शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

७ लाख रुपयांचा जीवन विमा तीन वर्षांसाठी मिळेल मोफत; EPFO ​​ने १२ महिने सतत सेवेची अटही हटवली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 2:23 PM

1 / 9
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees Provident Fund Organization) कर्मचारी ठेव लिंक्ड विमा म्हणजेच ईडीएलआय योजनेचा (EDLI scheme) कालावधी तीन वर्षांनी वाढवला आहे. त्यामुळे ईपीएफओच्या जवळपास सहा कोटी सदस्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
2 / 9
ईडीएलआय योजनेअंतर्गत ईपीएफओ ​​सदस्यांना सात लाख रुपयांपर्यंतचा मोफत जीवन विमा मिळतो. यापूर्वी २८ एप्रिल २०२१ रोजी ईडीएलआय योजनेसाठी अधिकृत अधिसूचना जारी करून, ईपीएफओ ​​सदस्यांच्या वारसांना मिळणारा विमा लाभ तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला होता.
3 / 9
आता त्यात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. तसेच, ईपीएफओने सात लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचे लाभ घेण्यासाठी नियम शिथिल केले आहेत. विम्याचा लाभ घेण्यासाठी आधी कर्मचाऱ्याला एकाच ठिकाणी १२ महिने काम करणे आवश्यक होते, आता ही अट काढून टाकण्यात आली आहे.
4 / 9
ईडीएलआय योजना १९७६ मध्ये सुरू झाली. ज्याचा उद्देश ईपीएफओच्या सदस्यांना विम्याचा लाभ मिळवून देणे हा आहे. जेणेकरून जेव्हा एखाद्या ईपीएफओ ​​सदस्याचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या कुटुंबाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
5 / 9
दरम्यान, विम्याची रक्कम ईपीएफ खातेधारकाच्या नॉमिनीला दिली जाते. जर कोणाला नॉमिनी केले गेले नसेल, तर त्याच्या कायदेशीर वारसांना विम्याची रक्कम तितकीच मिळते. कर्मचाऱ्याचा आजार, अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास विमा संरक्षण दिले जाऊ शकते.
6 / 9
ईडीएलआय योजनेंतर्गत मिळणारी विमा रक्कम मागील १२ महिन्यांच्या पगारावर अवलंबून असते. एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास नॉमिनी असलेल्या व्यक्तीला २० टक्के बोनससह मागील १२ महिन्यांच्या सरासरी पगाराच्या ३० पट रक्कम मिळते.
7 / 9
कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा जमा होणाऱ्या पीएफच्या रकमेपैकी ८.३३ टक्के रक्कम ईपीएसमध्ये, ३.६७ टक्के ईपीएफमध्ये आणि ०.५ टक्के रक्कम ईडीएलआय योजनेत जमा केली जाते.
8 / 9
ईडीएलआय योजनेअंतर्गत कोणत्याही खातेदाराला किमान २.५ लाख आणि कमाल ७ लाखांचा विम्याचा क्लेम करता येतो. किमान क्लेम मिळविण्यासाठी खातेदाराने किमान १२ महिने सतत काम करणे गरजेचे आहे. नोकरी सोडणाऱ्या खातेदाराला विम्याचा लाभ दिला जात नाही.
9 / 9
पीएफ खात्यावरील या विम्याचा क्लेम तेव्हाच केला जाऊ शकतो, जेव्हा पीएफ खातेधारकाचा सेवेत असताना मृत्यू होतो, म्हणजे निवृत्तीपूर्वी. या काळात तो कार्यालयात काम करत असो वा रजेवर असो. याचा काही फरक पडत नाही.
टॅग्स :Employeeकर्मचारीbusinessव्यवसाय