शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 15 रुपयांनी महागणार?, जाणून घ्या, यामागील 3 मोठी कारणे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 1:26 PM

1 / 7
नवी दिल्ली : रशियाने कालपासून युक्रेन विरोधात युद्धाला सुरुवात केली आहे. या युद्धाचा परिणाम जागतिक स्तरावर होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाने 103.78 डॉलर Crude Oil Price) ही सात वर्षांची उच्च पातळी गाठली आहे. यापूर्वी ऑगस्ट 2014 मध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 105 डॉलरवर गेली होती. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम येत्या काळात देशांतर्गत बाजारात दिसून येईल.
2 / 7
मीडिया रिपोर्ट्सनुसार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 15 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, दोन ते तीन टप्प्यात तेल कंपन्यांकडून दरवाढीची अंमलबजावणी केली जाणार आहे, ही दिलासादायक बाब ठरणार आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल महागण्याची तीन मोठी कारणे आहेत.
3 / 7
गेल्या अडीच महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमती 27 टक्क्यांनी वाढल्या आहेत. कच्च्या तेलाची किंमत 103 डॉलरच्या वर वाढली आहे. भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात करतो. कच्च्या तेलाने विक्रमी पातळी गाठल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ निश्चित असल्याचे मानले जात आहे.
4 / 7
देशातील बड्या तेल कंपन्यांनी दिवाळीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. तेव्हापासून, कच्चे तेल प्रति बॅरल 20 डॉलर पेक्षा महाग झाले आहे. किमती स्थिर राहिल्याने कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होत आहे. दिल्लीत सध्या पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. यामुळे तेल कंपन्याही किंमती वाढवू शकतात.
5 / 7
रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या उत्पादनावर आणि पुरवठ्यावर परिणाम होईल. रशिया हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक आणि नैसर्गिक वायू निर्यात करणारा देश आहे. भारत या दोन्ही गोष्टी आयात करतो. अशा परिस्थितीत आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर हे युद्ध दीर्घकाळ चालू राहिले तर कच्च्या तेलाची किंमत 120 डॉलरपर्यंत पोहोचू शकते.
6 / 7
नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्याने आगामी काळात देशांतर्गत बाजारात एलपीजी आणि सीएनजीच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वायू आणि सीएनजीचे दरही 10 ते 15 रुपयांनी वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
7 / 7
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका सरकारी अधिकाऱ्याने दावा केला आहे की रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान भारताच्या तेल पुरवठा यंत्रणेवर कोणताही परिणाम झाला नाही. युद्ध तीव्र झाले तरी सुद्धा पुरवठ्यावर परिणाम होणार नाही. आमचे पुरवठादार पश्चिम आशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेत आहेत. या हल्ल्याचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही, असा दावा त्यांनी केला
टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया