Air India, Tata: एअर इंडियाचा 'ब्रँड' टाटांना जड जाणार? एक चूक अन् होत्याचे नव्हते होईल By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 4:09 PM
1 / 8 टाटांनी सुरु केलेली विमान वाहतूक कंपनी पुन्हा टाटांच्या मालकीचा झाली आणि बाजारासह सोशल मीडियावर एकच गलका झाला. टाटा सन्सने बाजी मारली आणि 18000 कोटी रुपये मोजून एअर इंडिया (Air India) ताब्यात घेतली. परंतू टाटाला (Tata) ही कंपनी सांभाळणे सोपी गोष्ट नाहीय. एक चूक, फक्त एक चूक होत्याचे नव्हते करू शकते. ही चूक म्हणजे ब्रँडिंग. 2 / 8 टाटांनी टाटा मोटर्सला नुकसानीतून बाहेर काढले. भारताची सर्वात मोठी टेक कंपनी उभी केली. टाटाचा ब्रँड खूप पुढे नेला. परंतू टाटांना एक शल्य होते, विमान वाहतूक कंपनी आपल्या हातून गेल्याचे. आज ते स्वप्न त्यांनी पूर्ण केले. आज एअर इंडियाला दररोज 20 कोटी रुपयांचा तोटा होतोय. 3 / 8 टाटांना तोट्यातली कंपनी विकत घेऊन त्याचा इतर गोष्टींसाठी फायदा करून घेण्याचा अनुभव गाठीशी आहे. फोर्डकडून Jaguar Land Rover विकत घेऊन टाटांनी त्या कंपनीचे तंत्रज्ञान टाटा मोटर्ससाठी वापरले. आज टाटा मोटर्स कुठे आहे ते आपण पाहतोच. 4 / 8 एअर इंडिया विकत घेण्याचा निर्णय हा टाटासाठी साहसी ठरू शकतो. एअर इंडिया विकत घेतल्याने जगातील अनेक विमानळांवर टाटाला स्लॉट मिळाले आहेत. तसेच 130 हून अधिक विमानांचा ताफा मिळाला आहे. सोबत हजारो प्रशिक्षित पाय़लट, एअर हॉस्टेस आणि कर्मचारी देखील. 5 / 8 जसा फायदा आहे तसा तोटादेखील आहे. गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया ही तोट्यात असलेली एअरलाईन असा शिक्का आहे. तसेच खराब सेवा देते असा प्रचारही आहे. टाटाला या दोन गोष्टींमध्ये मोठी सुधारणा करावी लागणार आहे. एअर इंडियाचा चेहरा बदलावा लागेल. 6 / 8 दुसरी बाब म्हणजे, भारतीय हवाई क्षेत्रातील 57 टक्के बाजारपेठ ही इंडिगोने कब्जा केलेली आहे. यामुळे या तगड्या एअरलाईनला टक्कर देण्यासाठी टाटाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. एअर इंडियामध्ये 2012 ला 27 हजार कर्मचारी होते. आता ते 13500 झाले आहेत. टाटा या कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस आणू शकते. कारण ताज्या दमाचे कर्मचारी घेतले नाहीत तर टाटाला ही स्पर्धा करणे कठीण जाईल. 7 / 8 टाटाला एअर इंडियाबाबत सर्वात मोठा निर्णय घ्यायचाय तो ब्रँडचा. आता टाटाकडे चार एव्हिएशन ब्रँड झाले आहेत. आधीच विस्तारा होती, त्यात एअर इंडिया एक्स्प्रेस, एअर एशिया आणि एअर इंडिया असे चार ब्रँड झाले आहेत. सांगितले जात आहे की, टाटा या चारही एअरलाईन एक करू शकते. हीच मोठी चूक देखील ठरू शकते. 8 / 8 भारतीय हवाई बाजारपेठ ही दोन हिस्स्यांमध्ये विभागली गेली आहे. एक म्हणजे लो कॉस्ट आणि दुसरा फुल टाईम. टाटांना दोन्ही बाजारपेठा वेगवेगळ्या काबीज करायला हव्यात. यासाठी दोन ब्रँड आणि दोन सीईओ असतील तरच यश हाती येईल. तज्ज्ञांनुसार फुल टाईमसाठी एअर इंडिया आणि लो कॉस्टसाठी एअर इंडिया एक्स्प्रेस हे नाव योग्य ठरेल. एअर इंडियावरील अधिकतर कर्ज हे सरकारच्या वाट्याला आले आहे, यामुळे टाटाला ही कंपनी पुढे नेण्यास सोपे जाईल. आणखी वाचा