शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Air India TaTa Group: टाटांनी शब्द पाळला! एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना पहिली भेट मिळाली; पीएफ, पेन्शनमध्ये मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 3:10 PM

1 / 7
काही दिवसांपूर्वीच एअर इंडिया पुन्हा एकदा टाटाच्या साम्राज्यात आली आणि गेल्या बऱ्याच वर्षांपासून सुरु असलेली खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. सरकारने एअर इंडिया टाटांच्या हवाली केली. यामुळे रातोरात हजारो सरकारी कर्मचारी खासगी झाले. असे असले तरी टाटाने आपला शब्द पाळला आणि सर्व कर्मचाऱ्यांना पहिली भेट दिली आहे.
2 / 7
टाटाने सर्वात मोठी भेट दिली ती म्हणजे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि रिटायरमेंट फंडची. टाटाच्या हाती कंपनी जाताच ईपीएफओने एअर इंडियाला लगेचच ऑनबोर्ड केले आहे. यामुळे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना अधिकच्या पीएफचा लाभ मिळाला आहे.
3 / 7
श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने शनिवारी याची माहिती दिली आहे. EPFO ने सोशल सिक्युरिटी कव्हरेजसाठी एअर इंडियाला ऑनबोर्ड केले आहे. एअर इंडियाने ज्या ज्या कर्मचाऱ्यांचे डिसेंबर २०२१ मध्ये पैसे जमा केलेत त्यांना ईपीएफओचे सर्व फायदे मिळणार आहेत. डिसेंबरमध्ये एअर इंडियाने 7,453 कर्मचाऱ्यांचे पैसे जमा केले होते.
4 / 7
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना आता २ टक्के जास्तीचा पीएफ मिळणार आहे. खासगी कंपनी झाल्याने कर्मचाऱ्यांना पीएफ कायदा 1925 चा फायदा मिळणार आहे. यामुळे आधी १०-१० टक्के असलेले कॉन्ट्रीब्युशन १२-१२ टक्के होणार आहे.
5 / 7
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना आता EPF स्कीम 1952, EPS 1995 आणि EDLI 1976 चाही लाभ मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांना किमान 1,000 रुपये हमी पेन्शन मिळेल. अकाली मृत्यू झाल्यास, कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला पेन्शनचा लाभ दिला जाईल. याशिवाय कर्मचार्‍यांना 2.5 लाख ते 7 लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा मिळेल, ज्यासाठी कोणताही प्रीमियम भरावा लागणार नाही.
6 / 7
एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स पूर्वी वेगळ्या कंपन्या होत्या. त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी सरकारने 2007 मध्ये त्यांचे विलीनीकरण केले. दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना 1952-53 पासून पीएफ कायदा 1925 चा लाभ मिळत होता. यामध्ये त्यांना पीएफचा लाभ मिळत होता, मात्र त्यांना पेन्शन किंवा विम्यासारखे सुरक्षा कवच मिळत नव्हते. आता एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांना अधिक पीएफ तर मिळेलच, शिवाय सामाजिक सुरक्षिततेचीही हमी मिळेल.
7 / 7
यापूर्वी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व्हीके सिंह यांनी राज्यसभेत गेल्या अधिवेशनात सांगितले होते की, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सच्या विद्यमान कर्मचार्‍यांना पीएफ आणि ग्रॅच्युइटीचा लाभ मिळत राहील, असे ते म्हणाले होते. टाटाने शेअर खरेदी करारात याचा समावेश केला होता. त्यानुसार हा लाभ देण्यात आला आहे.
टॅग्स :Air Indiaएअर इंडियाTataटाटा