शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डेबिट/क्रेडिट कार्डनं शॉपिंग वापरता? जानेवारीपासून टोकनायझेशन सुरू होणार; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 6:06 PM

1 / 8
गेल्या काही वर्षांत ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण खूप वाढलंय. अनेकजण रोख व्यवहार टाळून ऑनलाईन व्यवहारांना पसंती देतात. यातील बहुतांश जण त्यांच्या डेबिट, क्रेडिट कार्डचा तपशील ई-कॉमर्स साईटवर सेव्ह करून ठेवतात. मात्र जानेवारीपासून असं करता येणार नाही.
2 / 8
पेमेंट करताना वारंवार डेबिट, क्रेडिट कार्डचा तपशील टाकावा लागू नये यासाठी बहुतांश जण तपशील सेव्ह करून ठेवतात. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नवे नियम आणत जुन्या व्यवस्थेत बदल केले आहेत. त्यामुळे जानेवारीपासून नवे पर्याय मिळतील.
3 / 8
गेल्या काही वर्षांत ई-कॉमर्स वेबसाईट्सवरून डेटा लीक झाल्याचे प्रकार वाढले आहेत. ई-कॉमर्स आणि अन्य साईट्सवर लोकांनी सेव्ह केलेला त्यांचा डेबिट, क्रेडिट कार्डचा तपशीलदेखील लीक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळेच आरबीआयनं नवा नियम तयार केला आहे.
4 / 8
ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांच्या डेबिट, क्रेडिट कार्डचा तपशील लीक होऊ नये यासाठी आरबीआयनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२२ पासून साईटवर सेव्ह केलेला तपशील आपोआप डिलीट होईल.
5 / 8
१ जानेवारीपासून डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून दरवेळी पेमेंट करताना तुम्हाला संपूर्ण तपशील भरावा लागेल. यासोबतच तुम्हाला टोकनायझेशनचाही पर्याय मिळेल. डेबिट आणि क्रेडिट कार्डचं टोकनायझेशन कार्डच्या तपशीलाचं रुपांतर एका कोडमध्ये करेल. त्याला टोकन म्हटलं जाईल.
6 / 8
तुमच्या कार्डचा तपशील, टोकनची विनंती करणाऱ्या आणि ज्या डिवाईसमधून विनंती केली गेली आहे यांच्या माहितीचं अनोखं मिश्रण कोडमध्ये असेल. गुगल पेकडून याची सुरुवात नुकतीच करण्यात आली आहे.
7 / 8
यापुढे ऑनलाईन पेमेंट करताना तुम्हाला साईटवर कार्डचा तपशील सेव्ह करावा लागणार नाही. त्याऐवजी अनोखं टोकन सेव्ह करावं लागेल. हे टोकन कोणत्याही एका वेबसाईट आणि एका पेमेंट डिव्हाईससाठी मान्य असेल. त्यामुळे तुमच्या कार्डचा तपशील केवळ कार्ड नेटवर्क आणि ते जारी करणाऱ्यांकडेच असेल. इतर कोणाकडेही त्याचा तपशील सेव्ह नसेल.
8 / 8
प्रत्येक बँक आणि कार्ड कंपनीची टोकनायझेशनची एक प्रक्रिया आहे. मात्र प्रत्येकात काही सामान्य फीचर आहेत. काही कार्डच्या टोकनायझेशनसाठी तुम्हाला ई-कॉमर्स किंवा अन्य मर्चंट वेबसाईट आणि ऍपवरून विनंती करावी लागेल. ती विनंती थेट तुमच्या बँक आणि व्हिसा, रुपे सारख्या कार्ड नेटवर्कला पाठवली जाईल. तिथून मंजुरी मिळाल्यानंतर तुमच्या कार्डशी संबंधित टोकन मर्चंट आणि अन्य ई-कॉमर्स साईटला पाठवण्यात येईल.
टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक