शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ABG Shipyard Bank Fraud: देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा बँक घोटाळा; नेमका घडला कसा? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 1:49 PM

1 / 10
देशात पुन्हा एकदा बँक घोटाळा समोर आला आहे. तब्बल २२ हजार ८४२ कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा बँक घोटाळा असंही म्हटलं जाऊ शकतं. सरकारी बँक SBI नं याबाबत सीबीआयकडे अधिकृत तक्रार दिली आहे.
2 / 10
७ फेब्रुवारी २०२२ रोजी CBI नं या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. हा फसवणुकीचा आरोप ABG शिपयार्ड कंपनीवर करण्यात आला आहे. CBI नं या प्रकरणी एबीजी कंपनीचे अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल(Rishi Kamlesh Agarwal) यांच्यासह ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
3 / 10
या सर्व आरोपींविरोधात सीबीआयनं गुन्हेगारी षडयंत्र, फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. १९८५ मध्ये सुरु झालेली एबीजी शिपयार्ड कंपनी जहाज बनवण्याचं आणि त्याची दुरुस्ती करण्याचं काम करते. नेमकं काय फसवणूक झाली हे जाणून घेऊया.
4 / 10
जानेवारी २०१९ रोजी फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टवर चर्चा झाली. त्यात एबीजी शिपयार्डला कर्ज देणाऱ्या बँकांचा समावेश होता. या बैठकीत बँकांनी कंपनीला फ्रॉड असल्याचं म्हटलं. बैठकीत समोर आलं की, एबीजी शिपयार्डनं एप्रिल २०१७ ते जुलै २०१७ पर्यंत विविध २८ बँकांमधून व्यवहाराच्या नावाखाली २२,८४२ कोटी कर्ज घेतले.
5 / 10
तसेच कंपनीने बँकांकडून मिळालेल्या कर्जाच्या रक्कमेचा योग्य वापर केला नाही. एबीजी शिपयार्डनं उद्योगाच्या नावाखाली कर्ज घेत संपत्ती बनवली आणि दुसऱ्या कामासाठी त्याचा वापर केला. ८ नोव्हेंबर २०१९ रोजी एसबीआय बँकेने सीबीआयकडे तक्रार नोंदवली.
6 / 10
१२ मार्च २०२० रोजी सीबीआयनं काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितलं. २५ ऑगस्ट २०२० रोजी एसबीआयनं पुन्हा या प्रकरणी CBI कडे तक्रार दाखल केली. एसबीआयची तक्रार मिळाल्यानंतर जवळपास ३ वर्षांनी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
7 / 10
एबीजी शिपयार्ड कंपनीनं २८ बँकांकडून २३ हजार कोटी घेतले. त्यात ७,०८९ कोटी ICICI, ३,६३४ कोटी IDBI, २,९२५ कोटी SBI, बँक ऑफ बडोदाकडून १,६१४ कोटी, पीएनबीकडून १, २४४ कोटी, इंडियन ओवरसीज बँकेकडून १,२२८ कोटी रुपये घेतले. याशिवाय २२ बँकांकडून १०८ कोटी घेतले आहेत.
8 / 10
एबीजी शिपयार्ड कंपनीनं देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा बँक घोटाळा केला आहे. त्याआधी २०१८ मध्ये नीरव मोदी याचं प्रकरण समोर आलं होतं. त्याने पंजाब नॅशनल बँकेकडून १३ हजार ५७० कोटी रुपये घेतले होते. याबाबत त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
9 / 10
जुलै २०१५ मध्ये उद्योगपती विजय मल्ल्याचं प्रकरण उघड झालं होतं. याठिकाणी ९ हजार कोटी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात जवळपास १७ बँकांकडून कर्ज घेण्यात आले होते. त्यामुळे एबीजी शिपयार्ड कंपनीचा घोटाळा सर्वात मोठा ठरला आहे.
10 / 10
एबीजी शिपयार्ड प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक झालेली आहे. ७५ वर्षांमध्ये भारतातील जनतेच्या पैशाची एवढी फसवणूक झालेली नाही. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदी मित्रांसाठी ‘अच्छे दिन’ आहेत, असे राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.
टॅग्स :bankबँकCBIगुन्हा अन्वेषण विभागState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया