शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Chandrababu Naidu कुटुंबाची संपत्ती ५ दिवसांत ₹८७० कोटींनी वाढली, 'या' शेअरमुळे बक्कळ कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 10:26 AM

1 / 6
चंद्राबाबू नायडू कुटुंबीयांच्या संपत्तीत गेल्या पाच दिवसांत ८७० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या कालावधीत हेरिटेज फूड्सच्या शेअर्समध्ये ५५ टक्के वाढ झाल्यानं त्यांची संपत्ती वाढलीये. नायडू कुटुंबीय या कंपनीचे प्रवर्तक आहेत. टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी नुकत्याच झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी केली आहे.
2 / 6
त्यांच्या कामगिरीमुळे हेरिटेज फूड्सच्या शेअरनं नवा उच्चांक गाठलाय. हेरिटेज फूड्स दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करते. यामध्ये दही, तूप, चीज, फ्लेवर्ड मिल्क आणि इम्युनिटी मिल्क सह इतर उत्पादनांचा समावेश आहे. देशातील ११ राज्यांमधील १५ लाखांहून अधिक कुटुंबे कंपनीच्या त्यांच्या डेअर प्रोडक्टचा वापर करतात.
3 / 6
गेल्या पाच सत्रात हेरिटेज फूड्सच्या शेअरमध्ये ५५ टक्के वाढ झाली आहे. ३ जून रोजी कंपनीचा शेअर ४२४ रुपयांवर व्यवहार करत होता. एक्झिट पोलमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला (टीडीपी) विजय मिळू शकतो असे अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आले होते. यानंतर शुक्रवारी शेअर ६६१.२५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. चंद्राबाबू नायडू कुटुंबातील सदस्यांच्या संपत्तीत या काळात लक्षणीय वाढ झाली.
4 / 6
निवडणुकीचे निकाल नायडू यांच्या बाजूनं आल्यानं हेरिटेज फूड्सचे बाजार भांडवल या आठवड्यात २४०० कोटी रुपयांनी वाढलं. कंपनीचं बाजार भांडवल (मार्केट कॅप) ७ जून रोजी ६,१३६ कोटी रुपयांवर पोहोचलं. आठवडाभरापूर्वी ते ३,७०० कोटी रुपये होतं. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, नायडू कुटुंबाचा या कंपनीत ३५.७ टक्के हिस्सा आहे.
5 / 6
चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी भुवनेश्वरी यांचा कंपनीत २४.३७ टक्के हिस्सा आहे. तर मुलगा लोकेश आणि सून ब्राह्मणी यांचा अनुक्रमे १०.८२ टक्के आणि ०.४६ टक्के हिस्सा आहे. नायडू यांचा नातू देवांश याचा कंपनीत ०.०६ टक्के हिस्सा आहे.
6 / 6
या कुटुंबाची एकूण संपत्ती आठवडाभरापूर्वीच्या १,३१९ कोटी रुपयांवरून २,१९० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच कुटुंबाच्या संपत्तीत ८७० कोटी रुपयांची वाढ झाली. एनएसईवर ७ जून रोजी हेरिटेज फूड्सचा शेअर १० टक्क्यांनी वधारून ६६१.२५ रुपयांवर बंद झाला. (टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :businessव्यवसायshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू