शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

‘या’ सुपरहिट आयडियानं केली कमाल, ५० टनवरून २००० टन झाली Parle-G ची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 4:42 PM

1 / 8
पार्ले-जी हे वर्षानुवर्षे भारतातील प्रत्येक घराघरात प्रसिद्ध नाव आहे. शहर असो वा खेडे, प्रत्येक मुलाला पार्ले-जी हे नावही परिचित आहे. पार्ले-जीच्या लोकप्रियतेच्या जवळपास दुसरा कोणताही ब्रँड आलेला नाही. याचे कारण तुम्हाला सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
2 / 8
पार्ले-जी च्या या यशामागे 90 च्या दशकातील लोकप्रिय सुपरहिरो पात्र शक्तीमान (Shaktiman) आहे. शक्तीमानमुळे, एका महिन्यात पार्ले-जी बिस्किटांची विक्री 50 टनांवरून 2000 टनांवर गेली. 1990 च्या अखेरची ही गोश्ट आहे. त्या काळात शक्तीमान हा कार्यक्रम अतिशय गाजला होता. विशष म्हणजे हा सुपरहिरो लहान मुलांच्या पसंतीस उतरला होता.
3 / 8
1997 ते 2005 या कालावधीत हा कार्यक्रम टिव्हीवर दाखवण्यात येत होता. अभिनेते मुकेश खन्ना यांनी यात शक्तीमानची भूमिका साकारली होती. मुकेश खन्ना यांच्यासोबत केलेला प्रचार यशस्वी ठरल्याचे मार्केटिंग स्टॅटेजिस्ट संजय मुडनानी सांगतात. इतकंच काय तर सर्वात कठीण बाजारपेठांपैकी असलेल्या तामिळनाडूमध्येही पार्ले जी चं वर्चस्व निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं.
4 / 8
त्या काळात मुडनानी यांनी त्यांची पहिली इंटिग्रेटेड मार्केटिंग कंपनी स्थापन केली होती. पार्ले-जी हे त्यांचे क्लायंट होते. मुदनानी सांगतात की सुमारे 25 वर्षांपूर्वी पार्ले प्रॉडक्ट्सचे मार्केटिंग हेड प्रवीण कुलकर्णी यांनी त्यांना तामिळनाडूच्या बाजारपेठेसमोरील आव्हानांची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले होते की बाजारात मिल्क बिस्किटांचे वर्चस्व आहे आणि ब्रिटानियाची मिल्क बिस्किटे सर्वाधिक विकली जातात. पार्ले-जी हे ग्लुकोजचे बिस्किट आहे आणि त्या वेळी बाजारात त्याची उपस्थिती नव्हती, परंतु ते दक्षिणेकडील बाजारपेठेत संधी शोधत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
5 / 8
“आम्ही एक प्रयोग करण्याचे ठरवले. तामिळनाडूतील मुलांमध्ये शक्तीमान सुपरहिरो हे पात्र खूप लोकप्रिय होता. याशिवाय ते पात्र पार्ले-जीचे नॅशनल ब्रँड अॅम्बेसेडरही होते. शक्तीमानच्या व्यक्तिरेखेत एनर्जी, स्टॅमिना, स्ट्रेंथ आणि गुड व्हॅल्युज या सर्व गोष्टी होत्या, ज्या पार्ले-जी बिस्किटांशी संबंधित होत्या,” असे ते म्हणाले.
6 / 8
त्यामुळे मुदनानी यांनी शक्तीमान म्हणजेच मुकेश खन्ना यांना चेन्नईला घेऊन मुलांशी ओळख करून देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मैदान बुक करण्यात आले आणि प्रत्येक व्यक्तीला प्रवेश तिकीट म्हणून पार्ले-जीच्या दोन रिकाम्या रॅपर्सची अट ठेवण्यात आली. त्यांच्या टीमने शाळांमध्ये या कार्यक्रमाचा प्रचार केला आणि वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या.
7 / 8
मुदनानी म्हणतात की त्यांची टीम गृहीत धरत होती की काही हजार मुले त्यांच्या पालकांसोबत कार्यक्रमाला येतील. पण नंतर घडलेल्या प्रकाराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ते सांगतात, 'सकाळी नऊ वाजता गर्दी नव्हती आणि मोजकीच मुलं त्यांच्या पालकांसोबत येत होती. शक्तीमान म्हजेच मुकेश खन्ना स्टेजवर वाट पाहत होते आणि मला काळजी वाटू लागली. त्यानंतर काही स्कूल बस येऊन थांबल्या, त्यानंतर आणखी काही बस आल्या आणि बघता बघता गोंधळ पसरला. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हीच परिस्थिती होती आणि लाखोंच्या संख्येने मुले शक्तीमानला भेटण्यासाठी आली होती. गर्दीतल्या प्रत्येकाला आपल्या नायकाला स्पर्श करून पाहायचं होतं.
8 / 8
यानंतर त्यांच्या टीमने पीआरला सक्रिय केलं. 'चेन्नई में शक्तिमान' ही प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानाची बातमी बनली. परिणामी, पार्ले-जीची विक्री दरमहा 50 टनांवरून 2000 टनांपर्यंत वाढली. “जेव्हा इंटरनेट नव्हते तेव्हा शक्तीमान मोहिमेद्वारे हे सर्व साध्य केले. भविष्यात मेटाव्हर्सच्या युगात आणि वर्तमान युगात योग्य दृष्टिकोनाने काय साध्य करता येईल याची कल्पना करा,” असे शक्तीमानच्या प्रयोगाबद्दल बोलताना मुडनानी म्हणाले.
टॅग्स :Parle Gपार्ले-जीbusinessव्यवसाय