शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' योजनेत ₹१२५०० गुंतवा, मुलीच्या भविष्याची तरतूद करा; ७० लाख जोडण्याचं गणित समूजन घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 9:04 AM

1 / 8
सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही मुलींसाठी करमुक्त असलेली अल्प बचत योजना आहे. सरकारनं २०२४ च्या जानेवारी-मार्च तिमाहीसाठी या योजनेचा व्याजदर ८.२% ठेवला आला आहे. अल्पबचत योजनेतील हा दर सर्वाधिक आहे. यामध्ये गुंतवलेली १.५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम 80C अंतर्गत कर सवलतीच्या कक्षेत येते. यातून मिळणारं व्याजही करमुक्त असतं.
2 / 8
उच्च व्याजदर आणि कर लाभ यामुळे मुलींच्या पालकांसाठी सुकन्या समृद्धी चांगली योजना ठरते. सुकन्या समृद्धी योजनेतील खात्यांवरील परताना हा व्याज दर आणि गुंतवणूक केलेल्या रकमेवर अवलंबून असतो. या योजनेमुळे तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणासंबंधी आणि इतर आर्थिक गरजा कशा पूर्ण करू शकता हे पाहू.
3 / 8
सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, मुलीनं भारतीय नागरिक असणं आणि सोबतच पालक किंवा कायदेशीर पालक असणं आवश्यक आहे. योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मुलीचे वय १० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावं. अशा प्रकारे, मुलगी जन्माला येताच आणि १० वर्षांची होईपर्यंत सुकन्या समृद्धी खातं उघडता येतं. काही अपवाद वगळता सुकन्या समृद्धी खाती दोन मुलींसाठी जास्तीत जास्त दोन वेळा उघडता येतात.
4 / 8
सुकन्या समृद्धी खातं पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत उघडता येते. तुम्ही याची सुरुवात किमान २५० रुपयांपासून करू शकता. त्यानंतर कोणत्याही आर्थिक वर्षात किमान २५० रुपये जमा करावे लागतील. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त तुम्ही १.५ लाख रुपये गुंतवू शकता. एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय देखील आहे.
5 / 8
सुकन्या समृद्धी खात्यावर २०२४ च्या जानेवारी-मार्च तिमाहीसाठी ८.२ टक्के व्याज मिळेल. व्याज दर प्रत्येक तिमाहीत बदलला जातो. नवीन दर सुकन्या समृद्धी ग्राहकांना लागू होईल. सुकन्या समृद्धी योजनेचा मॅच्युरिटीचा भाग थोडा ट्रिकी आहे. खातं उघडल्यापासून १५ वर्षांपर्यंत पैसे जमा करावे लागतील. खातं उघडण्याच्या तारखेपासून २१ वर्षांनी ते मॅच्युअर होईल.
6 / 8
मुलीच्या लग्नाच्या वेळी (जिच्या नावावर खातं आहे) ती १८ वर्षांची झाल्यानंतर खातं बंद करण्याचा पर्याय आहे. ही योजना ५० टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी देते. पण, हे फक्त मुलीच्या शिक्षणाच्या खर्चासाठी करता येते. काही अटींच्या अधीन राहून खाते उघडल्यानंतर पाच वर्षांनी मुदतपूर्व बंद करण्याची परवानगी आहे. यामध्ये खातेधारकाचा मृत्यू, घातक आजार किंवा खातं चालवणाऱ्या पालकाचा मृत्यू यांचा समावेश होतो.
7 / 8
सुकन्या समृद्धी खात्यावरील व्याज दर प्रत्येक तिमाहीत सुधारित केला जातो. सुरुवातीपासून, सुकन्या समृद्धी योजनेत जास्तीत जास्त ९.२% व्याजदर देण्यात आला आहे. योजनेचा किमान व्याज दर ७.६% आहे. सोयीसाठी, कॅलक्युलेशन म्हणून ८ टक्के व्याजदर गृहीत धरू. हे लक्षात घेता, जर तुम्ही सुकन्या समृद्धीमध्ये १५ वर्षांसाठी दरवर्षी १.५ लाख रुपये (म्हणजे १२,५०० रुपये दरमहा) गुंतवले, तर मुलीला २१ वर्षांनंतर मॅच्युरिटीवर अंदाजे ७० लाख रुपये मिळतील. जर तुम्ही दरवर्षी १ लाख रुपये म्हणजेच १५ वर्षांसाठी दरमहा ८,३३३.३३ रुपये गुंतवले तर, तुमच्या मुलीला २१ वर्षानंतर मॅच्युरिटीवर ४६.५ लाख रुपये मिळतील.
8 / 8
सुकन्या समृद्धी खातं EEE (एक्झम्प्ट-एक्झम्प्ट) श्रेणी अंतर्गत येतं. तुम्ही आयकर कायदा, १९६१ च्या कलम 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर कपातीचा दावा करू शकता. यावर दरवर्षी मिळणारं व्याजही करमुक्त असतं. याशिवाय मुलीला मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या रकमेवर (मुद्दल + व्याज) कोणताही कर नाही. सुकन्या योजना खात्यातून आंशिक पैसे काढणंदेखील करमुक्त आहे.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकGovernmentसरकार