शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Success Story:'हे' आहेत भारतातील सर्वात वृद्ध अब्जाधीश, निवृत्तीनंतर उभारली कंपनी; जाणून घ्या त्यांची यशोगाथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 3:07 PM

1 / 6
India's Oldest Billionaire: इंग्रजीत एक म्हण आहे... Never too late to start. याचा अर्थ असा आहे की, काहीतरी नवीन सुरू करण्यास कधीही उशीर झालेला नसतो. तुमचे वय किंवा परिस्थिती काहीही असो, तुम्ही प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर कोणत्याही वयात यश मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने निवृत्त होण्याच्या वयात करिअरला सुरुवात केली आणि आज ती व्यक्ती भारतातील सर्वात वृद्ध अब्जाधीश आहे.
2 / 6
भारतातील आघाडीच्या ट्रॅक्टर ब्रँडपैकी एक असलेल्या सोनालिका ट्रॅक्टर्सचे संस्थापक आणि अध्यक्ष लक्ष्मण दास मित्तल यांची ही कथा आहे. आता ते 92 वर्षांचे आहेत आणि फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, त्यांची सध्याची एकूण संपत्ती $2.5 अब्ज आहे. गेल्या आठवड्यात केशव महिंद्रा यांच्या निधनानंतर आता लक्ष्मण दास मित्तल हे भारतातील सर्वात वृद्ध अब्जाधीश बनले आहेत. आतापर्यंत हा दर्जा केशव महिंद्राकडे होता.
3 / 6
लक्ष्मणदास मित्तल यांची कहाणी अनोखी आहे. ते पूर्वी एलआयसी एजंट होते. त्यांनी एलआयसी एजंट म्हणून कार्यकाळ पूर्ण केला. वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत एलआयसी एजंट म्हणून काम केल्यानंतर ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर रिकामं बसणे त्यांना आवडत नव्हते, म्हणून निवृत्तीनंतर त्यांनी दुसरी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. सुमारे 6 वर्षे छोटी-मोठी कामे केल्यानंतर शेवटी एक उद्योजक म्हणून काम सुरू केले.
4 / 6
लक्ष्मण मित्तल यांचा जन्म 1931 साली पंजाबमधील होशियारपूर येथे झाला. एलआयसी एजंट म्हणून काम केल्यानंतर ते 1990 मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी मारुतीची डीलरशिप घेण्याचा प्रयत्न केला. डीलरशिप न मिळाल्याने त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी सोनालिका ग्रुप सुरू केला तेव्हा ते 66 वर्षांचे होते. हळुहळू करत त्यांनी आपला व्यवसाय वाढवला आणि आज देशभरात सोनालिका ट्रॅक्टरचे मोठे नाव आहे.
5 / 6
यासंदर्भात मित्तल यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितले की, मारुती उद्योगाची डीलरशिप मिळविण्यासाठी ते कसे प्रयत्न करत होते आणि आता ते स्वत: लोकांना डीलरशिप देत आहेत. त्यांचे म्हणणे खरेही ठरले आहे. सोनालिका सध्या भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्रँड आहे. सोनालिका ट्रॅक्टर भारताबाहेरही लोकप्रिय आहेत. कंपनीच्या ट्रॅक्टरचे 140 देशांमध्ये 2 लाखाहून अधिक आंतरराष्ट्रीय ग्राहक आहेत.
6 / 6
मित्तल यांनी आता सोनालिकाचे काम पुढच्या पिढीकडे सोपवले आहे. सध्या ही कंपनी त्यांची मुले अमृत, दीपक आणि नातू रमण, सुशांत आणि राहुल सांभाळत आहेत. आताही लक्ष्मण मित्तल कंपनीपासून पूर्णपणे वेगळे झाले नाही. लक्ष्मण मित्तल अजूनही समूहाचे अध्यक्ष आहेत आणि सक्रियपणे कामावर देखरेख करतात. वयाची पर्वा न करता सक्रिय राहणे हेच त्याच्या यशाचे रहस्य आहे.
टॅग्स :businessव्यवसायInvestmentगुंतवणूकAutomobileवाहन