शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC शेअरमधून मोदी सरकारने २१ हजार कोटी कमावले; गुंतवणूकदारांचे ८७,५०० कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 11:52 AM

1 / 12
देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ ठरलेल्या LIC ने शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग झाल्यानंतर गुंतवणूकदारांची घोर निराशाच केली आहे. आतापर्यंत एलआयसीचा शेअर मोठ्या प्रमाणावर घसरताना पाहायला मिळत आहे.
2 / 12
जगभरासह देशांतर्गत परिस्थितीचा प्रतिकूल प्रभाव शेअर मार्केटवर पडताना दिसत आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धासह कोरोनाचे संकट काही ठिकाणी वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत परकीय गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्यामुळे शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार दिसून येत आहेत.
3 / 12
LIC चा शेअर १७ मे रोजी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग झाला होता. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत एकदाही या शेअरने आयपीओवेळी निश्चित करण्यात आलेली किंमत ओलांडलेली नाही. यामुळे गुंतणूकदारांचे मोठे नुकसान होत असून, ते वाढतच चाललेले पाहायला मिळत आहे.
4 / 12
बाजारातील अस्थिरतेमुळे LIC ची सुरुवात कमकुवत झाली असे सांगण्यात येत असले, तरी एलआयसीचा आयपीओ बाजारात आणण्याची सरकारची घाई नडली असल्याचा सूर समाजमाध्यमांवर आळवला जात आहे.
5 / 12
LIC IPO साठी एका समभागासाठी ९४९ रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर तो शेअर बाजारात ८७२ रुपयांवर लिस्ट झाला. परकीय गुंतवणूकदारांनी एलआयसी आयपीओकडे पाठ फिरवूनही समभाग किरकोळ आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी विकत घेतले.
6 / 12
बाजारातील अनपेक्षित परिस्थितीमुळे देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी LIC ची शेअर बाजारातील सुरुवात घसरणीने झाली असल्याचे सांगितले जात आहे. केंद्र सरकारने LIC मधील २२.१३ कोटी समभाग किंवा ३.५ टक्के हिस्सेदारी विकली असून, यातून सरकारला २१ हजार कोटी रुपये मिळाले आहेत.
7 / 12
LIC च्या शेअर विक्रीतून केंद्र सरकार तुपाशी आणि गुंतवणूकदार उपाशी अशी परिस्थिती असल्याचे सांगितले जात आहे. कारण, आतापर्यंतच्या एलआयसी शेअरच्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे ८७ हजार ५०० कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
8 / 12
मोठ्या कंपनीचा दर्जा मिळालेल्या LIC चे मूल्य आता ICICI बँकेच्या MCap पेक्षा कमी झाले आहे. LIC चा शेअर बीएसई ८१०.५५ रुपयांवर बंद झाला. ट्रेडिंग दरम्यान, तो एकावेळी ८१७ रुपयांपर्यंत वाढला आणि ८०८.५५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला.
9 / 12
LIC ची सर्वकालीन निम्न पातळी ८०१.५५ रुपये आहे. या घसरणीनंतर एलआयसीचे मूल्य ५,१२,६७२.६९ कोटी रुपयांवर आले. हे ICICI बँकेच्या ५,२३,३५३.८७ कोटी रुपयांच्या मार्केट कॅपपेक्षा कमी आहे.
10 / 12
दरम्यान, आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या चौथ्या तिमाहीत LIC नफ्यात १७ टक्के घसरण झाली. त्याचे पडसाद आज शेअरवर उमटले. यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. 'एलआयसी'च्या शेअरवर सर्वांच्या नजरा होत्या. मात्र निराशाजनक आर्थिक कामगिरीचा फटका शेअरला बसला.
11 / 12
चौथ्या तिमाहींच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर LIC चा शेअर २ टक्क्यांनी वधारला होता. मात्र, निकाल हाती आल्यानंतर तो पुन्हा घसरला. जानेवारी ते मार्च २०२२ या तिमाहीत महामंडळाला २,४०९.३९ कोटींचा नफा झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा नफ्यात १७.४१ टक्के घसरण झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत एलआयसीला २,९१७.३३ कोटींचा नफा झाला होता.
12 / 12
या तिमाहीत LIC चे निव्वळ उत्पन्न १,४४,१५८.८४ कोटी इतके राहिले. त्यात १७.८८ टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत एलआयसीला १,२२,२९०.६४ कोटींचा महसूल मिळाला होता. LIC ला गुंतवणुकीतून चौथ्या तिमाहीत ६७,८५५.५९ कोटींचे उत्पन्न मिळाले.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीLic IPOएलआयसी आयपीओshare marketशेअर बाजार