'या' भारतीय कंपनीने मिळवला जगातील नंबर 1 स्टील कंपनीचा किताब; कोण आहे मालक..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 18:35 IST
1 / 6 JSW Steel: देशातील दिग्गज स्टील कंपनी JSW स्टील लिमिटेडने एक मोठी कामगिरी केली आहे. कंपनीने आर्सेलर मित्तल आणि नुकोर कॉर्प सारख्या अनेक कंपन्यांना मागे टाकत जगातील सर्वात मौल्यवान स्टील कंपनी बनली आहे. कंपनीचे $30.31 अब्ज डॉलर्सचे बाजार भांडवल, हे त्याच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा $91 दशलक्ष ते $3 बिलियनने जास्त आहे. जेएसडब्ल्यू ग्रुपचे विजयनगर, डोलवी आणि सेलम येथे प्लांट आहेत. 2 / 6याशिवाय कंपनीचा व्यवसाय अमेरिकेपासून इटलीपर्यंत पसरलेला आहे. सध्या त्यांची पोलाद निर्मिती क्षमता 35.7 दशलक्ष टन (MT) आहे. आर्थिक वर्ष 2028 पर्यंत ते 43.5 MT आणि 2031 पर्यंत 51.5 MT पर्यंत वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. मोतीलाल ओसवाल येथील विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, कंपनीची ही व्याप्ती JSW स्टीलला दीर्घकालीन वाढीसाठी तयार करते. 3 / 6 पार्थ जिंदल यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर लिहिले की, ''हे सांगताना मला खूप गर्व वाटतोय की, JSW स्टील बाजार भांडवलाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी बनली आहे.'' आपल्या पोस्टमध्ये त्यांनी वडील साजन जिंदाल आणि आई संगिता जिंदालसह संपूर्ण JSW ग्रुपचे आभार मानले. 4 / 6 1982 मध्ये स्थापन झालेली JSW स्टील ही उच्च दर्जाची आणि तंत्रज्ञानासह पोलाद निर्मिती करणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. JSW समूहाच्या या प्रमुख कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. त्यांचा कर्नाटकातील तोरणगल्लू येथे स्टील प्लांट आहे. 5 / 6 साजन जिंदाल हे जेएसडब्ल्यू स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांची आई सावित्री एस जिंदाल या कंपनीच्या चेअरपर्सन आहेत. कंपनीचे सीईओ जयंत आचार्य आहेत. त्यांच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये सपाट आणि लांब स्टीलचा समावेश आहे, ज्याचा वापर ऑटोमोटिव्ह, बांधकाम यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये केला जातो.6 / 6 कंपनीला जगातील नंबर 1 पोलाद कंपनीचा मान मिळाल्याचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला. जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स 18 टक्क्यांनी वाढले. निफ्टीवरही तो अव्वल कामगिरी करणारा ठरला. ब्रोकरेज फर्म Investec ने कंपनीच्या शेअर्सना 'बाय' रेटिंग दिले आहे, तर त्याची लक्ष्य किंमत 1,100 रुपये ठेवली आहे.