शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mutual Fund Investment : अंबानी, अदानी, टाटाचे शेअर्स खरेदी करायला फक्त २५० रुपयेच पुरणार! 'या' प्लाननं बदलेल संपूर्ण चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 8:51 AM

1 / 8
Share Market Investment : सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक ही अतिशय महत्त्वाची आहे. परंतु ती गुंतवणूक योग्य ठिकाणी करणं तितकंच महत्त्वाचं आहे. दरम्यान, हल्ली गुंतवणूकीसाठी अनेक जण शेअर बाजाराकडे वळतात. इतर पर्यायांच्या दृष्टीनं जोखीम जरी अधिक असली शेअर बाजारातील म्युच्युअल फंडातून मिळणारा परतावा हा तुलनेनं अधिक असतो. परंतु आता बाजार नियामक सेबी गुंतवणूकदारांना आणखी दिलासा देण्याची शक्यत आहे.
2 / 8
बाजार नियामक सेबी लवकरच म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणुकीची किमान रक्कम ५०० रुपयांवरून २५० रुपयांपर्यंत कमी करणार आहे. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच एका कार्यक्रमादरम्यान बाजार नियामक सेबी पेटीएम सारखं कंटॅमिनेशन होऊ देणार नाही असंही म्हणाल्या. सेबी गुंतवणुकीसाठी काटेकोरपणे केवायसी नियमांचे पालन करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
3 / 8
देशात मोठ्या संख्येने लोक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंडाच्या योजना लोकांकडून पैसे गोळा करतात आणि डेट, इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. यामुळे देशातील मोठ्या कंपन्यांकडून मध्यम आणि छोट्या कंपन्यांमध्ये माफक बचत करूनही लोक पैसे गुंतवू शकतात, असं बूच यांनी नमूद केलं.
4 / 8
बाजार नियामक सेबी म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूकीची किमान रक्कम ५०० वरून २५० करण्याच्या प्रस्तावावर लवकरच विचार करेल. हे पाऊल गुंतवणूकीला आणखी सुलभ करण्यासाठी उचललं जात असल्याचं बूच म्हणाल्या.
5 / 8
याशिवाय पेटीएमसारख्या कंटॅमिनेशन खपवून घेतलं जाणार नाही आणि गुंतवणूकीसाठी केवायसी नियमांचं पालन कठोरपणे केलं जाईल. केवायसी ही अशी प्रक्रिया आहे जी आर्थिक सस्थांना आपल्या ग्राहकांची ओळख आणि त्यांच्या देवाणघेवाणीची माहिती देते, असं बूच यांनी स्पष्ट केलं
6 / 8
सेकंडरी मार्केटसाठी एएसबीएसारखी यंत्रणा तयार करण्याचा प्रस्ताव सेबी लवकरच आपल्या संचालक मंडळाकडे पाठवणार असल्याचं बूच यांनी सांगितलं. ही प्रणाली बंधनकारक असणार आहे. निवडक ब्रोकर्सकडून ती उपलब्ध करून दिली जाणार आहे. एएसबीए (अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट) ही एक प्रणाली आहे, ज्यामध्ये आयपीओ अर्जाची रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात ब्लॉक केली जाते. मग शेअर्स चे वाटप झाल्यावरच ते दिले जातात.
7 / 8
सेबीनं असंही म्हटलंय की एएसबीए सेटलमेंट यंत्रणा सेकंडरी मार्केटसाठी काही काळ ऐच्छिक तत्त्वावर उपलब्ध होती. निवडक ब्रोकर्ससाठी ती बंधनकारक करण्याची वेळ आली आहे. प्राथमिक बाजारात एएसबीए अंतर्गत आयपीओ अर्जाची रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात ब्लॉक केली जाते. जेव्हा शेअर्सचे वाटप केले जाते तेव्हाच ती कट केली जाते.
8 / 8
सध्या सोशल मीडियावर अनेक फिन्फ्लुएंसरचा सुळसुळाट आहे. नियामक लवकरच यासंदर्भात अॅडव्हायझरी जारी करणार आहे. गुंतवणूकदारांवर फिन्फ्लुएंसरचं नकारात्मक परिणाम दूर करणं हे त्याचं उद्दीष्ट आहे. (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारSEBIसेबीInvestmentगुंतवणूक