शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विना फंडिंग ५ वर्ष चालवली कंपनी, शेअर बाजारातही बसला फटका; अशी उभी केली १० हजार कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 9:33 AM

1 / 8
एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर मोठं यश नक्कीत मिळू शकतं. जेव्हा स्वप्नं मोठी असतात आणि त्यासाठी नियोजन योग्य पद्धतीनं केलं जातं तेव्हा यश नक्कीच मिळतं. CarDekho.Com चे सह-संस्थापक आणि सीईओ अमित जैन यांनी असंच काहीसं केलं आहे. अमित यांनी त्याचा भाऊ अनुराग जैन यांच्यासोबत सुरू केलेल्या कंपनीला कठोर परिश्रम आणि संघर्षातून यशाच्या शिखरावर नेलंय.
2 / 8
CarDekho.com ही युनिकॉर्न कंपनी बनवण्यासाठी अमित जैन यांनी मोठी मेहनत घेतली. ही कंपनी सुरू करण्याआधी अमित यांनी अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम केलं आणि आपला कौटुंबिक व्यवसाय पुढे नेला. मात्र, कौटुंबिक व्यवसायात ते यशस्वी होऊ शकले नाही. अमित जैन यांनी आयुष्यात एवढे मोठे यश कसं मिळवलं ते आपण जाणून घेऊ.
3 / 8
अमित जैन यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९७६ रोजी जयपूर येथे झाला. अमित जैन यांचे वडील आरबीआयमध्ये अधिकारी होते. दागिन्यांचाही त्यांचा कौटुंबिक व्यवसाय होता. अमित जैन आणि त्यांचे भाऊ वेगवेगळ्या कंपनीत काम करत होते.
4 / 8
अमित टीसीएसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत होते. यानंतर त्यांनी ट्रिलॉजीमध्येही काम केलं. मात्र वडिलांची तब्येत बिघडल्याने दोन्ही भाऊ नोकरी सोडून घरी आले. मायदेशी परतून कौटुंबिक व्यवसाय हाती घेण्याऐवजी त्यांनी काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला.
5 / 8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमित जैन आणि त्यांच्या भावाला एकदा शेअर मार्केटमध्ये सुमारे १.५ कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. त्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. मात्र, त्यांनी हार न मानता पुन्हा सुरुवात केली. अमित जैन हे रतन टाटा यांना त्यांचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक मानतात.
6 / 8
अमित जैन आणि त्यांच्या भावानं मिळून २००७ साली ‘गिरनारसॉफ्ट’ ही आयटी सेवा कंपनी सुरू केली. गिरनारसॉफ्टमध्ये ऑर्डर मिळवण्यासाठी त्यांनी अनेक कंपन्यांना ई-मेल लिहले, मोठ्या प्रयत्नांनंतर त्यांना ५० हजार रुपयांची पहिली ऑर्डर मिळाली. अमित जैन आणि त्यांच्या भावाला वाहनांची आवड होती, म्हणूनच ते २००८ मध्ये दिल्लीच्या प्रगती मैदानावर आयोजित इंटरनॅशनल ऑटो एक्सपोला गेले होते. येथे त्यांना वेगवेगळ्या कार्सबद्दल माहिती मिळाली.
7 / 8
यानंतर त्यांनी २००८ मध्ये CarDekho नावाचं पोर्टल सुरू केलं, ज्याद्वारे तुम्ही कारची किंमत, तिचे मॉडेल आणि फीचर्सची माहिती मिळवू शकता. यासह तुम्ही या सर्व महत्त्वाच्या बाबींबद्दल कार्सची तुलनाही करू शकता.
8 / 8
२०२१ मध्ये, त्यांच्या कंपनीचं मूल्य १.२ अब्ज डॉलर्स होतं. आजच्या एक्सचेंज रेटनुसार ते १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अमित जैन यांची स्वतःची संपत्ती आज २,९०० कोटी रुपये आहे. ते शार्क टँक इंडियामधील सर्वाधिक नेटवर्थ असलेले जज आहेत.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीbusinessव्यवसाय