शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Patanjali Foods: बाबा रामदेव यांच्या पतंजली फुड्सला मोठा झटका, २९ कोटींपेक्षा अधिक शेअर्स फ्रीझ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 8:38 AM

1 / 7
बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली फूड्सच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका लागला आहे. शेअर बाजारानं कंपनीच्या प्रवर्तक समूहातील २९.२५८ कोटी शेअर्स गोठवले आहेत. कंपनी निर्धारित वेळेत मिनिमम पब्लिक शेअरहोल्डिंग नियमांना पूर्ण करण्यास अपयशी ठरली. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे.
2 / 7
पतंजली फूड्समधील पब्लिक शेअरहोल्डिंग डिसेंबर अखेरीस १९.१८ टक्के होती. सेबीच्या नियमांनुसार, कोणत्याही सूचीबद्ध कंपनीमध्ये किमान २५ टक्के सार्वजनिक भागधारक असणं आवश्यक आहे. पतंजली फूड्स यापूर्वी रुची सोया इंडस्ट्रीज म्हणून ओळखले जात होते.
3 / 7
डिसेंबर २०१७ मध्ये, NCLT नं त्यांविरुद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू केली. जुलै २०१९ मध्ये, न्यायाधिकरणानं पतंजली आयुर्वेदाच्या रिझॉल्युशन प्लॅनला मंजुरी दिली. रिझॉल्युशन प्लॅनच्या अंमलबजावणीनंतर, कंपनीतील सार्वजनिक शेअरहोल्डिंग १.१ टक्क्यांपर्यंत खाली आले होते.
4 / 7
सेबीच्या नियमांनुसार, जर एखाद्या कंपनीत सार्वजनिक शेअरहोल्डिंग २५ टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर ती तीन वर्षांत त्या पातळीपर्यंत वाढवावी लागते.
5 / 7
पतंजली फूड्सनं मार्च २०२२ मध्ये फॉलो ऑन पब्लिक ऑफर आणली होती. याद्वारे ६.६२ कोटी शेअर्स जारी करण्यात आले. यामुळे कंपनीतील सार्वजनिक भागभांडवल १९.१८ टक्क्यांवर पोहोचले.
6 / 7
मात्र त्यानंतर कंपनीनं ते २५ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी कोणतीही पावलं उचललेली नाहीत. कंपनीनं एका निवेदनात म्हटलं आहे की २१ प्रवर्तक संस्थांचे शेअर्स गोठवण्यात आले आहेत.
7 / 7
पतंजली आयुर्वेदाचा कंपनीत सर्वाधिक ३९.४ टक्के हिस्सा आहे. कंपनी सेबीचे नियम पूर्ण करेपर्यंत हे शेअर्स गोठवले जातील. पतंजली फूड्सचा शेअर बुधवारी NSE वर १.३ टक्क्यांनी वाढून ९६४.४० रुपयांवर बंद झाला. त्यात यावर्षी आतापर्यंत १९ टक्क्यांची घसरण झाली आहे.
टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजलीshare marketशेअर बाजार