शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनाला न जुमानता भारतीयांनी केली सोन्याची तुफान खरेदी, मागील १० वर्षातील रेकॉर्ड मोडीत...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 2:25 PM

1 / 11
भारताने 2021 या वर्षात सोने आयात (Gold Import) करण्याचा 10 वर्षांचा जुना विक्रम मोडला आहे. भारताने तब्बल 1,050 टन सोने आयात केले असून यावर एकूण 55.7 अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत.
2 / 11
हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे, तर 2011 नंतरचा हा उच्चांक आहे. 2020 मध्ये, कोरोना महासाथीमुळे 23 अब्ज डॉलर्सपेक्षाही कमी किमतीचे सोने आयात करण्यात आले.
3 / 11
आकडेवारीनुसार, 2020 मध्ये भारतात सुमारे 430 टन सोने आयात करण्यात आले. त्याची एकूण किंमत 22 अब्ज डॉलर्स होती. त्याच वेळी, 2011 मध्ये परदेशातून 53.9 अब्ज डॉलर्स किमतीचे सोने खरेदी करण्यात आले. भारताने 2020 मध्ये जगातील 30 देशांमधून 377 टन सोन्याच्या बार आणि बिस्किटांची आयात केली.
4 / 11
2021 मध्ये परिस्थिती सुधारल्यामुळे, सणासुदीच्या आणि लग्नाच्या हंगामात दागिन्यांची मागणी वाढली आहे, ज्याची पूर्तता करण्यासाठी व्यापाऱ्यांनी अधिक सोने आयात केले, अशी माहिती वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) सीईओ (भारत) सोमासुंदरम पीआर यांनी दिली.
5 / 11
गेल्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सणासुदीच्या काळात भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केल्याचे डब्ल्यूजीसीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. यानंतर लग्नसराईच्या काळातही सोन्याची विक्री वाढली. भारताने डिसेंबरमध्ये 86 टन सोने आयात केले, जे गेल्या वर्षीच्या 84 टनांच्या तुलनेत किंचित अधिक आहे.
6 / 11
वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) च्या मते, लॉकडाऊनमुळे 2020 मध्ये सोन्याची आयात सर्वात कमी होती. लग्नाच्या मोसमात सोन्याची मागणी सर्वाधिक असते, पण कोरोनामुळे लग्नसमारंभ 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आले. त्याचा थेट परिणाम सोन्याच्या आयातीवर झाला.
7 / 11
यावर्षी 23 अब्ज डॉलरपेक्षा कमी किमतीचे सोने आयात करण्यात आले. ऑगस्ट 2020 मध्ये स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या किमतीने 56,191 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी उच्चांक गाठला होता. 2021 मध्ये परिस्थिती सुधारली आणि वर्षाच्या सुरुवातीला भारतातील किरकोळ ग्राहकांसाठी सोने अधिक परवडणारे राहिल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
8 / 11
कोरोनाच्य नव्या व्हेरिअंट ओमायक्रॉनमुळे (Omicron) अनेक शहरांमध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे दुकानदारांनी सोन्याची खरेदी कमी प्रमाणात केली आहे. याचाच परिणाम म्हणून जानेवारीमध्ये सोन्याची आयात कमी होऊ शकते, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
9 / 11
मात्र, त्याचा परिणाम सुरुवातीच्या काही महिन्यांतच दिसून येतो. त्याच वेळी, सोमासुंदरम म्हणाले की, सध्याचे बाजार संकेत पाहता, 2022 मध्ये सोन्याची आयात या वर्षाच्या तुलनेत अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा आहे.
10 / 11
सोन्याच्या वापराच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. देशात सर्वाधिक सोने हे विदेशातून आयात केले जाते. एकूण सोन्याच्या आयातीपैकी 44 टक्के सोने स्वित्झर्लंडमधून आणि 11 टक्के संयुक्त अरब अमिरातीमधून खरेदी केले जाते.
11 / 11
गेल्या काही वर्षांतील कोणत्याही आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीतील सोन्याच्या आयातीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, 2014-15 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत 339.3 टन सोने आयात करण्यात आले होते.
टॅग्स :GoldसोनंIndiaभारत