होम-हवन, यज्ञ आहुतीवेळी ‘स्वाहा’ का म्हणतात? पाहा, पौराणिक ग्रंथातील महत्त्व, मान्यता व कथा By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 11:34 AM
1 / 12 भारतात धर्म आणि संस्कृतीत वैदिक उपचारांनाही अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा, चालिरिती अशा आहेत, ज्या प्राचीन काळापासून सुरू आहेत. गेली अनेक दशके सुरू असल्यामुळे आपण त्या त्याच पद्धतीने पाळतो, साजऱ्या करतो. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या चार वेदांमध्ये माणसाच्या जन्मापासून ते दशक्रिया विधींपर्यंतचे अनेक उपचार सांगण्यात आले आहेत. (homa havan) 2 / 12 कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना होम-हवन, यज्ञ-याग करण्याची प्रथा, परंपरा आहे. उदा. नवीन घर घेतले तर वास्तुशांती करताना होम करतात. तसेच मोठे पूजाविधी करतानाही अनेकदा होम-यज्ञ केले जाते. प्राचीन काळी एखादी सिद्धी प्राप्त करण्यासाठीही यज्ञ-याग केले जायचे. असे होम-हवन करताना मंत्रोच्चारानंतर स्वाहा म्हटले जाते. (swahakar) 3 / 12 वास्तविक पाहता स्वाहा करणे म्हणजे अर्पण करणे होय. मात्र, स्वाहा का म्हटले जाते; या उपचारामागील नेमका अर्थ काय; याचे महत्त्व काय, याबाबत पौराणिक ग्रथांमध्ये उल्लेख असल्याचे सांगितले जाते. काही ग्रंथांनुसार, स्वाहाचा अर्थ योग्य पद्धतीने पोहोचवणे, असाही देण्यात आला आहे. स्वाहाकार केल्याशिवाय होम, यज्ञ पूर्ण होत नाही, असेही म्हटले जाते. (yadnya rituals) 4 / 12 अनेक ग्रंथ आणि पुराणांमध्ये स्वाहा शब्दाचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय अनेक कथांमध्ये स्वाहाचा उल्लेख सापडतो. होम-हवन करताना देण्यात येणारी आहुती यज्ञात स्वाहा केली जाते. काही पौराणिक कथांमध्ये याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. कोणत्याही होम-हवन, यज्ञ-यागावेळी देवतांचे स्मरण केले जाते. त्यांचे आवाहन करून त्यांचे आशिर्वाद घेतले जातात. 5 / 12 हवनात अर्पण केलेली आहुती देवतांपर्यंत पोहोचवली जाते. फळे, मध, तूप, काष्ट, विविध सामुग्रींची आहुती दिली जाते. हवनातील आहुती देवतांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचावी, यासाठी अग्नीचा वापर केला जाऊ लागला. अग्नि मनुष्याला देवतांशी जोडणारे माध्यम आहे, असे म्हटले जाते. 6 / 12 मनुष्य हवनात जी आहुती देतो, ती आहुती देवतांपर्यंत पोहोचवण्याचे काम अग्नि करतो, असे सांगितले जाते. यासंदर्भात एक पौराणिक कथाही आढळून येते. एका पौराणिक कथेनुसार, राजा दक्ष यांची कन्येचे नाव स्वाहा होते. राजा दक्षने अग्निदेवाशी आपली कन्या स्वाहा हिचा विवाह करून दिला. याशिवाय स्वाहा प्रकृतीची एक कला आहे, स्वाहाला श्रीकृष्णाचे वरदान प्राप्त होते. 7 / 12 स्वाहाच्या माध्यमातूनच यज्ञात अर्पण करण्यात आलेली आहुती देवतांपर्यंत पोहोचेल, असे वरदान श्रीकृष्णाने दिले होते. याशिवाय अग्नि देवाला हविष्यवाहक म्हटले जाते. अग्नि व स्वाहाचे पावक, पवमान आणि शुचि नामक तीन पुत्र होते. 8 / 12 एका कथेनुसार, एक काळ असा होता. जेव्हा देवतांकडे अन्नपदार्थांची चणचण भासू लागली. ब्राह्मणांकडून देण्यात येणारी आहुती देवतांपर्यंत कशी पोहोचेल, याचा विचार ब्रह्मदेव करू लागले. त्यावेळी अग्निदेवाकडे भस्म करण्याची क्षमता नव्हती. 9 / 12 म्हणूनच ब्रह्मदेवांनी मूळ प्रकृतीचे आवाहन केले. ब्रह्म देवासमोर स्वाहा नामक देवी प्रकट झाली. होम-यज्ञातील मंत्रोच्चारानंतर देण्यात येणारी आहुती भस्म करावी; जेणेकरून ती आहुती देवांपर्यंत पोहोचेल, अशी सूचना ब्रह्मदेवांनी त्या देवीला केली. 10 / 12 ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून स्वाहा देवी अग्निदेवासोबत विराजमान झाली. होम-यज्ञ करताना देण्यात येणारी आहुती स्वाहा भस्म करू लागली आणि ती आहुती देवतांपर्यंत पोहोचू लागली. तेव्हापासून मंत्रोच्चार, आहुती दिल्यानंतर स्वाहा म्हणण्यास सुरुवात झाली. 11 / 12 मंत्रोच्चार, आहुतीनंतर स्वाहा म्हटल्यामुळे अग्निदेवतेला आहुती भस्म करण्याची शक्ती प्राप्त होते, असे म्हटले जाते. होम-हवन, यज्ञ-यागात गोड पदार्थांचा समावेश केला जातो. यामुळे देवता संतुष्ट होतात, अशी मान्यता आहे. 12 / 12 याशिवाय सर्व वैदिक आणि पौराणिक संदर्भ अग्निदेवतेला अर्पण करण्यात आलेले मंत्रोच्चार आणि स्वाहाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहुती देवतांपर्यंत पोहोचते, याला दुजोरा देण्यात आला आहे. या आणि अशा काही मान्यता आपल्या परंपरांमध्ये असल्याचे सांगितले जाते. आणखी वाचा