शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ratan Tata Successor: रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण होणार? अब्जावधींचे साम्राज्य कोण सांभाळणार, ही नावे चर्चेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 8:24 AM

1 / 7
जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. अब्जावधींचा डोलारा असूनही साधे राहणीमान असलेल्या रतन टाटा यांनी लग्न केले नव्हते. कोरोना काळात टाटा यांनी देशाला १५०० कोटी रुपयांची मदत केली होती. टाटा ट्रस्टची हॉस्पिटल, कंपन्यांद्वारे ते वेळोवेळी मदत करत होते. रतन टाटांनी काही वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली खरी परंतू जवळपास १०० हून अधिक ब्रँड असणाऱ्या टाटा समुहाची जबाबदारी टाटांनी कोणाला द्यायची याचा निर्णय घेतला नव्हता. आज टाटांचा उत्तराधिकारी कोण होणार, अब्जावधींचे साम्राज्य कोण सांभाळणार असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात घोळू लागले आहेत.
2 / 7
रतन टाटांनंतर टाटा समुहाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर दिली जाणार, असा प्रश्न आहे. यात काही नावे समोर येत आहेत. रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांचेही नाव आहे. तसेच टाटा कुटुंबाची नवी पिढी देखील ही जबाबदारी सांभाळण्याची शक्यता आहे. टाटांनी नव्या पिढीला घडविण्याचे काम केले होते.
3 / 7
नोएल टाटांना तीन मुले आहेत. माया, लिया आणि नेविल टाटा. रतन टाटांनी या तिघांकडे टाटा समुहातील विविध कंपन्यांची जबाबदारी सोपविली होती. रतन टाटांना अब्जावधींचे साम्राज्य सांभाळण्यासाठी नवी पिढी तयार करायची होती. याचा अंदाज त्यांनी काही वर्षांपूर्वीच बांधला होता व टाटा समुहातून बाजुला होण्याचा निर्णय घेतला होता.
4 / 7
याशिवाय रतन टाटांचे सख्खे लहान भाऊ जिम्मी टाटा देखील आहेत. परंतू ते टाटा समूह आणि प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहिलेले आहेत. माया ही ३४ वर्षांची आहे. तिने टाटा अपॉर्चुनिटीज फंड आणि टाटा डिजिटलमध्ये महत्वाची भूमिका निभावली आहे. टाटा न्यू एप लाँच करण्यातही तिची महत्वाची भूमिका आहे.
5 / 7
नेविल टाटा हे ३२ वर्षांचे आहेत. त्यांचे लग्न किर्लोस्कर ग्रुपच्या मानसी किर्लोस्कर यांच्याशी झालेले आहे. नेविल हे स्टार बझारचे प्रमुख आहेत. तर ३९ वर्षांच्या लिया या टाटांच्या नव्या पिढीतील सर्वात मोठ्या आहेत. त्या ताज हॉटेल्सची चेन सांभाळतात. इंडियन होटल कंपनीचीही जबाबदारी आहे.
6 / 7
येत्या काळात टाटा समुहामध्ये मोठे बदल होताना दिसणार आहेत. रतन टाटांचा जनरल मॅनेजर असलेला तरुण शांतनू नायडू याच्यावरही टाटा ग्रुपमध्ये मोठी जबाबदारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जेव्हा जेआरडी टाटांनी १९९१ मध्ये पद सोडले होते तेव्हा रतन टाटांनी समुहाची धुरा सांभाळली होती.
7 / 7
हा काळ टाटा ग्रुप आणि भारतासाठी देखील खूप महत्वाचा होता. कारण तेव्हा भारताने आपली अर्थव्यवस्था जगासाठी खुली करण्यासाठी आणि वेगाने प्रगती करण्यासाठी तयारी सुरु केली होती. रतन टाटांनी काही कठोर निर्णय घेतले. त्यांनी सेवानिवृत्तीचे वय लागू केले, हुशार तरुणांना चांगल्या पदांवर नियुक्त केले आणि कंपन्यांवरील नियंत्रण वाढविले.
टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटा