्ये झाली. कलियुग कधी संपणार, याचे वर्णन श्रीमद् भागवत पुराण, विष्णु पुराण आणि भविष्य पुराणात आहे.
9 / 15
पुराणांच्या आधारे कलियुगाच्या सांगतेबाबत बोलायचे झाले तर कलियुग एकूण ४,३२,००० वर्षे असणार आहे. सध्या कलियुगाचा पहिला टप्पा सुरू आहे. आता कलियुगाची ३१०२+२०२४=५१२६ वर्षे झाली आहेत. याचा अर्थ कलियुगाची फक्त ५ हजार वर्षे झाली आहेत. अजून ४,२६,८८२ वर्षे बाकी आहेत. सद्य परिस्थिती कलियुग संपायला लाखो वर्षांचा काळ जायचा आहे.
10 / 15
काही मान्यतांनुसार, कलियुगाच्या सांगतेसाठी यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. भूलोकामध्ये म्हणजेच मानव राहत असलेल्या पृथ्वीवर आणि स्वर्गलोकामध्ये जेथे देव राहतात तेथे काळ वेगवेगळ्या वेगाने फिरतो. मनुष्याचा एक महिना हा पूर्वजातील एका दिवसाच्या बरोबरीचा असतो. मानवांचे एक वर्ष देवतांसाठी एक दिवस समान आहे. जेव्हा मनुष्य पृथ्वीवर ३० वर्षे पूर्ण करतो, तेव्हा स्वर्गातील देवतांसाठी हा एका महिन्याच्या काळ असतो.
11 / 15
कलियुग होऊन फक्त पाच हजार वर्षे झाली आहेत. हा काळ कलियुगाचा पहिला टप्पा आहे. विष्णुपुराण व्यतिरिक्त ब्रह्मवैवर्त पुराणात कलियुगाच्या सांगतेची मर्यादा सांगितली आहे. कलियुगाबाबत विविध पुराणांमध्ये भाकिते करण्यात आली आहेत. तसेच अनेक धार्मिक विद्वानांनी भविष्यावाणी केली आहे. तसेच कलियुगातील पुढील काळ कसा असू शकतो, याबाबत दाखले दिले आहेत.
12 / 15
यापैकी भविष्यवाणी कलियुगाच्या शेवटच्या टप्प्याबद्दल इशारा देते. जर आपण आपले कर्म सुधारले नाही आणि धार्मिकतेच्या मार्गावर चाललो नाही, तर आपल्या भावी पिढ्यांची खूप वाईट परिस्थिती होईल. विष्णु पुराणात नोंदलेली ही भविष्यवाणी आपण आपल्या जीवनात काय करत आहोत, याचा विचार करायला भाग पाडते. आपल्या कर्माकडे लक्ष देऊन धर्माच्या मार्गावर चालले पाहिजे, असा दावा केला जातो.
13 / 15
काही धर्मपंडितांचे असे मत आहे की, कलियुगाच्या शेवटी प्रदूषण, वातावरणातील बदल आणि पृथ्वीवरील असमतोलामुळे मानवाच्या शारीरिक रचनेत बदल होईल. त्यामुळे येणाऱ्या भविष्यात मानवाचे सरासरी वय अतिशय कमी असेल. कलियुगाच्या अखेरच्या टप्प्यात मनुष्य १२ ते २० वर्षे एवढाच जगेल, असा दावा केला जातो.
14 / 15
विष्णु पुराणानुसार, कलियुगाच्या शेवटी पृथ्वीवर अनेक प्रकारचे बदल घडतील. माणसे किरकोळ आजारांशीही लढू शकणार नाहीत आणि मृत्यूचे प्रमाण वाढेल. विष्णु पुराणाच्या भाकितानुसार, पृथ्वीवर सर्वत्र दुष्काळ पडेल. अन्नधान्य कुठेही उगवणार नाही. उष्णतेची तीव्रता वाढेल. चारही ऋतुंचे परिणाम तीव्र असतील. प्रचंड पाऊस पडेल, खूप उष्णता वाढेल. रक्त गोठवणारी थंडी पडेल. ही सर्व चिन्हे कलियुगाच्या सर्वोच्च पातळीवरील असतील, असे दावे केले जात आहेत.
15 / 15
- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :spiritualअध्यात्मिक