शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

N. R. Narayana Murthy Birthday: ठरवलं अन् करुन दाखवलं! केवळ १० हजारांची गुंतवणूक आणि नारायण मूर्तींनी उभारलं इन्फोसिसचं साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 11:29 AM

1 / 12
इन्फोसिस आणि त्याचे प्रमुख एन आर नारायण मूर्ती हे जगात प्रसिद्ध आणि प्रचलित असलेलं नाव. जगभरातील अनेकविध उद्योग आणि उद्योजकांमध्ये नारायण मूर्ती यांचं नाव अगदी मानाने आणि अभिमानाने घेतले जाते. आपुलाची वाद आपणासी, या उक्तीप्रमाणे नारायण मूर्ती यांनी मनाशी पक्क ठरवले आणि केवळ १० हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर इन्फोसिसचे साम्राज्य उभे करून दाखवले. नारायण मूर्ती यांचा आज वाढदिवस (२० ऑगस्ट) असून, यानिमित्ताने अफाट कारकिर्दीचा घेतलेला थोडक्यात आढावा... (N. R. Narayana Murthy Birthday)
2 / 12
खऱ्या समर्पणाने एखादी गोष्ट करायची जिद्द माणसाने घेतली तर सर्व काही शक्य आहे, असे म्हणतात. देशातील दुसरी सर्वांत मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या इन्फोसिसचे सहसंस्थापक एनआर नारायण मूर्ती यांचेही असेच काहीसे आहे. नारायण मूर्ती असे व्यक्ती आहेत, ज्यांनी आपल्या मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर आपले नशीब बदलले आणि आज प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहे. नारायण मूर्ती यांची इन्फोसिस कंपनी जगभरात व्यवसाय करत आहे आणि लाखो लोकांना रोजगार देत आहे.
3 / 12
नारायण मूर्तींची यशोगाथा हिमालयाएवढी असली, तरी त्याचा संघर्षही तेवढाच मोठा आणि दीर्घकाळापर्यंत सुरू राहिलेला असाच आहे. विशेष म्हणजे आज जगभरातील लोकांना रोजगार देणारी त्यांची इन्फोसिस कंपनीही उधारीच्या पैशातून सुरू झाली होती. नारायण मूर्ती यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून कंपनी सुरू करण्यासाठी कर्ज घेतले होते, असे सांगितले जाते.
4 / 12
इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी कर्नाटकातील सिडलघट्टा येथे झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले नारायण मूर्ती आठ भावंडांमध्ये पाचव्या क्रमांकावर होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९६७ मध्ये म्हैसूर विद्यापीठाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. यानंतर त्यांनी १९६९ मध्ये आयआयटी कानपूरमधून एम.टेक केले. पुढे, १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात पुण्यातील पटणी कॉम्प्युटर्समध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून नोकरीला सुरुवात केली.
5 / 12
एनआर नारायण मूर्ती यांचा विवाह सुधा मूर्ती यांच्याशी १० फेब्रुवारी १९७८ रोजी बंगळुरू येथे झाला होता. लग्नानंतर नारायण मूर्तीच्या आयुष्यात मोठा बदल झाला. स्वत:ची कंपनी सुरू करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. सुरुवातीला नारायण मूर्ती यांनी सॉफ्ट्रोनिक्स नावाची कंपनी सुरू केली, पण त्यात त्यांना यश आले नाही. पण, नारायण मूर्ती आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
6 / 12
नारायण मूर्ती यांनी १९८१ मध्ये आपल्या ६ सहकाऱ्यांसोबत स्वतःची कंपनी सुरू करण्याची योजना आखली. त्या काळात नारायण मूर्ती पत्नी सुधासोबत एका खोलीच्या घरात राहत होते. कंपनीचे नाव इन्फोसिस असे निश्चित करण्यात आले आणि नारायण मूर्ती यांनी त्यांच्या स्थापनेतील हिस्सा भरण्यासाठी त्यांच्या पत्नीकडून १० हजारांचे कर्ज घेतले होते. पुण्यातील एका अपार्टमेंटमधून कंपनीची सुरुवात झाली. सन १९८३ मध्ये कंपनीचे मुख्यालय पुण्याहून बंगळुरूला हलवण्यात आले.
7 / 12
नारायण मूर्ती अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या पत्नीकडून पैसे उधार घेण्याच्या गोष्टीचा अभिमानाने उल्लेख करतात. आताच्या घडीला इन्फोसिसचा व्यवसाय अमेरिका, इंग्लंडसह जगातील अनेक देशांमध्ये आहे. नारायण मूर्ती हे १९८१ ते २००२ या काळात कंपनीचे सीईओ होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनी जगातील सर्वांत मोठ्या कंपन्यांच्या तोडीस तोड पोहोचली.
8 / 12
सन १९९१ मध्ये इन्फोसिसचे पब्लिक लिमिटेड कंपनीत रूपांतर झाले आणि सन १९९९ मध्ये तिचे शेअर्स अमेरिकन स्टॉक मार्केट NASDAQ वर सूचीबद्ध झाले. सध्या मार्केट कॅपनुसार, देशातील टॉप-१० कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश आहे. इन्फोसिसचे मार्केट कॅप ०६,७०,९२०.६४ कोटी रुपये आहे.
9 / 12
फोर्ब्सच्या रिअल टाइम यादीनुसार, भारतीय उद्योगपती आणि इन्फोसिसचे एनआर नारायण मूर्ती यांची एकूण संपत्ती ३.८ अब्ज डॉलर आहे. आताच्या घडीला इन्फोसिस ही एक सॉफ्टवेअर कंपनी आहे, जी व्यवसाय सल्ला, माहिती तंत्रज्ञान आणि आउटसोर्सिंग सेवा प्रदान करते. नारायण मूर्ती यांची एक गोष्ट, जी त्यांनी अनेकदा सांगितली आहे, ती यशाची गुरुकिल्ली मानली जाते.
10 / 12
नारायण मूर्ती म्हणतात की, तुम्ही कोणत्या संस्थेतून शिक्षण घेतले याने काही फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या मेहनतीने तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकता. नारायण मूर्ती यांना मिळालेल्या पुरस्कारांची मोठी यादी आहे. व्यावसायिक जगतात मिळालेल्या इतर पुरस्कारांव्यतिरिक्त, सन २००० मध्ये त्यांना भारत सरकारने 'पद्मश्री' ने सन्मानित केले होते. यानंतर, २००८ मध्ये त्यांना भारत सरकारने 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित केले.
11 / 12
इतकेच नाही तर २००८ मध्ये फ्रेंच सरकारने त्यांना 'ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर' देऊन सन्मानित केले. नारायण मूर्ती यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले, तर त्यांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव रोहन मूर्ती आणि मुलीचे नाव अक्षता मूर्ती आहे. अक्षताने सध्याचे ब्रिटनमधील पंतप्रधानपदासाठीचे प्रबळ उमेदवार आणि ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्याशी लग्न केले आहे.
12 / 12
नारायण मूर्तींची मुलगी अक्षता संपत्तीच्या बाबतीत ब्रिटनच्या राणी एलिझाबेथपेक्षा जास्त श्रीमंत आहे. जावई ऋषी सुनक यांनाही नारायण मूर्ती यांच्या संघर्षाचा अभिमान आहे. माझ्या सासर्‍यांकडे काहीच नव्हते. त्याच्या डोळ्यात फक्त एक स्वप्न होते आणि माझ्या सासूने दिलेले काही पैसे, ज्यातून त्यांनी जगातील सर्वांत मोठी आणि प्रतिष्ठित कंपनी उभारली. इंग्लंडमध्येही या कंपनीचे हजारो कर्मचारी आहेत. ही एक अशी कथा आहे ज्याचा मला खरोखर अभिमान आहे, असे सूनक अभिमानाने सांगतात.
टॅग्स :Infosysइन्फोसिसNarayana Murthyनारायण मूर्तीSudha Murtyसुधा मूर्ती