शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

IIMची डिग्री, लाखोंची नोकरी सोडून विकायला लागला दूध; आज आहे ५००० कोटींच्या कंपनीचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 9:57 AM

1 / 9
असं म्हणतात की नशिबात जे काही लिहिलं असेल ते नेहमीच घडतं. हरियाणात राहणारे चक्रधर गाडे यांचीही कहाणी काही अशीच आहे. आयआयएमची डिग्री, लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून ते दूध विकायला सुरुवात करतील अशी त्यांच्या कुटुंबीयांना कल्पनाही नव्हती.
2 / 9
सुरुवातीला घरातील लोकांनी नाराजी व्यक्त केली. पण त्यांचा आपल्या मुलावर विश्वास होता. या विश्वासाच्या जोरावर चक्रधर जोखीम पत्करत राहिले आणि आज ते ५००० कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. ही कहाणी आहे लोकप्रिय ब्रँड कंट्री डिलाइटची (Country Delight). तुम्ही देखील याचा वापर केला असेल. अॅपने दूध किंवा इतर काही पदार्थ ऑर्डर केले असतील. पण यामागे असलेल्या व्यक्तीबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.
3 / 9
चक्रधर गाडे यांनी इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केल्यानंतर ते २००४ मध्ये इन्फोसिसमध्ये रुजू झाले. सुमारे एक वर्ष काम केल्यानंतर त्यांनी इन्फोसिसची नोकरी सोडली. चक्रधर यांनी नोकरी सोडली आणि आयआयएम इंदूरमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण होताच त्यांना इंडेक्स कॅपिटमधून नोकरीची ऑफर आली. व्हाईस प्रेसिडेंट पदासह लाखोंचा पगार त्यांना देण्यात आला.
4 / 9
चक्रधर स्वतः दिल्ली-एनसीआरमध्ये भेसळयुक्त दुधाच्या समस्येशी झगडत होते. येथूनच त्यांना त्यांच्या व्यवसायाची कल्पना सुचली. नितीन यांच्यासोबत त्यांनी पहिली दोन वर्षे ताजे दूध लोकांच्या घरी पोहोचवण्याचे काम केलं.
5 / 9
२०१३ मध्ये त्यांनी कंट्री डिलाइटची सुरुवात केली. लोकांचा अभिप्राय, त्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी ते स्वतः अनेक वेळा दूध पोहोचवायचे. भेसळयुक्त दुधामुळे लोक चिंतेत असल्याचं त्यांना समजलं. शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत दूध पोहोचवण्यावर त्यांनी काम सुरू केलं.
6 / 9
या दोघांनी सुरुवातीची दोन वर्षे पार्ट टाईम दूध विक्रेते म्हणून काम केले. परंतु २०१५ मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि त्यांचे संपूर्ण लक्ष त्यांच्या व्यवसायावर केंद्रित केलं. बाजाराचा अभ्यास केला, ग्राहकांच्या गरजा समजून घेतल्या, नियोजन केलं आणि कामाला सुरूवात झाली.
7 / 9
कंट्री डिलाईटच्या माध्यमातून ते लोकांना नैसर्गिक, ताजे आणि भेसळविरहित दूध देण्याच्या कामात सहभागी झाले. शेतकऱ्यांकडून दूध घेऊन ते पुढील २४ ते ४८ तासांत ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं होतं. ६ वर्षे त्यांनी त्यांची कंपनी बूटस्ट्रॅपवर ठेवली. २०१७ मध्ये त्यांनी पहिलं फंडिंग मिळवलं.
8 / 9
लोकांना कंट्री डिलाइटचं दूध आवडू लागलं. हळूहळू त्यांनी भाजीपाला-फळं, पनीर, दही, हेल्दी स्नॅक्स, बेकरी उत्पादनं आपल्या ब्रँडमध्ये जोडली. त्यांचा व्यवसाय अॅपद्वारे सबस्क्रिप्शन मॉडेलवर चालतो. आज त्यांची कंपनी दुधासह दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करते.
9 / 9
एका महिन्यात ते ५ कोटी ऑर्डर डिलिव्हर करतात. त्यांचे ६ हजाराहून अधिक डिलिव्हरी पार्टनर्स आहेत. कंट्री डिलाइट देशभरातील १५ शहरांमध्ये कार्यरत आहे. यामध्ये दिल्ली एनसीआर, मुंबई, नोएडा, गुरुग्राम, हैदराबाद, चेन्नई यासारख्या मोठ्या शहरांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये त्यांनी ६०० कोटी रुपयांचा ऑपरेशनल महसूल मिळवला. आज कंट्री डिलाइटचे बाजार मूल्य ६१५ मिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचलं आहे.
टॅग्स :businessव्यवसायmilkदूधInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी