शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Billionaires List: गौतम अदानींना तोटा तर मुकेश अंबानींची चांदी; गेल्या 24 तासात 28000 कोटींचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 7:30 PM

1 / 6
Top-10 Billionaires List: गौतम अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण समोर आल्यापासून जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत दररोज फेरबदल होत आहेत. गौतम अदानी जरी टॉप-20 मधून बाहेर पडले असतील, पण आणखी एक भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आपली क्षमता दाखवताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा अंबानींनी मोठी उडी घेत श्रीमंतांच्या यादीत 12 व्या क्रमांकावरुन थेट नवव्या क्रमांकावर मजल मारली आहे.
2 / 6
अंबानींचा पुन्हा टॉप-10 मध्ये समावेश- रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यावसायिक दिवशी फोर्ब्सच्या टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत 12 व्या स्थानावर घसरले. पण गेल्या 24 तासांत त्यांच्या कंपनीच्या शेअर्सच्या (रिलायन्स स्टॉक्स) किमतीत झालेल्या वाढीमुळे त्यांना 3.5 अब्ज डॉलर्स किंवा जवळपास 28 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.
3 / 6
फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मालमत्तेतील या वाढीमुळे मुकेश अंबानींची संपत्ती $85.4 बिलियन झाली आहे आणि या आकडेवारीसह ते पुन्हा जगातील नवव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर, हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे भारतीय अब्जाधीश गौतम अदानी सतत तोट्याचा सामना करत आहेत. 24 जानेवारी 2023 रोजी प्रकाशित झालेल्या अहवालापासून, अदानींच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे आणि दररोज त्यांचे बहुतांश शेअर्स लोअर सर्किटमध्ये जाताना दिसत आहेत.
4 / 6
हिंडेनबर्ग अहवालाचा अदानी समूहाच्या मार्केट कॅपवर इतका परिणाम झाला की 20 दिवसांत ते निम्म्यावर आले. सध्या गौतम अदानी यांची एकूण संपत्ती $52.2 अब्ज आहे आणि ते अब्जाधीशांच्या यादीत 24 व्या स्थानावर आहेत. गेल्या 24 तासांत अदानींना 17,39 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारीही दुपारी 2.40 वाजेपर्यंत अदानी समूहातील चार कंपन्यांचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये होते.
5 / 6
अदानी पॉवर लिमिटेड 140.80 रुपये, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड 621.00 रुपये, अदानी टोटल गॅस लिमिटेड 1,076.40 रुपये आणि अदानी ट्रान्समिशन लिमिटेड 1,017.45 रुपये वर आहेत. तसेच, ACC Ltd, Adani Ports, Adani Wilmar आणि Adani Enterprises Ltd मध्ये थोडी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अंबुजा सिमेंट 2.01 टक्क्यांनी सर्वाधिक वाढला, तर अदानी एंटरप्रायझेस 1.39 टक्क्यांनी वाढला.
6 / 6
अब्जाधीशांच्या यादीत असलेल्या इतर श्रीमंत लोकांबद्दल सांगायचे तर, बर्नार्ड अर्नॉल्ट $ 215.9 अब्ज डॉलर्ससह पहिले, इलॉन मस्क $ 196.5 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या आणि जेफ बेझोस $ 122.9 अब्ज संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यादीत चौथ्या क्रमांकावर $114.3 अब्ज डॉलरसह लॅरी एलिसन, $108.4 अब्ज डॉलर्ससह वॉरेन बफे पाचव्या, बिल गेट्स $106.7 अब्ज डॉलरसह सहाव्या, कार्लोस स्लिम हेलू $89.1 बिलियनसह सातव्या, $86.5 अब्ज डॉलरसह आठव्या क्रमांकावर स्टीव्ह बाल्मर आणि फ्रँकोइस बेटनकोर्ट $82.9 अब्ज संपत्तीसह दहाव्या स्थानावर आहेत.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीAdaniअदानीMukesh Ambaniमुकेश अंबानीbusinessव्यवसाय