शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Buy Gold Diwali: धनत्रयाेदशीच्या मुहूर्तावर सोने विकत घेताय? ही काळजी घ्या, अन्यथा हाेईल फसगत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 8:02 AM

1 / 8
धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. या सणाच्या पर्वावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अनेक जण सोने खरेदी करून गुंतवणुकीचा प्रारंभ करतात. मात्र, सोने खरेदी करताना काही बाबतीत काळजी घेतली नाही तर कमी शुद्धतेचे सोने हाती पडू शकते.
2 / 8
साेने खाेटे किंवा कमी शुद्धतेचे असल्यास माेठे नुकसान हाेते. त्याची विक्री कमी किमतीत होते. २४ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या किमतीत सुमारे २५ टक्क्यांचे अंतर असते. भविष्यात सोने तारण कर्ज घेण्याची गरज भासल्यास पदरी निराशा पडू शकते.
3 / 8
साेने ही एक दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे ती किती प्रमाणात असावी, हे जाणून घेणेही महत्त्वाचे ठरते. एकूण पोर्टफाेलियाेच्या १० ते १५ टक्के हे प्रमाण असावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
4 / 8
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या १५ ऑक्टोबर रोजीच्या दरानुसार, २४ कॅरेटचे सोने ५०,४४० रुपये प्रती १० ग्रॅम, तर १८ कॅरेटचे सोने ३७,८२९ रुपये प्रती १० ग्रॅम होते. तर, १७ ऑक्टाेबरला २४ कॅरेट साेन्याचा दर ५०,३१५ रुपये प्रती १० ग्रॅम हाेता. काही दिवसांमध्ये दर कमी झाल्यामुळे बाजारात खरेदीचा उत्साह आहे.
5 / 8
प्रमाणित सोनेच घ्या : ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डचा (बीआयएस) हॉलमार्क बघून प्रमाणित सोने खरेदी करा. शुद्धता कोड, टेस्टिंग सेंटर मार्क, ज्वेलर मार्क आणि मार्किंगची तारीख पाहून घ्या.
6 / 8
रोख पेमेंट करू नका, बिल घ्या : किंमत अनेक स्रोतांकडे (उदा. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची वेबसाइट) पडताळून घ्या. रोखीने पैसे देऊ नका. यूपीआय (उदा. भीम ॲप) आणि डिजिटल बँकिंगद्वारे पैसे अदा करा. डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारेही पैसे दिले जाऊ शकतात. ऑनलाइन मागवले असेल, तर पॅकेजिंग तपासून घ्या. बिल घ्यायला विसरू नका.
7 / 8
विश्वासार्ह ज्वेलर, फेरखरेदी धोरण जाणून घ्या : फसवणूक टाळण्यासाठी करविषयक नियम पाळणाऱ्या विश्वासार्ह ज्वेलरकडेच सोने खरेदी करा. सोने ही एक गुंतवणूकही असते. त्यामुळे जेथून खरेदी करत आहात, तेथील फेरखरेदी (बायबॅक) धोरण काय आहे, हे जाणून घ्या. ज्वेलरच्या कर्मचाऱ्यांशी याबाबत बोला.
8 / 8
घडणावळ खर्च पाहून घ्या : दागिन्याची घडणावळ (निर्मिती खर्च) किती लावण्यात आली हे तपासून घ्या. घडणावळ ३ टक्के ते ३० टक्के असू शकते. कारागिराने बनविलेल्या बारीक डिझाईनच्या दागिन्यांची घडणावळ सर्वाधिक, तर मशीनमध्ये तयार केलेल्या शिक्क्यांची घडणावळ सर्वांत कमी असते.
टॅग्स :GoldसोनंDiwaliदिवाळी 2022