शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Fuel Price Hike: मालामाल! इंधनदरवाढीमुळे ‘या’ कंपनीची भन्नाट कमाई; तब्बल ५ हजार ९४१ कोटींचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2021 8:31 AM

1 / 12
गेले सलग १३ दिवस पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मात्र, त्यापूर्वी सातत्याने केलेल्या इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्य जनता अगदी मेटाकुटीला आल्याचे पाहायला मिळत आहे.
2 / 12
इंधन आणि गॅसदर वाढीमुळे महागाईतही वाढ करण्यात आली आहे. दुधासह भाजीपालाही महाग झाल्याचे दिसत असून, एकीकडे कोरोना, बेरोजगारी, अर्थचक्र मंदावलेले असताना इंधनाच्या दरांमध्ये झालेली वाढ देशवासीयांचे कंबरडे मोडणारी ठरताना दिसत आहे. (Fuel Price Hike)
3 / 12
मात्र, कोरोना काळात शेअर बाजारासह मेडिकल, सर्व्हिस, पायाभूत सुविधा या क्षेत्रातील कंपन्यांसह पेट्रोलियम कंपन्यांनाही भरघोस नफा झाल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोलियम क्षेत्रातील एका कंपनीने पहिल्याच तिमाहीत तब्बल ३०० टक्के नफा कमावल्याचे सांगितले जात आहे.
4 / 12
देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या इंडियन ऑइलकडून नुकताच तिमाहीचा निकाल जाहीर करण्यात आला. एप्रिल-जून तिमाहीत इंडियन ऑइलचा नफा दुप्पट झाला आहे. इन्व्हेंट्री गॅस आणि पेट्रोकेमिकल मार्जिनमुळे नफा वाढल्याचे इंडियन ऑइलकडून सांगण्यात आले.
5 / 12
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने तब्बल ५ हजार ९५१ कोटी रुपयांचा नफा कमावला असून, गेल्यावर्षी याच कालावधीत या कंपनीला १ हजार ९११ कोटी रुपयांचा नफा झाला होता. (Indian Oil Corporation)
6 / 12
गेल्या तिमाहीत इंडियन ऑइलला एकूण १,५५,०५६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. गेल्यावर्षी याच कालावधीत हा महसूल ८८,९३९ कोटी रुपये होता. एप्रिल ते जून या काळात इंडियन ऑइलने २०.३२५ कोटी टन उत्पादनांची विक्री केली.
7 / 12
या कालावधीत रिफायनिंग उत्पादन १६.७१९ कोटी टन इतके राहिले तर पाइपलाइन नेटवर्क उत्पादन १९.८७५ मिलियन टन इतके राहिले. इंडियन ऑइलला मिळणाऱ्या मार्जिनमध्येही वाढ झाली असून, गतवर्षी कंपनीला एका बॅरलमागे १.९८ डॉलर्स इतके रिफायनिंग मार्जिन मिळत होते. हेच मार्जिन आता ६.५८ डॉलर्सवर जाऊन पोहोचले आहे.
8 / 12
देशभरात पेट्रोल आणि डिझलचे दर सार्वकालिक उच्चांकावर आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही १०० रुपये प्रति लीटरपर्यंत गेली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून, इंधनदरवाढीचा मुद्दा गाजत आहे. परिणामी पेट्रोलियम कंपन्यांनी तूर्त वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.
9 / 12
राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश असून, भोपाळमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा सर्वाधिक दर असल्याचे पाहायला मिळत आहे.
10 / 12
मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये, चेन्नईत १०२.४९ रुपये, कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे.
11 / 12
मुंबईत डिझेलचा भाव ९७.४५ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये, चेन्नईत ९३.६३ रुपये, कोलकात्यात ९३.०२ रुपये, भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.६७ रुपये झाला आहे. बंगळुरात डिझेल ९५.२६ रुपये आहे.
12 / 12
जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ७५ डॉलरच्या पुढे गेला आहे. बुधवारी त्यात १.३१ डॉलरची वाढ झाली आणि ब्रेंटचा भाव प्रती बॅरल ७६.०५ डॉलर झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.३३ डॉलरने वाढला आणि तो ७३.६२ डॉलर इतका झाला.
टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेलbusinessव्यवसाय