शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Reliance's Mango Farming: कोरडवाहू जमिनीतून मुकेश अंबानी यांनी उगवलं सोनं; कृषी क्षेत्रातही रोवला झेंडा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 9:57 PM

1 / 5
Mukesh Ambani : देशासह आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी कृषी क्षेत्रात आपला झेंडा फडकवत आहेत. तेल आणि रिलायन्स जिओच्या जोरावर जगातील अव्वल उद्योगपतींमध्ये गणले जाणारे अंबानी आता कृषी क्षेत्रातही आपली छाप सोडत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली त्यांनी कंपनीला जगातील सर्वात मोठी आंबा निर्यातदार कंपनी बनवले आहे. फार कमी लोकांना माहित असेल की, अंबानी यांच्या नावावर शेकडो एकर शेती आहे, ज्यातून ते वर्षाला कोट्यवधींचे उत्पन्न मिळवतात.
2 / 5
वाढत्या प्रदूषणावर काढला उपाय-1997 मध्ये गुजरातच्या जामनगर रिफायनरीतील प्रदूषण ही एक मोठी समस्या बनली होती. यातून सुटका करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने असा उपाय शोधून काढला की, आज जगभरात त्याचे कौतुक होत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि सरकारी नियमांचे पालन करण्यासाठी रिलायन्सने रिफायनरीच्या आजूबाजूच्या नापीक जमिनीचे मोठ्या आंब्याच्या बागेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाचा उद्देश प्रदूषण कमी करणे, तसेच रिफायनरीभोवती ग्रीन बेल्ट निर्माण करणे हा होता.
3 / 5
600 एकर क्षेत्रात 1.3 लाख आंब्याची झाडे-600 एकरांवर पसरलेल्या या आंब्याच्या बागेला रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचे नाव देण्यात आले आहे. बागेत 200 हून अधिक जातींची सुमारे 1.3 लाख आंब्याची झाडे आहेत. परिसरातील कोरडवाहू जमिनीत आंब्याच्या झाडांचे उत्तम उत्पादन होण्यासाठी रिलायन्सने आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. या प्लांटच्या माध्यमातून परिसरातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी झाले. याशिवाय जलसंचय, ठिबक सिंचन आणि एकाचवेळी खतनिर्मिती यांसारख्या प्रगत कृषी तंत्रांचाही वापर करण्यात आला.
4 / 5
दरवर्षी 600 टन आंब्याचे उत्पादन-मुकेश अंबानींच्या या बागेत आंब्याचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये केसर, हापूस, रत्ना, सिंधू, नीलम आणि आम्रपाली या देशातील प्रसिद्ध आंब्याव्यतिरिक्त फ्लोरिडा येथील टॉमी ॲटकिन्स, केंट आणि लिली, इस्रायलमधील कीट आणि माया या विदेशी जातींचे उत्पादन केले जाते. बागेतून दरवर्षी सुमारे 600 टन आंब्याचे उत्पादन करणारी रिलायन्स ही देशातीलच नव्हे, तर आशिया खंडातील सर्वात मोठी आंबा निर्यात करणारी कंपनी म्हणून उदयास आली आहे.
5 / 5
आंबा निर्यातीच्या बाबतीत रिलायन्सचा देशातील आणि जगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये समावेश होतो. आंब्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त, दरवर्षी रिलायन्स जामनगरमधील शेतकऱ्यांना एक लाख आंब्याच्या रोपांचे वाटप करते. याशिवाय रिलायन्सतर्फे शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी तंत्रांवर आधारित प्रशिक्षण सत्रेही आयोजित केली जातात.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीRelianceरिलायन्सbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूक