शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rakesh Jhunjhunwala : यशोगाथा! वडिलांचा पैसे देण्यास नकार अन् झुनझुनवालांनी उभं केलं 'विराट' साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 10:42 AM

1 / 9
त्यांना पाहूनच लोक ठरवायचे की कोणत्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवायचे आणि कोणत्या स्टॉकमधून पैसे काढायचे. त्यांना लोक बिग बुलही म्हणायचे. भारताचे वॉरेन बफे असेही त्यांना म्हटले जायचे. मातीला हात लावला तरी सोनं बनायचं. परंतु आज ते आपल्यात नाहीत. देशातील आणि जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले.
2 / 9
त्यांची यशोगाथा येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल. अवघे 5 हजार रुपये घेऊन ते शेअर बाजारात कसे उतरले आणि त्यानंतर काय झाले हा त्यांचा प्रवास अतिशय थक्क करणारा आहे. झुनझुनवाला हे देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतही होते. त्याचे यश विलक्षण होते. शेअर बाजारात यशाची पताका फडकवणाऱ्या झुनझुनवाला यांनी स्वत:ची एअरलाइन अकासा एअर सुरू केली.
3 / 9
विशेष म्हणजे टाटा समूहाच्या केवळ एका शेअरने राकेश झुनझुनवाला यांचे नशीब बदलले. पण विमान वाहतूक क्षेत्रात पाऊल टाकून ते त्याच टाटा समूहाला स्पर्धा देत होते. टाटा समूहाने नुकतीच एअर इंडिया विकत घेतली आहे. याआधीही कंपनीकडे एअर एशिया आणि विस्तारा या दोन विमान कंपन्या आहेत. आकासा एअरच्या आगमनाने राकेश झुनझुनवाला यांची थेट स्पर्धा टाटा समूहाशी होती.
4 / 9
राकेश झुनझुनवाला यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी मुंबईत झाला. त्याचे वडील आयकर विभागात अधिकारी होते आणि ते शेअर बाजारात गुंतवणूक करायचे. तेथून राकेश झुनझुनवाला यांना शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचे इच्छा होत गेली. वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर त्यांनी 1985 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामधून सीएचा कोर्स केला. यानंतर त्यांनी शेअर बाजारात जाण्याची इच्छा व्यक्त केली पण वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. आधी स्वत: पैसे कमव आणि मग शेअर बाजारात प्रवेश कर, असं त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं.
5 / 9
राकेश झुनझुनवाला यांनी 1985 मध्ये पहिल्यांदा शेअर बाजारात पाऊल ठेवलं. त्यांनी 5 हजार रुपये गुंतवले आणि 1986 मध्ये पहिला नफा कमावला. त्यांनी टाटा टीचे शेअर्स 43 रुपयांना विकत घेतले आणि तीन महिन्यांनी 143 रुपये प्रति शेअर या दराने विकले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. 1986 ते 1989 या काळात त्यांनी 2 ते 2.5 कोटी रुपयांचा नफा कमावला. यानंतर सेसा स्टारलिट कंपनीचे चार लाख शेअर एक कोटी रुपयांना विकत घेतले आणि या गुंतवणुकीत भरघोस नफा कमावला.
6 / 9
2003 मध्ये राकेश झुनवाला यांनी टाटा समूहाची आणखी एक कंपनी टायटन कंपनीत गुंतवणूक केली. या एका शेअरने त्यांचे नशीबच पालटवले. त्यांनी 6 कोटी शेअर्स प्रत्येकी तीन रुपये दराने खरेदी केले. आज त्या एका शेअरची किंमत 1,961.00 रुपये आहे. हा स्टॉक त्यांचा आवडता स्टॉक म्हणून ओळखला जायचा. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स होते. यामध्ये सेल, टाटा मोटर्स, टाटा कम्युनिकेशन्स, लुपिन, टीव्ही18, डीबी रियल्टी, इंडियन हॉटेल्स, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, फेडरल बँक, करूर वैश्य बँक, एस्कॉर्ट्स लिमिटेड, टायटन कंपनी या कंपन्यांचा समावेश आहे.
7 / 9
राकेश झुनझुनवाला यांनी विमान वाहतूक क्षेत्रात उतरून टाटा समूहाला आव्हान दिले. त्यांची गुंतवणूक विमान कंपनी अकासा एअरने आपले कामकाजही सुरू केले आहे. परवडणारी सेवा पुरवणे हे आकासा एअरचे उद्दिष्ट आहे. राकेश झुनझुनवाला यांची या कंपनीत सुमारे 50 मिलियन डॉलर्स इतकी मोठी गुंतवणूक आहे. म्हणजेच टाटा समूहाच्या कंपन्यांमधून पैसा कमावणाऱ्या झुनझुनवाला यांनी टाटांनाच टक्कर देण्याची पूर्ण तयारी केली होती. टाटा समूहाने नुकतीच एअर इंडिया विकत घेतली आहे. याशिवाय एअर एशिया आणि विस्तारा सारख्या विमान कंपन्याही आहेत.
8 / 9
राकेश झुनझुनवाला हे मुंबईतील सर्वात महागड्या भागात 14 मजली आलिशान घर बांधत होते. सध्या ते एका अपार्टमेंट ब्लॉकमध्ये दुमजली घरात राहत होता. पण लवकरच त्यांचे नवीन निवासस्थान मलबार हिलमध्ये असणार होते. अनेक उद्योगपती आणि कॉर्पोरेट जगतातील नामवंत व्यक्ती या भागात राहतात. हे घर बांधण्यासाठी झुनझुनवाला यांनी 371 कोटी रुपयांना जमीन खरेदी केली होती. मलबार हिल हा मुंबईतील सर्वात महागडा परिसर मानला जातो. येथे एका चौरस फुटाची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. सज्जन जिंदाल, आदी गोदरेज आणि बिर्ला कुटुंबीयही मलबार हिलमध्ये राहतात.
9 / 9
झुनझुनवाला यांनी तीन बॉलीवूड चित्रपट प्रोड्युसही केले होते हे फारच कमी लोकांना माहीत असेल. यामध्ये इंग्लिश विंग्लिश, शमिताभ आणि 'की अँड का' यांचा समावेश आहे. त्यांना खाण्यापिण्याची खूप आवड होती. त्यांना स्ट्रीट फूड, डोसा आणि चायनीज फूड खूप आवडायचे. मुंबईची पावभाजी हा तर त्यांचा विक पॉईंट होता. फावल्या वेळात ते फूड शो पाहायचे. गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांनी 50 कोटी रुपयांचे डोनेशन दिले होते.
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक