शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

“१९४७ नंतर प्रथमच असे घडले”; भारताच्या विकास दरावर अर्थतज्ज्ञ कौशिक बसूंनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 4:22 PM

1 / 9
कोरोना संकटामुळे जगभरातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट कोसळल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था यातून अद्यापही सावरलेल्या नाही. तर काही देश अजूनही यातून सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
2 / 9
भारताचा विचार केल्यास गेल्या काही महिन्यांपासून देशभरात जीएसटीचे विक्रमी संकलन होत आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था हळूहळू सावरत असून, हे सकारात्मक असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले होते. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पामुळे भारताला पुढील २५ वर्षांचा पाया रचण्यासाठी मदत होईल. पुढील आर्थिक वर्षात ग्रोथ ९.२ टक्के राहण्याची शक्यता आहे. ही मोठ्या अर्थव्यवस्थांमधील सर्वाधिक वाढ असल्याचे त्यांनी म्हटले होते.
3 / 9
मात्र, जागतिक बँकेचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी भारताच्या विकास दराबाबत चिंता व्यक्त केली आहे. बसू यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशाचा जीडीपी विकास दर गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने घसरत आहे.
4 / 9
१९४७ नंतर असे कधीच घडले नव्हते. ही आकडेवारी कोणीही नाकारू शकत नाही, असेही बसू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. बसू यांनी ट्विटमध्ये देशाच्या गेल्या पाच आर्थिक वर्षांतील जीडीपी वाढीची आकडेवारी दिली आहे.
5 / 9
२०१६-१७ या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर ८.२ टक्के होता. यानंतर २०१७-१८ मध्ये ७.२ टक्के, २०१८-१९ मध्ये ६.१ टक्के, २०१९-२० मध्ये ४.२ टक्के आणि २०२०-२१ मध्ये -७.३ टक्के होता.
6 / 9
प्रत्येक आर्थिक वर्षाचा विकास दर मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत कमी असतो. कोरोना महामारीचा परिणाम फक्त भारतावरच नाही, तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात साथीच्या रोगामुळे आणि देशव्यापी लॉकडाऊनमुळे आर्थिक स्तरावर वाईट परिणाम झाला आहे.
7 / 9
या कालावधीत देशाचा विकास दर -७.३ टक्के नोंदवला गेला. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात भारताचा चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी ९.२ टक्के वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जो जगात सर्वाधिक असेल.
8 / 9
सर्वेक्षणानुसार, आर्थिक क्रियाकलाप महामारी आधीच्या पातळीवर परतल्यामुळे हे घडेल. महागाईमुळे देश मंदीतून जात असून याला सामोरे जाण्यासाठी धोरणात्मक निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्यावे लागतील, असेही बसू यांनी म्हटले आहे.
9 / 9
दरम्यान, एकूणच अर्थव्यवस्था वाढत आहे, पण भारताचा तळाचा अर्धा भाग अजूनही मंदीच्या गर्तेत आहे. हे दुःखदायक आहे की, देशाचे धोरण अनेक वर्षांपासून मोठ्या उद्योगांवर केंद्रित आहे, असे बसू यांनी यापूर्वी म्हटले होते. आताच्या घडीला बसू अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारWorld Bankवर्ल्ड बँकnirmala sitharamanनिर्मला सीतारामन