शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

IPO ची त्सुनामी! वर्षभरात ६३ कंपन्यांनी कमावले तब्बल १.१८ लाख कोटी; २०२२ विक्रमी ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 12:11 PM

1 / 15
गेल्या अनेक दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटची वाढती चिंता याचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. मात्र, शेअर मार्केटमध्ये IPO चा ओघ सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.
2 / 15
तेजीवर स्वार झालेल्या भांडवली बाजारातील पोषक वातावरणाचा फायदा घेत, जानेवारी २०२१ पासून ६३ कंपन्यांनी प्रारंभिक समभाग विक्रीच्या (IPO) माध्यमातून १,१८,७०४ कोटींचा विक्रमी निधी उभारला आहे.
3 / 15
शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने आगेकूच कायम ठेवत चालू वर्षात ऑक्टोबरमध्ये ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली. या अनुकूल वातावरणाचा फायदा घेत तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप कंपन्यांनी भागविक्रीत आघाडी मिळविल्याचे दिसून आले.
4 / 15
या नवउद्यमी कंपन्या तोट्यात असूनदेखील मोठा निधी उभारण्यास यशस्वी होण्याबरोबरच पदार्पणात त्यांच्या समभागांनी मोठे अधिमूल्यही मिळविले आहे. चालू वर्षात IPO च्या माध्यमातून कंपन्यांनी २०२० च्या तुलनेत ४.५ पट अधिक निधी उभारला.
5 / 15
त्या वर्षात १५ कंपन्यांनी २६,६१३ कोटींचा निधी उभारला होता. तर भांडवल उभारणीसाठी सर्वात चांगले वर्ष ठरलेल्या २०१७ मध्ये ६८ हजार ८२७ कोटी रुपयांचा निधी गोळा करण्यात आला होता, अशी माहिती प्राइम डेटाबेसने प्रसिद्ध केलेल्या अहवालाने पुढे आणली आहे.
6 / 15
एकूणच सार्वजनिक विक्रीच्या माध्यमातून २०२१ मध्ये उभारण्यात आणलेल्या निधीने आतापर्यंत २,०२,००९ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. हे १,७६,९१४ कोटी रुपयांच्या २०२० मधील आधीच्या उच्चांकापेक्षा जास्त आहे.
7 / 15
डिजिटल वित्तीय सेवा क्षेत्रातील पेटीएमकडून प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून विक्रमी १८ हजार ३०० कोटी रुपये, तर त्यापाठोपाठ घरोघरी खाद्यपदार्थाचा बटवडा करणारे व्यासपीठ असलेल्या झोमॅटोने ९ हजार ३०० कोटी रुपयांचा निधी उभारला. या वर्षाच्या आयपीओचे सरासरी आकारमान १ हजार ८८४ कोटी रुपये राहिले.
8 / 15
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकूण भांडवली उभारणी करण्यात आलेल्या २,०२,००९ कोटींपैकी ५१ टक्के म्हणजेच १,०३,६२१ कोटी रुपयांची नवीन भांडवल उभारणी झाली आहे. उर्वरित ९८ हजार ३८८ कोटी रुपयांचा निधी प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांकडील समभागांच्या हिस्सा विक्रीतून (ऑफर फॉर सेल) उभारण्यात आला आहे.
9 / 15
किरकोळ गुंतवणूकदारांकडून (रिटेल) मिळालेला मोठा प्रतिसाद हा या वर्षातील आयपीओचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार ५९ कंपन्यांपैकी ३० कंपन्यांच्या आयपीओला १० पट, ६ कंपन्यांच्या आयपीओला १०० पट अधिक भरणा झाला. तर २३ कंपन्यांना १ ते ३ पट प्रतिसाद प्राप्त मिळाला.
10 / 15
IPO ला बोली लावणारे किरकोळ गुंतवणूकदारांकडून प्रति आयपीओ सरासरी १४.३६ लाख अर्ज करण्यात आले. ज्याचे प्रमाण २०२० मध्ये १२.७७ लाख आणि २०१९ मध्ये अवघे ४.०५ लाख होते. ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसच्या IPO साठी किरकोळ गुंतवणूकदारांकडून सर्वाधिक म्हणजे ३३.९५ लाख अर्ज करण्यात आले.
11 / 15
देवयानी इंटरनॅशनलसाठी ३२.६७ लाख आणि लेटेंट व्ह्यूसाठी ३१.८७ लाख अर्ज आले. डिसेंबरपर्यंत ५८ पैकी ४० कंपन्यांचे समभाग प्रारंभिक विक्रीद्वारे गुंतवणूकदारांना दिलेल्या किमतीपेक्षा अधिक पातळीवर व्यवहार करत आहेत.
12 / 15
चालू वर्षात ११५ कंपन्यांनी आयपीओसाठी भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडे आयपीओसाठी प्रस्ताव दाखल केले होते. २०२२ कॅलेंडर वर्षासाठी ५० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी ३५ कंपन्यांना ‘सेबी’ने हिरवा कंदील दिला आहे.
13 / 15
LIC वगळता ३३ कंपन्या प्राथमिक बाजारातून ६० हजार कोटींचे निधी उभारणीचे प्रस्तावर सेबीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. ‘एलआयसी’च्या आयपीओची यात भर पडल्यास २०२२ हे नवीन विक्रम नोंदविणारे ठरेल.
14 / 15
शेअर मार्केटमध्ये नव्याने सूचिबद्ध झालेल्या ५८ कंपन्यांपैकी ३४ कंपन्यांनी पदार्पणाच्या दिवशीच १० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला.
15 / 15
त्यापैकी सिगाची इंडस्ट्रीजने सर्वाधिक २७० टक्के, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीजने १८५ टक्के आणि लॅटन्ट व्ह्यूने १८५ टक्क्यांपर्यंत परतावा दिला.
टॅग्स :IPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगshare marketशेअर बाजार