मोदी सरकारने मुहूर्त चुकवला! Air India हस्तांतरणाला विलंब; TATA ला आणखी वाट पाहावी लागणार? By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 12:49 PM
1 / 13 कर्जात बुडालेल्या Air India साठी TATA ग्रुपने लावलेली बोली यशस्वी ठरल्यानंतर केंद्र सरकारकडून एअर इंडियाचे टाटा समूहाकडे हस्तांतरण केले जाणार होते. यासाठीची सर्व तयारीही झाली होती. मात्र, या प्रक्रियेत काहीसा विलंब लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, २७ जानेवारीला होणारे हे हस्तांतरण पुढे ढकलण्यात आले आहे. 2 / 13 मोदी सरकारकडून गुरुवार, २७ जानेवारी रोजी अधिकृतपणे Air India ची मालकी TATA समूहाकडे हस्तांतरित करण्यात येणार होती. यासाठी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आल्या. मात्र आता त्यासाठी अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. टाटाकडून प्रवाशांसाठी रतन टाटांच्या आवाजात जेवणाची विशेष ऑफरही देण्यात आली होती. 3 / 13 गुरुवारी TATA ग्रुपकडे अधिकृतपणे मालकी येईल, असे सांगितले जात होते. पण आता त्यासाठी अजून एक दिवस वाट पाहावी लागणार आहे. शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडणार आहे. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 4 / 13 बुधवारी रात्री १० च्या सुमारास, नवीन मालक पदभार कधी स्वीकारणार या प्रतिक्षेत असलेल्या Air India च्या कर्मचार्यांना एक ईमेल आला. यामध्ये त्यांना हस्तांतरित योजना प्रलंबित ठेवण्यात आल्याची माहिती दिली. 5 / 13 याआधी २७ जानेवारीला TATA सन्सकडे महाराजाचं अधिकृत हस्तांतरण केलं जाईल असं सांगण्यात आले होते. बुधवारी Air India च्या कर्मचाऱ्यांना तसा मेलही करण्यात आला होता. हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी तयारी करा असे त्यांना यात सांगण्यात आले होते. यामध्ये काही देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय विमानांमधील जेवणासंबंधीही सूचना करण्यात आली होती. 6 / 13 जेआरडी टाटांचे स्वप्न रतन टाटा पूर्ण करणार आहेत. जेआरडी टाटा यांनी Air India स्थापन केली होती. मात्र, तेव्हाच्या सरकारने राष्ट्रीयीकरण करत ६९ वर्षांपूर्वी ही कंपनी सरकारी अधिपत्याखाली आणली होती. गेल्या काही वर्षांपासून ही कंपनी तोट्यात सुरु होती. यामुळे सरकार ही कंपनी विकण्याचा प्रयत्न करत होती. अखेर ही कंपनी TATA ने विकत घेतली आहे. 7 / 13 Air India विमानात केल्या जाणाऱ्या घोषणेमध्ये प्रवाशांना पाहुणे म्हणून संबोधले जाईल. यासोबतच त्यांना TATA समूहाचे चेअरमन एमेरिटस रतन टाटा यांचा रेकॉर्ड केलेला संदेशही ऐकविला जाऊ शकतो. एअर इंडियाची चार बोईंग ७४७ जंबो विमानेही टाटाकडे हस्तांतरित केली जात आहेत. 8 / 13 Air India च्या अधिग्रहणानंतर, एअरएशिया इंडिया, टीसीएस आणि टाटा स्टीलच्या अधिकाऱ्यांसह एअरलाइन चालविण्यासाठी अंतरिम व्यवस्थापन तयार केले जाईल. तसेच पुढील सात दिवस महत्वाचे असून कंपनीची इमेज, वागणूक या काळात बदलावी लागणार आहे. 9 / 13 सातत्याने तोट्यात असलेली आणि कर्जाच्या ओझ्याने वाकलेली Air India ही हवाई वाहतूक कंपनी TATA ने १८ हजार कोटी रुपयांना खरेदी केली. विविध कारणांमुळे कर्जजर्जर झालेली ही कंपनी खरीदण्यासाठी देशातून आणि परदेशातूनही फारशा कंपन्या उत्सुक नव्हत्या. 10 / 13 Air India च्या सर्व मालमत्ता आणि कंपनीवर असलेल्या सुमारे १५ हजार ३०० कोटींच्या कर्जासह TATA ने १८ हजार कोटी रुपयांची बोली लावली. उर्वरित २,७०० कोटी रुपये टाटा सरकारला रोख स्वरूपात देणार असल्याची माहिती गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांता पांड्ये यांनी दिली होती. 11 / 13 TATA समूहाचा सध्या ‘एअर एशिया’ आणि ‘विस्तारा’ या कंपन्यांत मोठा वाटा आहे. आता ही तिसरी कंपनी त्यांच्याकडे आली आहे. मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंत अनेक उत्पादने तयार करणाऱ्या टाटा समूहाची ही एक दिमाखदार कामगिरी मानली जाते. एअर इंडियाला कर्जबाजारीपणातून बाहेर काढण्याचे आव्हान आता त्यांच्यापुढे आहे. 12 / 13 ‘इंडियन एअरलाइन्स’मध्ये २००७ मध्ये विलीनीकरणानंतर Air India चा तोटा वाढला. आता TATA ला देशांतर्गत ४४०० आणि आंतरराष्ट्रीय १८०० उड्डाणांचे व पार्किंग जागांचे नियंत्रण मिळणार आहे. परदेशात पार्किंगचे ९०० स्लॉट मिळणार आहेत. मालवाहतूक आणि विमानतळांवरील इतर सेवांत टाटा समूहाला १०० टक्के तसेच ५० टक्के वाटा मिळणार आहे. 13 / 13 Air India कडे आताच्या घडीला ५८ एअरबस, A320 फॅमिली विमाने, १४ बोइंग 777, २२ B787 ड्रीमलाइनर आणि AI एक्सप्रेसची २४ B737 एअरवर्थ असा विमानांचा भरगच्च ताफा आहे. हा सर्व ताफा TATA सन्सला मिळणार आहे. आणखी वाचा