शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Success Story: मिठाईवाल्याचा मुलगा, शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतल्या ट्युशन; आज उभी केली ३५ हजार कोटींची बँक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 8:50 AM

1 / 8
मनात जिद्द असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश नक्कीच मिळतं. तुम्ही कधी बंधन बँकेचं नाव नक्कीच ऐकलं असेल किंवा कदाचित त्या बँकेत तुमचं खातंही असू शकेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या बँकेची स्थापना कोणी केली? चंद्रशेखर घोष असं या बँकेची स्थापना करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. आज जवळपास प्रत्येक राज्यातील प्रमुख शहरांमध्ये या बँकेच्या शाखा आहेत. पण त्याची सुरुवात इतकी सोपी नव्हती.
2 / 8
चंद्रशेखर यांनी २००१ मध्ये स्वयंसेवी संस्था म्हणजेच एनजीओ म्हणून याची सुरुवात केली. पुढे त्यांनी त्याचं रूपांतर देशातील सर्वात मोठ्या मायक्रोफायनान्स संस्थेत केलं. ऑगस्ट २०१५ मध्ये त्याचं बँकेत रुपांतर झाले. आज या बँकेचे बाजार भांडवल सुमारे ३५ हजार कोटी रुपये आहे.
3 / 8
१९६० त्रिपुरातील एका कुटुंबात चंद्रशेखर घोष यांचा जन्म झाला. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. त्यांचं बालपण अतिशय गरिबीत गेलं. त्यांच्या वडिलांचं छोटं मिठाईचं दुकान होतं. पण त्यांचा खर्च कसाबसा चालत होता.
4 / 8
घरची आर्थिक स्थिती चांगली नसली तरी चंद्रशेखर यांनी आपलं शिक्षण सुरूच ठेवलं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९७८ मध्ये ते बांगलादेशातील ढाका येथे आपलं पुढचं शिक्षण घेण्यासाठी गेले. त्या ठिकाणी त्यांनी स्टॅटिस्टिक्समध्ये पदवी मिळवली. यादरम्यान आपला खर्च भागवण्यासाठी त्यांनी आश्रमात पाहून मुलांना ट्युशनही दिलं.
5 / 8
ढाक्यात राहत असताना चंद्रशेखर यांना १९८५ मध्ये एका इंटरनॅशनल डेव्हलपमेंट नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये (BRAC) नोकरी मिळाली. ग्रामीण महिलांवर छोट्या आर्थिक मदतीचा होणारा परिणाम त्यांना याठिकाणी दिसला. चंद्रशेखर यांना यातून खूप प्रेरणा मिळाली. भारतातही हे मॉडेल राबवण्याचा विचार त्यांनी केला.
6 / 8
चंद्रशेखर १९९७ मध्ये कोलकात्यात परतले. येथे त्यांनी एका वेल्फेअर सोसायटीसाठी काम करण्यास सुरुवात केली. मात्र, काही काळानंतर त्यांनी स्वत:ची कंपनीही सुरू केली. २००१ मध्ये चंद्रशेखर यांनी 'बंधन'ची स्थापना केली. या कंपनीसाठी चंद्रशेखर यांनी मित्र आणि नातेवाईकांकडून सुमारे दोन लाख रुपये उधार घेतले.
7 / 8
महिलांना कर्ज देणारी ही मायक्रोफायनान्स कंपनी होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) २००९ मध्ये बंधनची नॉन बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) म्हणून नोंदणी केली होती. २०१५ मध्ये त्याला बँकिंग लायसन्स मिळालं आणि त्याचं नाव बदलून 'बंधन बँक' करण्यात आलं.
8 / 8
आज बंधन बँकेच्या देशभरातील ३५ राज्यांमध्ये सुमारे ६३०० शाखा आहेत. बँकेचे ३.४४ कोटींहून अधिक ग्राहक आहेत. ३० जून २०२४ पर्यंत बँकेचा डिपॉझिट बेस सुमारे १.३३ लाख कोटी रुपये आहे. गेल्या आठवड्यात बँकेनं चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून) निकाल जाहीर केले. त्यानुसार बँकेच्या निव्वळ नफ्यात ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
टॅग्स :businessव्यवसायbankबँकInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी