शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

₹३.९२ वर आला ₹३२४ वाला शेअर, आता बंद झालं ट्रेडिग; दिवाळखोरी प्रक्रियेतून जातेय कंपनी

By जयदीप दाभोळकर | Updated: April 14, 2025 15:26 IST

1 / 6
Jaiprakash Associates Limited Share: गेल्या काही काळात शेअर बाजारात झालेल्या प्रचंड उलथापालथीदरम्यान जयप्रकाश असोसिएट्सचे शेअर्स सतत चर्चेत असतात. कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असल्यानं शेअर्सचं ट्रेडिंग तूर्तास थांबवण्यात आलं आहे. जयप्रकाश असोसिएट्सच्या शेअर्समध्ये बुधवारी, ९ एप्रिल रोजी शेवटचा व्यवहार झाला होता.
2 / 6
बुधवारी या शेअरमध्ये जवळपास ५ टक्क्यांची वाढ झाली आणि व्यवहारादरम्यान तो ३.९२ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. ९ एप्रिलपासून जवळपास दोन ट्रेडिंग दिवस झालेत, पण यादरम्यान, या शेअरचं ट्रेडिंग झालं नाही. महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी शेअर बाजार बंद होता आणि आज सोमवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शेअर बाजारात व्यवहार झाला नाही.
3 / 6
अब्जाधीश गौतम अदानी यांचा समूह, खाण उद्योगपती अनिल अग्रवाल यांची वेदांता आणि योगगुरू रामदेव बाबा यांची पतंजली आयुर्वेद यांच्यासह तब्बल २६ कंपन्या कर्जबाजारी जयप्रकाश असोसिएट्सचे अधिग्रहण करण्याच्या विचारात आहेत. जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड (जेएएल) विकत घेण्यास इच्छुक असलेल्या इतर कंपन्यांमध्ये अहमदाबादस्थित टोरेंट ग्रुप, जिंदाल पॉवर, डालमिया सिमेंट, जीआरएम बिझनेस, ओबेरॉय रियल्टी आणि कोटक अल्टरनेट अॅसेट मॅनेजर्स लिमिटेड यांचा समावेश आहे. नुकतीच कंपनीनं शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे.
4 / 6
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) अलाहाबाद खंडपीठाने ३ जून २०२४ रोजी दिलेल्या आदेशानं जेएएलविरोधात कॉर्पोरेट दिवाळखोरी निवारण प्रक्रिया (सीआयआरपी) सुरू करण्यात आली होती. थकीत कर्जाची परतफेड न केल्यानं कंपनीला दिवाळखोरीच्या प्रक्रियेत हलविण्यात आलं होतं. बँकांनी एकूण ५७,१८५ कोटी रुपयांचा दावा केला होता. जयप्रकाश असोसिएट्सच्या म्हणण्यानुसार, ११ मार्च २०२५ पर्यंत वित्तीय संस्थांचे एकूण थकित कर्ज ५५,४०९.२८ कोटी रुपये होतं.
5 / 6
जयप्रकाश असोसिएट्सच्या शेअरच्या किमतीच्या हिस्ट्रीनुसार ४ जानेवारी २००८ रोजी शेअरचा भाव ३२४ रुपये होता. सध्या कंपनीचा शेअर ३.९२ रुपयांवर आला आहे. म्हणजेच या काळात कंपनीच्या शेअरमध्ये ९८ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. कंपनीचे शेअर्स एका वर्षात ८० टक्क्यांनी घसरले असून २०२५ मध्ये आतापर्यंत ३४ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. सहा महिन्यांत हा शेअर ५१ टक्क्यांनी घसरलाय. मात्र, ९ एप्रिलपासून गेल्या पाच दिवसांत त्यात १६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तर जेपी असोसिएट्सचे शेअर्स पाच वर्षांत २०० टक्क्यांनी वधारलेत.
6 / 6
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकAdaniअदानीpatanjaliपतंजली