शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कर्जात बुडालेल्या अनिल अंबानींना आले 'अच्छे दिन', ३ बँकांचं कर्ज फेडलं; पाहा कुठून आले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 9:48 AM

1 / 8
मोठ्या कर्जात बुडालेले उद्योगपती अनिल अंबानी यांचे दिवस आता बदलू लागले आहेत. त्यांच्या कंपन्या वेगानं कर्ज फेडत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स पॉवरनं गेल्या आठवड्यात तीन बँकांची आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि डीबीएस बँक यांची थकबाकी निकाली काढली. त्याचप्रमाणे तिची मूळ कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर देखील जेसी फ्लॉवर्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीची २,१०० कोटी रुपयांची थकबाकी भरून काढण्यासाठी काम करत आहे.
2 / 8
या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जमुक्त कंपनी बनण्याचं रिलायन्स पॉवरचं उद्दिष्ट असल्याचं एका व्यावसायिक बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. त्यांच्यावर आयडीबीआय बँकेकडून घेतलेलं एक वर्किग कॅपिटल लोन असेल. आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि डीबीएस बँकेचे एकत्रितपणे रिलायन्स पॉवरवर सुमारे ४०० कोटी रुपयांचे ड्यू होते आणि त्यांच्या मूळ कर्जापैकी सुमारे ३०-३५ टक्के वसूल करण्यात आले आहेत.
3 / 8
७ जानेवारी रोजी एक्सचेंजेसला जारी करण्यात आलेल्या नोटिसनुसार, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि जेसी फ्लॉवर्स एआरसी यांनी स्टँडस्टिल करार केला होता. सुरुवातीला हा करार २० मार्च २०२४ पर्यंत होता. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, तो अलीकडेच ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात आला आहे.
4 / 8
करारानुसार, JC Flowers ARC ३१ मार्चपर्यंत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही. यामुळे कंपनीला निधीची व्यवस्था करण्यासाठी वेळ मिळेल. ॲक्सिस, आयसीआयसीआय आणि डीबीएस बँकेनं याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. रिलायन्स पॉवरनंही कर्जाच्या तपशिलावर भाष्य केलं नाही. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.
5 / 8
स्टॉक एक्स्चेंजच्या माहितीनुसार, रिलायन्स पॉवरनं १३ मार्च रोजी VFSI होल्डिंग्सकडून २४० कोटी रुपयांची इक्विटी उभारली. या रकमेतून बँकांची थकबाकी भरली गेली असण्याची शक्यता आहे. VFSI होल्डिंग्स ही जागतिक असेट मॅनेजमेंट फर्म Varde Partners ची उपकंपनी आहे. मूळ कर्जदार येस बँकेनं त्यांचं ४८,००० कोटी रुपयांचं कर्ज जेसी फ्लॉवर्स एआरसीला हस्तांतरित केलं होतं. यामध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवरला दिलेल्या कर्जाचाही समावेश आहे.
6 / 8
रिलायन्स पॉवरनं एक्सचेंजेसला सांगितलं की ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कंपनीवर एकूण ७६५ कोटी रुपयांचं कर्ज होतं. एप्रिल २०२३ मध्ये, रिलायन्स पॉवरनं जेसी फ्लॉवर्स एआरसी आणि कॅनरा बँक या दोन कर्जदारांचं कर्ज फेडलं.
7 / 8
रिलायन्स पॉवरनं सप्टेंबर २०२२ मध्ये १५.५५ रुपये प्रति शेअर दरानं २०० मिलियन इक्विटी शेअर्स VFSI होल्डिंगला वाटप केले होते. त्यानंतर २५ टक्के भागभांडवल ८० कोटी रुपयांना विकत घेण्यात आले आणि उर्वरित भाग वॉरंटच्या स्वरूपात जारी करण्यात आला. वॉरंटचे शेअर्समध्ये रूपांतर करण्याचा अधिकार वापरून VFSI नं २४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
8 / 8
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रिलायन्स कमर्शियल फायनान्सनं रिलायन्सच्या दोन्ही कंपन्यांमध्ये १,०४८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ८९१ कोटी रुपये आणि रिलायन्स पॉवरमध्ये १५२ कोटी रुपये गुंतवले. रिलायन्स कमर्शियल फायनान्स ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चरनं विकत घेतलं.
टॅग्स :Anil Ambaniअनिल अंबानीYes Bankयेस बँकRelianceरिलायन्स