शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साबण-तेल विकले, IT कंपनीही उभारली; ​Azim premji दिवसाला करतात 1.3 कोटींचे दान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 6:43 PM

1 / 7
नवी दिल्ली: जगभरात अनेक असे उद्योगपती आहेत, जे पैसे कमवण्यासोबतच दान करण्यातही सर्वात पुढे असतात. अशात दानवीरांमध्ये भारतातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी विप्रोचे (Wipro) संस्थापक अझीम प्रेमजी (Azim premji) देखील आहेत. अतिशय खडतर परिस्थितीत अझीम प्रेमजी यांनी आपल्या वडिलांचा तेल-साबणाचा व्यवसाय वाढवला आणि पुढे जाऊन स्वतःची IT कंपनी उभारली.
2 / 7
अझीम प्रेमजी 21 वर्षांचे होते आणि कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत होते. कोर्स सहा महिन्यांनी संपणार होता, पण अचानक आईचा फोन आला आणि तिने वडिलांच्या निधनाची बातमी दिली. ही बातमी ऐकताच कॉलेज सोडून अझीम यांनी वडिलांचा व्यवसाय हाती घेतला. आधीच कर्जात बुडालेल्या कंपनीला तरुण आणि अनुभव नसलेल्या अझीम यांनी कर्जमुक्त केले.
3 / 7
अझीम प्रेमजी यांचे आजोबा तांदळाच्या व्यवसाय करायचे आणि त्यांचे वडील मोहम्मद हुसेन प्रेमजी यांनीही हाच व्यवसाय पुढे नेला. तांदळाच्या व्यवसायात फारसा नफा मिळत नव्हता, तोटा वाढत होता. पैशाची टंचाई वाढून लागली, म्हणून त्यांनी एका गिरणी मालकाला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी महाराष्ट्रात आले. कर्जाची परतफेड न केल्याने गिरणी मालकाने त्याची ऑइल मिल त्यांच्या ताब्यात दिली. यासोबतच मोहम्मद हुसेन प्रेमजी यांची तेल व्यवसायात एंट्री झाली. त्यांनी कंपनीचे नाव वेस्टर्न इंडियन व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स लिमिटेड असे ठेवले. अझीम प्रेमजी यांचा जन्म 1945 साली मुंबईत झाला. 1947 मध्ये देशाच्या फाळणीच्या वेळी मोहम्मद अली जिना यांनी मोहम्मद प्रेमजींना पाकिस्तानात येऊन अर्थमंत्री बनण्याची ऑफर दिली, परंतु प्रेमजींनी त्यांची ऑफर नाकारली.
4 / 7
वडिलांनी अझीम प्रेमजींना शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले, पण 1966 मध्ये वडिलांच्या निधनानंतर त्यांना शिक्षण अर्धवट सोडून भारतात यावे लागले. त्यांनी वडिलांची कंपनी हाती घेतली. अझीम प्रेमजींचा मोठा भाऊ फारुख प्रेमजी वडिलांच्या मृत्यूच्या एक वर्ष आधी कुटुंबाला सोडून पाकिस्तानात स्थायिक झाले होते. वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासोबतच त्यांनी इतर अनेक व्यवसायात हात आजमावला. 1977 मध्ये त्यांनी कंपनीचे नाव बदलून विप्रो केले. अझीम प्रेमजींनी काळाची आणि भविष्याची मागणी जाणली होती.
5 / 7
त्यांना आयटी क्षेत्रात प्रवेश करायचा होता. यावेळी त्यांना एक चांगली संधी चालून आली. 1980 मध्ये आयटी कंपनी IBM भारतात आपला व्यवसाय बंद करत होती. याच काळात अझीम प्रेमजींनी आयटी क्षेत्रात प्रवेश केला. त्यांना समजले की या क्षेत्रात खूप काम होणार आहे. या विचाराने त्यांनी विप्रो सुरू केली. कंपनी सुरू होताच टेक ऑफ झाली. विप्रोने हार्डवेअर तसेच सॉफ्टवेअर क्षेत्रात आपली वाटचाल सुरू केली. आज विप्रो ही देशातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे.
6 / 7
अझीम प्रेमजी यांना भारताचे बिल गेट्स म्हणतात. त्यांना सर्वात मोठा दाता ही पदवी दिली जाते. व्यवसायातून कोट्यवधींची संपत्ती कमावणारे अझीम प्रेमजी यांना संपत्तीची फारशी ओढ नाही. ते आपली बहुतेक संपत्ती दान करतात. 2001 मध्ये त्यांनी अझीम प्रेमजी फाउंडेशन या एनजीओची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मालमत्तेचा मोठा हिस्सा दान केला.
7 / 7
अझीम प्रेमजी यांनी 2019-20 मध्ये दररोज सुमारे 22 कोटी रुपये म्हणजेच वर्षभरात सुमारे 7904 कोटी रुपये दान केले. 2020-21 मध्ये प्रेमजी देणगीदारांच्या यादीत अव्वल स्थानावर होते. त्यांनी 9713 कोटी रुपये दान केले. 2022 मध्ये त्यांनी दररोज 27 कोटी रुपये दान केले. अझीम प्रेमजी फाउंडेशन, विप्रो आणि विप्रो एंटरप्रायझेस यांनी कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी 1125 कोटी रुपयांची देणगी दिली. 2019 मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली. त्यांनी त्यांचा मोठा मुलगा ऋषद प्रेमजी याच्याकडे विप्रो कंपनीची जबाबदारी सोपवली आहे.
टॅग्स :Azim Premjiअझिम प्रेमजीWiproविप्रोbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूक